प्रासंगिक : रखरखीत निखारे आणि चमचमणारे हिरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>  स्वाती विप्रदास

श्री सद्गुरू शंकर महाराज यांचा समाधी सोहळा सुरू झाला आहे. 12 मेपर्यंत हा उत्सव धनकवडी,
सातारा रोड पुणे येथील मठात सुरू राहणार आहे. त्यानिमित्त हा लेख.

सद्गुरू शंकर महाराजांचा यंदा  72 वा समाधी सोहळा असून दिवसेंदिवस मठात भक्तांच्या गर्दीचा लोट वाढत चाललेला आहे. मनःशांती शोधत साधक संतापर्यंत येतो तेव्हा त्याला तृप्तीचा अनुभव येतो. संतांच्या पायी जी शांतता आहे ती कुठेच सापडत नाही. सर्व ठिकाणी माणूस जात असतो. संतांच्या चरणात विठ्ठलाचे दर्शन होते, असे संत तुकाराम महाराजांनी कितीतरी अगोदर अनुभवले व सर्व जगास सांगितले आहे. संत चरणात विठ्ठलाचे (पांडुरंगाचेच) दर्शन होते. संतापायी शांततेची अनुभूती संत रामदास, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर या आणि अशा अनेक संतांनी समाजाला  शांती, सुखाचा अनुभव दिलेला वारसा सर्वांनाच ठाऊक आहे.

सद्गुरू शंकर महाराजांचा समाधी सोहळा सुरू झाला की, दुर्गाअष्टमीपर्यंतच्या  या सप्ताहात एक एक क्षण खूपच मोलाचा असतो. नामगंगेला जणू पूर येतो. संतांचे वर्णन किती करावे तरी ते खूपच थोडे वर्णन झाले असे वाटते. शब्दही कमी पडतात असा हा नामाचा अथांग सागरच आहे.

टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग।

देवाजीच्या दारी आज रंगला अभंग।।

या अभंगाप्रमाणे या सप्ताहात प्रत्येकाच्या मनावरचा ताण नाहीसा होतो. जो तो टाळाच्या, मृदुंगाच्या आणि इतर वाद्यांच्या तालावर मग्न होतो. आनंदाच्या लहरींना उधाण येते. मग विचार मनात येतात बापरे काय शांतता आहे नामस्मरणात. इथे प्रत्येकाचे मन आनंदाने न्हाऊन निघालेले दिसते. ‘आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदची अंग’ या ओळींप्रमाणे प्रत्येकाच्या चेहर्‍यावर समाधान दिसतं. कोणालाही मोजता येणार नाही एवढी प्रचंड शक्ती या संतचरणात आहे.

एक अनुभव इथे सांगावासा वाटतो, पुण्याहून दावल मलिक (सद्गुरूंचे शंकरबाबांचे प्रकटस्थान ) येथे दर्शनासाठी निघालो. नाशिक जिल्हातील सटाणा या गावापासून जवळच दावल मलिक दर्गा आहे. तेथे संत श्री शंकर महाराज यांचे प्रकट स्थान आहे. डोंगराकडे पाहताच डोळे गरगर फिरू लागले. एवढे उंच डोंगर चढणे म्हणजे सर्कसच म्हणाना. तरीही डोंगर चढायला 1.30 वाजता सुरुवात केली. दर्शन घेऊन ठीक 4.30 ला डोंगर उतार झालो. नंतर डोंगराकडे पाहताना वाटले की, एवढे अवघड वाटणारे विचार आपले होते. घडलेला चमत्कार सद्गुरूंचा होता. कसे वर चढलो कसे खाली उतरलो काही वर्णन सांगता येत नाही. फक्त एवढेच समजते की, दावल मलिक दर्ग्यात सद्गुरू शंकरबाबांचे प्रकटस्थान आहे. त्या ऊर्जेच्या बळावर जाणारा तेथे पोहचतो व सुखरूप खाली उतरतो.

संतांना प्रत्येकाचे मन कळते. जो जो विचार होकारार्थी होतो तेथे संतचरण जवळ आले असे समजावे.

संतचरण रज लागता सहज।

वासनेचे बीज जळूनी जाय।।

मग राम नाम उपजे आवडी ।

सुख घडोघडी वाढी लागे।।

काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या दुर्गुणांची चावी सद्गुरूंकडे द्यावी आणि आपण निवांत आयुष्य जगावं. एका बाजूला रखखीत निखारे व दुसर्‍या बाजूला चमचम करणारे हिरे आहेत. हिऱयांची चमक कधीही संपत नाही. निखारे चटके तर बसवतात, पण थंड झाल्यावर त्यांचा कोळसा होतो. तसंच विकारांचं आहे. ते चावा घेतात मनाला तेव्हा मनाला जखम होते व सत्य, स्वच्छ, शांत, अथांग, सात्त्विक, धैर्यशील विचार मनावर राज्य करतात तेव्हा ते विचार हिर्‍याप्रमाणे सतत तेज देतात. या दोन्ही उपमा सामान्य व असामान्यतेचे दर्शन घडवतात.