लेख – देणे समाजाचे?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप जोशी  

बऱ्याच वर्षांपूर्वीची एका इंग्लिश वृत्तपत्रात अगदी सात-आठ ओळींची छोटीशी बातमी आली होती. त्या इवल्याशा वृत्ताकडे कुणाचंही दुर्लक्ष होणं सहजशक्य होतं, पण शीर्षक वाचलं नि थबकलो. बातमी म्हणत होती की एखादं आवडीचं सामाजिक, रचनात्मक काम करणाऱ्यांचं आयुष्यमान वाढतं आणि मनःस्थितीही उत्तम राहते. आपल्या व्यक्तिगत जीवनाच्या परिघापलीकडे जाऊन इतरांसाठी निःस्वार्थ बुद्धीने काही कार्य करण्यातला आनंद अवर्णनीय असतो. अशा मंडळींचा उत्साह खूप दिवस टिकतो. ते सहसा उदास, निराश होत नाहीत. एखादं अपयशही त्यांना काही शिकवून जातं आणि तो पराभव न मानता ते आव्हान समजून ही माणसं पुन्हा नव्या जोमाने कामाला लागतात.

‘आंतरराष्ट्रीय समाजसेवक दिवस’ 5 डिसेंबरला झाला. त्या निमित्ताने काही वाचत असताना हे आठवलं आणि बरं वाटलं. त्या बातमीचं कात्रण बराच काळ जपूनही ठेवलं होतं आणि एका विज्ञान संस्थेसाठी असंच काम करताना नव्याने येणाऱ्या अनेक नवतरुणांना ते सांगत असे.

‘जीवनात चार क्षण। देऊ तन-मन-धन ।।

फेडू समाजाचे ऋण। कणभरी ।।’

अशा ओळी त्यावेळी सुचल्या होत्या. याचीच कृतीशील प्रचीती खगोल मंडळाचं काम करताना गेल्या 36 वर्षांत अनेकदा आली. प्रत्येक वर्षी येणाऱ्या तरुण मंडळींच्या आणि आम्हा सुरुवातीपासूनच्या कार्यकर्त्यांच्या वयात पाच-दहा करता करता 35-40 वर्षांचा फरक पडत गेला. पहिल्या फेरीतल्या तरुणांची तर आता साठीकडून सत्तरीकडे वाटचाल सुरू झालीय. तरी 16 ते 20 वयोगटातल्या तरुणांशी संवाद साधता येतोय. काळाबरोबर अजून तरी चालता येतंय याचं खूप बरं वाटतं हे खरंच.

आमचं काम तसं शाळाबाहय़- कॉलेजबाहय़ शिक्षण क्षेत्रातलं. खगोल विज्ञानातील अनेक गोष्टी आम्ही समूहाने शिकलो आणि शिकवल्या. त्यातले काही जण स्वकर्तृत्वावर जागतिक पातळीवरच्या खगोल संशोधनात आणि खगोलशास्त्र जनसामान्यांपर्यंत नेण्याच्या उपक्रमात चमकले. अनेकांनी खगोलीय विषयांमध्ये डॉक्टरेट प्राप्त केली. हे त्यांचं यश अर्थातच वैयक्तिक परिश्रमातलं होतं, परंतु संस्थेत असताना त्यांनी ‘व्हॉलन्टीअर’ म्हणून केलेलं काम खूप मोलाचं ठरलं. त्यातून वेगवेगळय़ा ठिकाणी अनेक यशस्वी ‘शिक्षक’ निर्माण झाले.

तरी आमचं काम अगदीच लहान स्वरूपाचं. जगात हिंदुस्थानात आणि विशेषतः महाराष्ट्रात स्वयंसेवी पद्धतीने समाजसेवेचं क्रत चालवण्याची संख्या खूपच मोठी आहे. यातल्या काही शतायुषी संस्था आजही कार्यरत आहेत, तर काही संस्थांनी त्या त्या काळात समाजमन सजग करण्याचं कार्य तळमळीने केलं आहे. आजही अशा संस्था आणि व्यक्ती ठायी ठायी आढळतात. जाणून घेण्याची दृष्टी मात्र हवी. एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात तर महाराष्ट्रात सामाजिक जाणिवा जागृत करणाऱ्या अनेक संस्थांनी आणि त्यांच्या प्रसिद्ध धुरिणांनी समाजमनावर आपला अमीट ठसा उमटवला. विविध क्षेत्रांत त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा एवढय़ा छोटय़ा लेखात घेणं शक्य नाही.

मात्र ‘आपण काय करू शकणार?’ असं कुणाला वाटू नये. समाजाचं ऋण फेडताना त्याचं मोजमाप नसतं. क्षणभर आणि कणभर जरी ते करता आलं तरी किती आनंद देतं ते स्वतःच अनुभवायला हवं. कुठेही गाजावाजा न करता विविध क्षेत्रांत असं कार्य करणारी मंडळी सर्वत्र आढळतात. त्यांना त्यांनी हाती घेतलेल्या कामाची जाणीव असते, त्यातल्या उणिवा माहीत असतात. आपलं बलस्थान आणि मर्यादा जाणून आत्मविश्वासाने अशी माणसं उभी राहतात. त्यातली काही जगावर, समाजावर छाप पाडणारं अद्वितीय कार्य करून इतिहासात अमर होतात.

त्यांची प्रेरणा हीच वर्तमानातील असं काम करू इच्छिणाऱ्यांना आंतरिक बळ देत असते. व्हॉलन्टीअर होऊन काम करताना नकळत समूहमनाशी जोडलं जाऊन व्यक्तिमत्त्व विकास होतो. तो अनेकांचा होताना प्रत्यक्ष अनुभवला  आणि त्याचा व्यक्तिगत जीवनात सकारात्मक लाभही होतो असं सांगणारी ती बातमी आठवली म्हणून हा शब्दप्रपंच. कल्याणच्या ‘व्हेबग्योर’ संस्थेचे स्वयंसेवक दरवर्षी असे चांगले कपडे गोळा करून ‘गुंज’ संस्थेला देतात.

[email protected]