लेख – किल्ले रायगड : स्थापत्य इतिहास

778

>> चंद्रशेखर बुरांडे

हिंदवीस्वराज्य स्थापलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यशाली कर्तृत्वाच्या स्मृती पुढील पिढय़ांच्या सदैव स्मरणात राहावी म्हणून प्रतिवर्षी 6 जून रोजी शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जातो. त्या घटनेस आज 345 वर्षे पूर्ण होतील. त्या आठवणीप्रीत्यर्थ रायगड स्थापत्य इतिहास संकलन उपक्रमशीलतेबद्दलचा हा परिचय.

छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावरील चुकीची नामांकरणे, शैलीतील विरोधाभास व उपयुक्ततेबाबत आजही एकवाक्यता दिसून येत नाही. अनेक कारणांमुळे रायगडावरील स्थापत्य निर्मितीचा निश्चित काल सांगणे कठीण आहे. शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाची तारीख ग्राह्य धरून हा काळ मोजला तरी जवळपास तीन शतकांहून अधिक काळ उलटला आहे. अनेक वर्षे वास्तूंची पडझड होत राहिल्यामुळे त्यातील स्पष्टता आणखी धूसर होते आहे.

 शिवपूर्वकालीन रायगड मराठा पाळेगार, विजयनगर, बहमनी, निजामशाही, आदिलशाही अशा अनेक राजवटींच्या अमलाखाली राहिला. प्रत्येक राजवटीत रायगडावर बांधकामे झाली तसेच स्थित्यंतरेही होत गेली. त्यामुळे स्थापत्य शैलीत विविधता आढळते. सद्यस्थितीतील रायगड पाहिल्यानंतर मनात अनेक प्रश्न रुंजी घालतात. उदा. मूळ रायगड नेमका कसा होता, तो कोणी बांधला, राजसभेची अंतर्गत रचना कशी होती, नगारखाना नेमक्या कोणत्या शिवपूर्वकालीन रायकर्त्यांच्या स्वागतासाठी बांधला होता, दोन्ही द्वादशकोन स्तंभांची शैली, घटक व उपयुक्ततेत साम्य आढळते. तरीही तफावत का आहे? तत्कालीन बालेकिल्ल्यातील छत्रपतींचे निवासस्थान दुमजली होते का? देवघर, मुदपाकखाना, भोजनगृह यांच्या जागा नेमक्या कुठे होत्या? ब्रिटिश तोफगोळय़ांमुळे रायगड पूर्णपणे भस्मसात झाला हे कितपत खरे आहे? सध्या रायगडावर पूर्णतः शाबूत राहिलेल्या मोजक्या इमारती आजपर्यंत टिकून आहेत. मग जोत्यापर्यंतचे अवशेष असलेल्या अनेक इमारती का कोसळल्या? नगारखाना, स्तंभ व जगदीश्वर मंदिरावरील मोजके घटक एकसमान आहेत, परंतु त्या इमारती मिश्र शैलीत व वेगवेगळय़ा कालावधीत बांधल्या आहेत का?

एक शतकाहून अधिक काळ दुर्लक्षित राहिलेल्या तत्कालीन रायगडची स्थिती इ.स. 1885 मध्ये गोविंद बा. जोशी लिखित ‘रायगड किल्ल्याचे वर्णन’ या पुस्तकामुळे सर्वांना समजली. शिवछत्रपतींच्या समाधीस्थळाची अवस्थादेखील नीटनेटकी नसल्याचे समजल्यावरून समाधीदर्शनासाठी रायगडावर जाणाऱ्यांची संख्या वाढली. उल्लेखित पुस्तक व त्यानंतर प्रसिद्ध झालेली काही मोजकी पुस्तके वगळता इतर पुस्तकांतील पडझडविषयक माहिती जुजबी स्वरूपातील आहे. रायगडावरील प्रत्यक्ष दाखले व पुस्तकातील माहितीमध्ये खूपच तफावत आढळते. इमारतींना नामांकने देताना ती नीट तपासून पाहायला हवी होती असे आमचे एकटय़ाचे मत नसून बहुतांश लेखक, अभ्यासकांचेही तेच मत आहे. मराठय़ांच्या इतिहास साधनाची तीनशेहून अधिक पुस्तके असल्याचे आढळून येते. मराठा ‘स्थापत्य इतिहासा’वर मात्र मोजकीच पुस्तके आहेत. पुरातन स्थापत्य इतिहास संशोधनात अनेक साधनांचा समावेश असतो. उपलब्ध साधने बारकाईने तपासण्याची गरज असते. म्हणून ऐतिहासिक सत्य वास्तुशास्त्र कसोटीवर तपासून मगच वाचकांसमोर यायला हवे. आपल्याकडील बहुतांश इतिहासकारांनी स्थापत्य प्रमापकास धरून व्यक्त होण्याऐवजी केवळ एकाच आधारावर विचार सीमित ठेवल्यामुळे हा संभ्रम निर्माण झाला आहे. लिखित रूपातील पुरातन इतिहास साधनांविषयी इतिहासकारांत मतमतांतरे असणे साहजिक असते. असा लिखित रूपातील पुरातन इतिहास पुनः पुन्हा तपासून दुरुस्त करता येतो, पण दृश्य स्थापत्य दाखले हा ठोस पुरावा असतो. इमारत शैली व शिल्पावरून एखाद्या इमारतीचा कालावधी ओळखता येतो.

हिंदुस्थानी पुरातत्व सर्वेक्षण विभागाने रायगड किल्ला ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून घोषित केला आहे. रायगड किल्ल्याचे जतन, संवर्धन जागतिक मापदंडास अनुसरून व्हायला हवे. जेव्हा केव्हा उद्याच्या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जाईल, त्यात 38 वे युनेस्को नामांकन रायगड किल्ल्यास दिले अशी नोंद व्हायला हवी. जर असे घडले तर ती रायगड प्राधिकरण समितीने शिवछत्रपतींना दिलेली आगळीवेगळी भेट असेल.

सध्या रायगडावरील इमारतीची पडझड रोखण्यास प्राथमिकता द्यायला हवी, परंतु विकासकामांवर भर असल्याचे दिसून येते. याबाबतीत शिवछत्रपतींच्या जीवनात घडलेल्या प्रसंगाच्या माध्यमातून सांगायचे झालेच तर कोंडाणा किल्ला मोहिमेचा संदर्भ उचित वाटतो. शिवछत्रपतींनी कोंडाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी तानाजी मालुसरेंवर सोपवली होती. कोंडाणा मोहिमेवर निघालेल्या तानाजी मालुसरेंनी मुलाच्या लग्नाची तयारी अर्धवट सोडून ‘‘आधी लगीन कोंडाण्याचे, मग माझ्या रायबाचे’’ असे उद्गार काढले होते. रायगड जतन संवर्धनाचा पुढाकार ज्या अनेक मान्यवरांनी स्वयंप्रेरणेतून घेतला त्यापैकी एक लोकमान्य टिळक होते. जर ते आज हयात असते तर त्यांनी पण ‘आधी रायगड संवर्धन, मग परिसर विकास’ असेच सांगितले असते. शिवछत्रपतींनी राजधानीसाठी निवड केलेल्या किल्ले रायगडात त्यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेले स्थापत्य पुनरुज्जीवित करण्याची आवश्यकता आहे.

गौरवशाली गडकिल्ले हाच महाराष्ट्रासाठी सर्वांत मोठा मध्ययुगीन स्थापत्यठेवा आहे. तत्कालीन स्थापत्य इतिहासावर अनेक वास्तुविशारद व इतिहासकारांनी विस्ताराने लिहिले आहे. आजवर महाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास केवळ इतिहासकारांच्या भूमिकेतून मांडला गेल्यामुळे जिज्ञासू वर्ग किल्ला स्थापत्य माहितीपासून अनभिज्ञ राहिला. ही उणीव भरून काढण्याची आवश्यकता ओळखून रायगड स्थापत्य इतिहासावर लिहिण्याचे ठरवले. अनेक मिश्र राजवटीत बांधलेला खरा स्थापत्य इतिहास पुढे आणण्यासाठी अव्वल दर्जाची ऐतिहासिक साधने माहीत असावी लागतात. तसेच किल्ला म्हणजे केवळ लढाऊ इमारत नव्हे तर किल्ला रचनेत स्थान, संरक्षक रचना तसेच तंत्र कौशल्य अंतर्भूत असते. एक शतकाहून अधिक काळ पडझड झालेल्या रायगड किल्ल्यास अल्प साधनांच्या आधारावर पूर्वरूप मिळवून देणे जिकिरीचे आहे, पण अशक्य मुळीच नाही यावर मी व माझे मित्र इतिहासाचे अभ्यासक डॉ. सचिन पोवार यांचे एकमत झाले. ऐतिहासिक साधनांच्या बाबतीत डॉ. पोवारांनी आश्वस्त केल्यानंतर 25 मार्च 2018 रोजी गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या ‘शिवचरणस्पर्श’ ट्रस्ट, वडगावसोबत रायगडावर भेटण्याचे ठरले. ऐतिहासिक अव्वल साधने व स्थापत्य दृष्टिकोन तपासून शिवकालीन परिदृश्य ‘जसे होते तसे’ उभे करता येईल याची खात्री रायगड भेटीत आणखी बळकट झाली.

आपली प्रतिक्रिया द्या