ठसा – निर्यातदार उद्योजक घडविण्याचे कार्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> श्वेता कपडेकर

सपने इतने छोटे मत देखो
कि खुद को खुद पर ही शर्म हो,
सपने इस तरह देखो कि,
पूरे देश को गर्व हो…!

काही लोकांची स्वप्नं ही वैयक्तिक नसून देशप्रेमाशी निगडित असतात. असाच एका छोटय़ा गावात जन्म व शिक्षण घेऊन आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर ख्याती मिळवणारा एक अवलिया आहे. एक लाख नवीन एक्सपोर्टर घडवून आणण्याचा ध्यास असलेले हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणजे श्रीकांत लचके. साधारणतः एक्स्पोर्ट इम्पोर्ट क्षेत्र म्हटले की, सामान्यतः मराठी मध्यमवर्गीय कुटुंबाला खूप अप्रूप वाटते, अप्रूपपेक्षा भीती वाटते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपला टिकाव सोडा, आपण व्यवसाय सुरुवात करणे म्हणजे एक दिव्य स्वप्न वाटते.

सातासमुद्रापार माल पाठवायचे म्हणजे आवाक्याबाहेरची गोष्ट. पैसे बुडाले तर? आपला माल कोण घेईल? काही चूक झाली तर? महत्त्वाचे म्हणजे आपण मराठी मीडियमचे, इंग्लिश व्यवहार व आंतरराष्ट्रीय कायदे समजतील का? अशा एक ना अनेक भीतीवजा गोष्टी मनात गोंधळ घालत असतात. असे असताना महाराष्ट्रातील अतिशय ग्रामीण भाग मोखाडा (जिल्हा – पालघर) येथून मराठी शाळेत शिकणारा एक सर्वसामान्य मुलगा श्रीकांत लचके हा वयाच्या 34 व्या वर्षी एक्स्पोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये आमूलाग्र प्रगती करत एक्स्पोर्ट इंडस्ट्रीला सक्षम बनवण्यासाठी जागतिक दर्जाचे The Exim Times न्यूज मीडिया बनवतो. एक्स्पोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीसाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बनवतो. हिंदुस्थानी वस्तूंना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत एक विशिष्ट ओळख व्हावी म्हणून मेड इन स्वदेशी चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ऑग्रिकल्चरची स्थापना करतो. मोखाडा गावात साकारल्या जाणाऱया वारली पेंटिंगला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत योग्य मोबदला कसा मिळेल या गोष्टीचा पाठपुरावा करताना लचके यांनी पुणे येथे एमबीएला (इंटरनॅशनल बिझनेस) दोन वर्षे यावर रिसर्च केले. पुढे दिल्लीला जाऊन आंतरराष्ट्रीय संघटनेबरोबर काम करून अनुभव घेतला व त्यानंतर निर्यातदार उद्योजक बनविण्याचा ध्यास घेऊन त्यादृष्टीने काम सुरू केले. यात एक्स्पोर्ट कंपनी कशी उभारावी यापासून नेमके कोणते प्रॉडक्ट जागतिक बाजारात चालतील व कसे आपण ग्राहकापर्यंत घेऊन जायला पाहिजे व योग्य नफा कमवून आपला व्यवसायाचा विस्तार विविध देशांत करावा याचे फक्त ट्रेनिंग न देता प्रत्यक्षात घडवून आणण्यास त्यांच्याबरोबर लीडर म्हणून काम केल्याने आतापर्यंत 300 कंपनी व 6000 वरून जास्त निर्यातदारांना मार्गदर्शन करून एक प्रकारे अनेक रोजगार उत्पन्न केले आहेत. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याहस्ते त्यांना अर्थसंकेत प्रस्तुत ‘महाराष्ट्र गौरव 2021’ या पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.

श्रीकांत लचके म्हणतात, व्यावसायिक होण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण मनाने खूप खंबीर पाहिजे. कारण अनेक वादळं आपली प्रतीक्षा करत असतात व वादळं जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजून राहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघून जातात. वादळ महत्त्वाचे नसते, प्रश्न असतो आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱया अवस्थेत बाहेर येतो याचा. अशी अनेक वादळे आयुष्यात अनुभवण्यास मिळाली. मुख्यतः आर्थिक चढउतार हे प्रत्येक व्यवसायात असतात, पण संघटनेपेक्षा वैयक्तिक हेवेदावे वरचढ झाल्यास आपल्या संघटनेला अडचणीचे ठरतात. परिणामी आपल्याला कडक भूमिका घेऊन एक योग्य लीडरशिप दाखवणे आवश्यक असते. आज मागे वळून बघताना सर्व काही ‘मकतूब’ म्हणजे ‘नशीब लिखा जा चुका है!’ असे त्यांना वाटते. खूप काही चांगले घडत असताना, खूपदा चुका पण झाल्या, अनेक वेळा आपले लोक दुखावले गेले, खूप चांगले लोक जोडले गेले. कठीण काळात त्यांची पत्नी खंबीरपणे उभी राहिली व किशोर माळीसारखे विश्वासू सहकारी लाभल्याने इथपर्यंतचा पल्ला गाठता आला असे ते विनम्रपणे सांगतात.