गणेशपुरीचा ‘योगी’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रहस्यकथाकार बाबुराव अर्नाळकर लिखित चरित्रामुळे मराठी माणसाला माहीत झालेल्या श्रीनित्यानंद स्वामींचा हा पूर्वपरिचय.

बुद्धगयेच्या अक्षय्य वटवृक्षाखाली बालयोगी रामन कुट्टीचे तपश्चर्येच्या निमित्ताने बरेच वास्तव्य झाले. पुढे श्रीगुरूंनी दिलेल्या संकेतानुसार त्याची पावले हिमालयाच्या दिशेने वळली. बद्रीकेदार, कैलास, मानसरोवर, महर्षी व्यासांचा आश्रम अशा अनेक ठिकाणी भ्रमंती करीत व तेथील अलौकिक अनुभव प्राप्त करीत रामन कुट्टी दऱ्याखोऱ्या अन् महाकाय पर्वतांचे बेलाग कडे उल्लंघून तिबेट, चीन, जपान, कोरिया, मलाया, ब्रह्मदेशादी देशांमधून स्वांतसुखाय मार्गक्रमण करीत आणि ठिकठिकाणचा अनुभव गोळा करीत सिंगापूर येथे आला.

त्याकाळी सिंगापूर येथे ब्रिटिशांचे लष्करी ठाणे होते. रामन सहजच तिथल्या एका बंदरावरील युद्धनौकेपाशी गेला. तेथे मजूर आणि खलाश्यांच्या भरतीचे काम चालले होते. रामनदेखील तेथे मजूर म्हणून आला असावा अशी समजूत झाल्याने त्याला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. डॉक्टरने रामनच्या छातीवर स्टेथॉस्कोप ठेवला. मात्र त्याला रामनच्या हृदयाची धडधड ऐकू येईना. त्याला आश्चर्य वाटले. वय लहान असले तरी रामनची देहयष्टी भरदार आणि पुष्ट होती. आजारपणाचे काही लक्षणही दिसत नव्हते, असे असताना हृदयाचे आणि नाडीचे ठोके ऐकू न येणे ही सर्वांसाठी धक्कादायक बाब होती, मात्र रामनने ‘ही गंमत आपणच करीत होतो’ असे सांगून तेवढ्यावरच तो विषय संपविला असला तरीदेखील जहाजावर काम करणारी मंडळी ही गोष्ट बरेच दिवस चघळत राहिली.

रामन जहाजावरील सर्व कामे करीत असे अन् निवांत वेळेस ध्यानधारणा करीत असे. सिंगापूरहून निघालेले हे जहाज काही दिवसांनी श्रीलंकेच्या कोलंबो बंदराला लागले. रामन कुट्टी श्रीलंकेतील सर्व (विशेषतः रामायणाचा संदर्भ असलेला) परिसर फिरला आणि अखेरीस सर्वांचा निरोप घेऊन कोलंबो ते कोचीन असा प्रवास करीत मायदेशी परतला अन् कोयलांडी येथे ईश्वरअण्णांच्या समोर उभा ठाकला. बुद्धगयेपाशी सोडून आलेल्या लहानग्या रामन कुट्टीची ‘छबी’ ईश्वरअण्णांच्या आठवणीत घट्ट रुजलेली होती. रापलेला, काळ्या-सावळ्या वर्णाचा आणि लोखंडाच्या कांबीप्रमाणे घट्ट पीळदार देहयष्टी लाभलेला रामन कुट्टी त्यांना चटकन ओळखता आला नाही तरीदेखील त्याचे तेजस्वी पाणीदार डोळे पाहून ईश्वरअण्णा चटकन पुढे झाले आणि त्यांनी रामनला मिठीत घेतले. त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. छातीशी कवटाळलेल्या रामनच्या मस्तकाचे चुंबन घेणाऱ्या ईश्वरअण्णांच्या मुखातून उत्स्फूर्तपणे शब्द प्रकटले ‘नित्यानंद’..‘नित्यानंद’

ईश्वरअण्णांच्या मुखातून स्फुरलेले ‘नित्यानंद’ हे शब्द रामन कुट्टीच्या ‘ओळखीची खूण’ बनले. ‘नित्यानंद’ हे नाव ईश्वरअण्णा यांच्या रामनवरील निरपेक्ष प्रेमाचे प्रतीक होते म्हणूनच रामन कुट्टी याने स्वतःच्या नावाची ओळख पुसून ‘नित्यानंद’ हे नाव धारण केले.

नित्यानंद काही काळ कोयलांडी येथे राहून अण्णांची सेवा करीत आणि श्रीगुरुसंकेत प्राप्त होताच दूरवर कुठेतरी साधनेकरिता निघून जात. काही काळानंतर, नियतीच्या संकेतानुसार सन 1915 मध्ये नित्यानंद आणि ईश्वरअण्णा यांच्यातील भावबंधाचे हे सहजसुंदर धागे तुटले. अण्णांनी देह ठेवण्याआधी त्यांच्या मिळकतीमधील काही भाग नित्यानंदांसाठी राखून ठेवला होता. मात्र त्यातील एकाही पैशास हात न लावता नित्यानंद तेथून निघाले आणि केरळ प्रांताच्या दुसऱ्या टोकाला कान्हनगड परिसरातील ‘तपोवन’ या सिद्धक्षेत्रावर तपसाधनेत रममाण झाले. तपोवन येथे नित्यानंदानी आत्मिक बलाच्या योगाने जलप्रवाह निर्माण केला व त्यास ‘पापनाशिनी गंगा’ असे नाव दिले अन् ‘जो या तीर्थावर स्नान करेल त्याची पापे दूर होतील’ अशी ग्वाही दिली. येथेच नित्यानंद यांना अष्टसिद्धी प्राप्त झाल्या. या अष्टसिद्धी देवता स्वरूप प्रकट झाल्या तेव्हा त्यांना बसण्याकरिता नित्यानंद यांनी आठ दगड मांडले ते आजही तपोवनामध्ये पाहावयास मिळतात. याच कान्हनगड परिसरात नित्यानंद स्वामींनी अंगभूत सिद्धीसामर्थ्याच्या जोरावर साधकांच्या तपसाधनेकरिता 43 गुहा बांधलेल्या आहेत.

तपोवनाहून नित्यानंद पुन्हा कोयलांडी येथे आले, मात्र तोवर त्यांच्या लीला चमत्कारांच्या अनेकविध कथा सर्वत्र सर्वदूर पसरल्यामुळे जिथे तिथे जो तो भक्त आपापल्या भौतिक समस्या घेऊन नित्यानंदांपाशी येता झाला. ही अनावश्यक उपाधी टाळण्यासाठी नित्यानंदांनी तिथून कन्याकुमारीला प्रयाण केले आणि तेथे काही दिवस राहून ते उडपी येथे आले. उडपी येथील श्रीकृष्ण मठ व अनंतेश्वर महादेवाचे पांडवकालीन मंदिरही पूर्वापार प्रसिद्ध आहे. नित्यानंद स्वामींच्या हातून सहजगत्या घडणाऱ्या लीलांमुळे उडपी गावातील मंडळी त्यांची भक्त बनली. त्यातही, ‘डॉ. कोब्राबेल’ नावाच्या एका भक्ताने नित्यानंदांना आपल्या घरी नेले आणि बहुत काळपर्यंत त्यांची मनोभावे सेवा केली.

डॉ. कोब्राबेल यांच्या घरी नित्यानंद नित्य मौन बाळगून, ध्यानधारणा करण्यात मग्न असत. लहर आल्यास खाणाखुणा करून संवाद साधणाऱ्या नित्यानंदांना खाण्यापिण्याचे अन् अंगावरच्या कपडय़ांचेही भान नसे. डॉक्टरांच्या घरातील मंडळी नित्यानंदांना लंगोट नेसवणे, खाऊपिऊ घालणे आदी जबाबदारी पार पाडत. उडपी येथे स्वामींचे बरेच वास्तव झाले. नित्यानंदांची कृपा प्राप्त झालेल्या घराण्यातील अनेक भक्तमंडळी पुढे हॉटेल व्यवसायात आली. आजदेखील त्यांच्या हॉटेल्सची ओळख ‘उडपी’ हॉटेल म्हणूनच सांगितली जाते.

उडपी येथून निघालेल्या नित्यानंद स्वामींनी पुन्हा एकदा उचला, मंगळूर, मुलकी, कुंबला, पावंजा, पडबिद्री अशी भ्रमंती सुरू केली. आपल्यातील सिद्ध-सत्पुरुषत्वाची ओळख देणाऱ्या नित्यानंद स्वामींचा भक्तपरिवार शतपटीने वाढता झाला. एकदा मंगळूर येथे भक्ताघरी मुक्कामास राहिलेल्या नित्यानंद स्वामींनी सहज समाधीमध्ये प्रवेश केला. हृदयाचे ठोके अनियमित झाले आणि नाडी मंद पडू लागली तशी काही क्षणातच बाबांचा देह चेतनाहीन झाला. सर्वत्र हलकल्लोळ माजला. बाबांनी समाधी घेतल्याचे वृत्त कळताच भक्तमंडळी जमा झाली. समाधी देण्यासाठीची तयारी सुरू झाली, एवढय़ात नित्यानंदांनी डोळे उघडले. देह सचेतन झाला. भक्तांसाठी ही अद्भुत घटना होती.

1930 च्या दशकामध्ये मुंबई व ठाणे परिसरांतील वसई, विक्रोळी, कुर्ला, कान्हेरीगुंफा येथे आपले अस्तित्व दाखविणारे नित्यानंद स्वामी पुढे 1933 साली वसई येथील वज्रेश्वरीदेवीच्या मंदिरामागे गोधडेबुवांच्या समाधीपाशी मुक्काम करते झाले. अंगावर फाटकीशी घोंगडी व कमरेस लंगोटी लावलेल्या अवस्थेत आलेले नित्यानंद स्वामी तिथे कायमचे राहिले आणि 8 ऑगस्ट 1961 रोजी समाधीस्थही झाले. नित्यानंदबाबांनी वज्रेश्वरी येथील गरम पाण्याची कुंडे स्वच्छ करून बांधून काढली. रामेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला अन् पुढे जवळच्याच भीमेश्वर मंदिराच्या साक्षीने स्वहस्ते वसवलेली ‘गणेशपुरी‘ आज लाखो भक्तांचे ‘श्रद्धास्थान’ म्हणून ओळखली जाते. (उत्तरार्ध)