श्री शंकरगाथा : अनोखा ‘भावबंध’

श्रीशंकर महाराज अतिशय गोष्टीवेल्हाळ होते. त्यांच्या भक्तांचे पूर्वसंचित दांडगे असावे. कारण श्रीशंकर महाराजांच्या रूपाने साक्षात परमेश्वराशी संवाद साधण्याचा अपूर्व भाग्ययोग त्यांना लाभला. सोलापूर असो वा नगर, पुणे असो वा नाशिक, श्रीमहाराजांची भ्रमंती सदासर्वकाळ सर्वत्र चालू असे. कुणाही भक्ताच्या घरी पूर्वसूचना न देता ते खुशाल अवतीर्ण होत असत आणि त्यांचे अवचित येणे त्या भक्तासाठी आनंदाचा ‘सोहळा’ असे. विविध प्रकारच्या भक्तांशी विविध नात्यांनी ते बांधले गेले होते. कुणासाठी माऊली तर कुणासाठी सद्गुरू. त्यांच्या सहवासामध्ये भक्तवर्ग अनुभवाने ‘समृद्ध’ होत असे, भक्तिप्रेमाच्या आनंदवर्षावाने ‘धन्य’ होत असे.

श्रीशंकर महाराज अनेकदा त्यांच्या काही निवडक भक्तांना अंतरीचे ‘गूज’ सांगत असत. असेच एकदा त्यांनी स्वतःच्या पूर्ववृत्तांताविषयी एक आगळीवेगळी कथा सांगितली. श्रीमहाराजांच्या अष्टावक्रतेविषयीचा संदर्भ निघाला असता, त्यांनी श्रीस्वामी समर्थांविषयीचे त्यांचे नाते अलवारपणे उकलताना सांगितले, ‘माझे माता-पिता वृद्ध होते. एकदा मला घेऊन ते पंढरीस जात असताना मला प्लेगच्या साथीने घेरले. अवचित बसलेल्या या प्लेगच्या तडाख्यामुळे माझ्या शरीरावर चार गोळे उगवले हे पाहून माता-पिता घाबरले. माझे कसे होणार? याची चिंता त्यांच्या चेहऱयावर मला जाणवली तेव्हा मी माझ्या ‘स्वामी’माऊलीचे स्मरण केले असता, स्वामी लागलीच धावून आले अन् हाती सुदर्शनचक्र घेऊन त्यांनी चारही गोळे कापून काढले. याच कारणाने आठ ठिकाणी वाकडेपण आल्याने मी ‘अष्टावक्र’ झालो.’ श्रीशंकर महाराजांचे हे बोलणे गूढ होते. या प्रसंगातून त्यांना नक्की नेमके सुचवायचे होते हे आपल्या अल्पबुद्धीला समजणे जरी अवघड असले तरी या छोटय़-छोटय़ा प्रसंगातून श्रीमहाराजांचे श्री स्वामी महाराजांवर असलेले प्रेम आणि त्यांच्याविषयीची मात्र समजून येते.

श्रीशंकर महाराजांच्या अवतारकार्यामध्ये आणि अक्कलकोटस्थ श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या अवतारकार्यामध्ये कमालीचे साम्य आढळते. एकदा अक्कलकोटच्या खासबागेमध्ये विश्रांती घेत असताना, एकाएकी श्रीस्वामी समर्थ महाराज तेथून उठले. त्याचवेळी तेथील झुडपांमध्ये एक नाग अवतीर्ण झाला. श्रीमहाराज नागराजापाशी गेले आणि ‘हा फार मोठा माणूस आहे बरे!’ असे सांगून सर्व भक्तांना त्या नागराजांस नमस्कार करावयास सांगितला, त्यानंतर तो नाग तेथून गेला आणि झाडाझुडपांमध्ये दिसेनासा झाला. श्रीस्वामी महाराजांच्या अवतारकार्यामध्ये घडलेला हा प्रसंग थोडय़ाफार फरकाने श्रीशंकर महाराजांच्या लीलाप्रसंगामध्येदेखील घडल्याचे दिसून येते.

एकदा श्रीशंकर महाराज एका भक्ताच्या घरातील बागेमध्ये अन्य भक्तमंडळींसह बसले असता एकाएकी तेथे बराचसा गोंधळ आणि हलकल्लोळ झाल्याचे त्यांच्या कानी आले. अवचितरींत्या उडालेल्या त्या गडबडीचे कारण तिथे प्रकट झालेला एक नागराज होता. भल्या मोठय़ा आकाराचा सळसळ वेगाने पळणारा नाग पाहून तिथल्या गडीमाणसांनी त्याला मारण्याचे ठरविले. जो तो, जे काही हाती लागेल ते घेऊन नागाला मारण्यासाठी त्याच्या मागे पळू लागला हे पाहून श्रीशंकर महाराज लगोलग उठले आणि नागाच्या दिशेने गेले.

लोकांच्या गलबल्यामुळे नाग बिथरला होता. मोठमोठय़ाने फूत्कार टाकीत तो सैरावैरा पळत होता, मात्र श्रीमहाराजांच्या येण्याची चाहूल लागताच तो श्रीमहाराजांना सामोरा गेला आणि त्यांच्या चरणांना विळखा घालून फणा काढीत श्रीमहाराजांच्या मुखकमलाकडे पाहात राहिला. हे दृश्य पाहून अवतीभवती जमलेली भक्तमंडळी जीव मुठीत घेऊन तटस्थ उभी राहिली. लांबरुंद आणि भलामोठा असा नागराज श्रीमहाराजांना वेढून घेता झाला तेव्हा त्याने उगारलेल्या फण्यावरून श्रीमहाराजांनी अतिशय हळुवारपणे अन् प्रेमाने हात फिरवला. त्यास मायेने आंजारले-गोंजारले तोपावेतो नागराज शांत झाला आणि खाली उतरून तो श्रीमहाराजांच्या चरणांशी बिलगला. श्रीमहाराजांनी त्यास आपल्या हाती धरले आणि जवळच्या झाडीझुडपात नेऊन सोडले. हे दृश्य तेथील उपस्थित मंडळींसाठी अकल्पित होते हे निःसंशय.