लेख : शिवसेना युद्ध व तह जिंकू शकते

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
shivsena-logo-new

>> सद्गुरू कामत

शिवसेना आणि भाजप यांच्यात अखेर युती झाली आहे. लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभा निवडणुकीतही युतीच्याच माध्यमातून हे दोन पक्ष मैदानात उतरणार आहेत. गेली चार वर्षे शिवसेना केंद्रात आणि राज्यात सत्तेत असूनही जनहिताच्या आणि देशहिताच्या मुद्दय़ांवर सरकारविरोधात परखड भूमिका घेत राहिली. त्यामुळे आता युती केल्यावरून शिवसेनेलाच लक्ष्य केले जात आहे. तथापि ही युती करून शिवसेना युद्ध व तहदेखील जिंकू शकते हेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिलेला असल्याने शिवसेना-भाजप युती होणार नाही अशी विरोधकांसह अनेकांची अटकळ होती. मात्र तसे झाले नाही. राज्य सरकारमध्ये सहभागी राहून जनहिताच्या आणि देशहिताच्या प्रश्नावर सरकारविरोधात आपली परखड भूमिका शिवसेना सतत मांडत राहिली. शिवाय केंद्रात आणि राज्यात सत्ताधारी भाजपकडून जी वागणूक मिळाली, त्यामुळे सामान्य शिवसैनिकही संतप्त आणि अस्वस्थ होते. त्यात गेल्या दोन वर्षांत मोदी सरकारचा लोकप्रियतेचा ग्राफ झपाटय़ाने खाली घसरला होता. साहजिकच शिवसेना लोकसभा आणि विधानसभा स्वबळावर लढली असती तर त्याचा फटका भाजपला शंभर टक्के बसला असता. तरीही लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत युती करण्याचा निर्णय घेतला याबद्दल अनेकांना आश्चर्य वाटले आहे. त्यावरून टिकाटिप्पणीही सुरू आहे. मात्र इथे हे लक्षात घेतले पाहिजे की, युतीचा निर्णय घेऊन उद्धव ठाकरे यांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले आहेत. एकतर कालपर्यंत स्वतःच्या कैफात वावरणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना त्यांनी जमिनीवर आणले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा शिवसेना पक्षप्रमुखांशी गेल्या काही महिन्यांत वाढलेला संपर्क हा उद्धव ठाकरे यांच्या कूटनीतीचाच परिणाम म्हणावा लागेल. युतीचा निर्णयदेखील अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्तपणे (मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत) जाहीर केला. त्यामुळे  दोन प्रमुख राजकीय पक्षांचे प्रमुख युती करीत आहेत असे चित्र देशासमोर आले. त्यातून शिवसेनेचे महत्त्वच अधोरेखित झाले. युद्ध आणि तह शिवसेना जिंकू शकते हेदेखील सिद्ध झाले. शिवसेना पक्षप्रमुखांनी गेल्या साडेचार वर्षांत राज्य सरकारमध्ये असूनही जनहिताच्या प्रश्नांबाबत आपला वरचष्मा ठेवला. त्याचाही परिणाम भाजपने युतीसाठी पुढाकार घेण्यात झाला. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची दोनदा भेट घेतली हे विसरता येणार नाही.

2014 मध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल पूर्णपणे लागण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजप सरकारला बाहेरून विनाअट पाठिंबा जाहीर करून टाकला होता. शिवसेनेला हा राजकीय धक्का देण्याचाच प्रकार होता. मात्र याही परिस्थितीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी आणि नंतरच्या काळात अत्यंत सावधपणे पावले टाकली. डावपेच आखले. सत्तेत सन्मानाने सहभागी झाले, पण त्याचवेळी रयतेच्या प्रश्नांवर सरकारी धोरणांना कडाडून विरोधही केला. काही निर्णय तर रद्ददेखील करायला लावले (उदा. नाणार प्रकल्प). त्यांच्या या खेळीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांसारख्या मूळ विरोधी पक्षांचे अस्तित्वच या साडेचार वर्षांत दिसले नाही. त्यामुळे बडे बडे विरोधी नेते एकप्रकारे राजकीयदृष्टय़ा बेरोजगारच झाले होते. म्हणूनच आता लोकसभा आणि विधानसभेसाठी शिवसेनेची राजकीय भूमिका नेमकी काय असते याला सर्वच पातळय़ांवर महत्त्व आले होते. सरकारमधून बाहेर पडण्याच्या विरोधी पक्षांच्या आवाहनामागील स्वार्थ शिवसेना पक्षप्रमुखांना नेमका माहीत होता. त्यामुळे सत्तेत राहूनही शिवसेनेने विरोधी पक्षांची ‘स्पेस’ तर खाल्लीच, पण स्वतःचे स्वतंत्र अस्तित्वही कायम राखले. केंद्र आणि राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी निर्णयांना आणि योजनांना जनहिताच्या दृष्टिकोनातून सातत्याने प्रखर विरोध करून शिवसेनेचा बाणादेखील दाखवून दिला. आताही भाजपबरोबर युती करताना त्यांनी शेतकरी हिताच्या, कोकणच्या हिताच्या मुद्दय़ांवर भाजप सरकारला ठोस निर्णय घेणे भाग पाडले हे लक्षात घेतले पाहिजे. नाणारसारख्या प्रकल्पाला असलेला स्थानिक नागरिकांचा विरोध लक्षात घेऊन शिवसेनेनेही सुरुवातीपासून त्याविरोधातच भूमिका घेतली होती. युतीचा निर्णय घेताना नाणार प्रकल्पाची भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून जाहीरपणे वदवून घेतले हेदेखील यशस्वी राजकीय कौशल्य म्हणावे लागेल. त्याशिवाय शेतकरी कर्जमाफीसंदर्भातही त्याच पद्धतीने त्यांनी निर्णय घेणे राज्य सरकारला भाग पाडले. तसेच मुंबईकरांच्या मालमत्ता करासंदर्भातही शिवसेनेची वचनपूर्ती करून घेतली. थोडक्यात युती करताना शिवसेना ‘राजकीयदृष्टय़ा प्लस’मध्ये राहील याची खबरदारी उद्धव ठाकरे यांनी घेतली असे म्हणावे लागेल. युतीची गरज फक्त शिवसेनेलाच आहे असेही चित्र निर्माण केले गेले होते. ते उद्धव ठाकरे यांनी यशस्वीपणे पुसून  टाकले आणि भाजपचीदेखील युतीची गरज जनतेसमोर अधोरेखित केली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची एकूण राजकीय वाटचाल अतिशय संयत पद्धतीने सुरू आहे. विशेषतः गेल्या साडेचार वर्षांतील काळात त्यांनी आपले नेतृत्व पूर्णपणे  सिद्ध करून दाखवले. राजकारणात सगळय़ाच घटना आपल्या मनानुसार, आपल्याला हव्या त्या वेळी घडत नसतात. काही अचानक घडतात तर काही घडण्याची वाट पाहावी लागते. या घटनांचा योग्य वेळी योग्य राजकीय लाभ जो घेतो तो खरा यशस्वी राजकीय नेता ठरतो. उद्धव ठाकरे यांनी गेल्या साडेचार वर्षांत आपले नेतृत्वगुण तर सिद्ध केलेच आहेत, पण त्याचवेळी भाजपबरोबर युती करून आपण परिपक्व नेता असल्याचेही दाखवून दिले आहे. येणाऱ्या काळात त्याच जोरावर महाराष्ट्राच्या मंत्रालयावर शिवसेनेचा भगवा फडकेल अशी खात्री मराठी माणसाने बाळगायला हरकत नाही.

[email protected]