आभाळमाया : सूर्याच्या भेटीला ‘लाखो’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>वैश्विक<<

[email protected]

संक्रांत झाली. दिवस मोठा होऊ लागला. तसा तो 22 डिसेंबरपासूनच ‘मोठा’ होऊ लागला होता. आता 21 जूनपर्यंत पृथ्वीचा उत्तर गोलार्धातला ‘डे टाइम’ वाढत जाईल. वसंत ऋतूची चाहूल लागेल. युरोप आणि उत्तर ध्रुवाजवळच्या प्रदेशात थोडं उबदार वातावरण तयार होईल. आपल्या देशातला या उन्हाळय़ाचा बराचसा भाग ‘पावसाळा’ नावाच्या ऋतूने व्यापलेला असल्याने उन्हाचा ‘ताण’ आपल्याला कमी जाणवतो. तरीही आता मार्च ते मे आणि नंतर ऑक्टोबरात सूर्याचा ‘प्रताप’ आपल्या सहनशक्तीचा अंत पाहील. हे सगळं वर्षानुवर्षे घडत आलंय. आता सूर्य उत्तर गोलार्धात आपल्या ‘भेटी’ला आलेला असताना तिकडे ‘युजिन पार्कर’ अभियान (प्रोब) सूर्याच्या जवळ जातंय.

सूर्याचा ‘वेध’ घेण्यासाठी असा ‘प्रोब’ प्रथमच नासा’ने पाठवला आहे. सूर्याचा विस्तार (व्यास पृथ्वीच्या 110 पट आहे. त्याचं तापमान त्याच्या गाभ्यात दीड कोटी केल्विन (सेल्सियस) तर पृष्ठभागावर 5 ते 6 हजार सेल्सियस इतकं आहे. अशा या तप्त वायुगोलकाच्या ऊर्जेवरच आपलं जीवन अवलंबून असून पाच अब्ज वर्षांपूर्वी सूर्याचा ‘उदय’ झाला नसता तर आपली ग्रहमाला आणि पृथ्वीही नसती. थोडक्यात, सूर्य आपला ‘जीवनदाता’ आहे.

अशा या जनक ताऱ्याचं जवळून दर्शन घ्यावं म्हणजे त्याच्या बाहय़ वातावरणाचा खूप जवळून अभ्यास करावा यासाठी ‘पार्कर प्रोब’ कार्यान्वित झाला आहे. सूर्याच्या अगदी अंतरंगाचीसुद्धा सैद्धांतिक माहिती वैज्ञानिकांना असली तरी प्रत्यक्ष सूर्याच्या वातावरणाला ‘स्पर्श’ करून विशेष प्रयोग करण्याचं काम ‘पार्कर प्रोब’ला करावं लागणार आहे. एकंदर 24 वेळा हे यान सूर्याच्या वातावरणातून प्रवास करील. अतिशय उष्णता सहन करून सौर वारे, सौर ज्वाला इत्यादींचा अभ्यास त्याकडून अपेक्षित आहे.

29 ऑक्टोबर 2018 रोजी ‘पार्कर’ यानाने सूर्यापासून अगदी जवळ म्हणजे 4 कोटी 30 लाख किलोमीटरपेक्षाही नजीकच्या सौर भागात प्रवेश केला. हे अंतर महत्त्वाचं असण्याचं कारण म्हणजे यापूर्वी 1976 मध्ये हेलिऑस-2 या यानाने एवढय़ा ‘जवळून’ सूर्यदर्शन घेतलं होतं. आपला सूर्य आपल्यापेक्षा 15 कोटी किलोमीटर अंतरावर आहे आणि म्हणूनच प्रकाशाच्या वेगाने त्याचे किरण आपल्यापर्यंत यायला सवाआठ मिनिटं लागतात हे लक्षात घेतलं तर ‘पार्कर’ यानाची ही भरारी किती मोठी आहे हे ध्यानात येईल.

येत्या सात वर्षांत ‘पार्कर’ सूर्याच्या जवळ जाईल. आधी म्हटल्यानुसार चोवीसवेळा या यानाला सूर्याच्या पृष्ठभागाचं टप्प्याटप्प्याने जवळून निरीक्षण करता येईल आणि त्याचे फोटो ते पृथ्वीवर धाडेल. सौर प्रभामंडल किंवा ‘करोना’चा अभ्यासही या सौर ‘जवळिकीत’ समाविष्ट आहे.

आपल्याला सूर्याचं हे प्रभामंडल केवळ खग्रास सूर्यग्रहणाच्या काळात दिसतं. 1980 आणि 1995 च्या खग्रास सूर्यग्रहणाच्या तारखा हिंदुस्थानातील दक्षिण व उत्तर भागातून अनुकूल होत्या. 1980चं खग्रास सूर्यग्रहण दक्षिण हिंदुस्थानातील रायचूर तर 1995चं ग्रहण उत्तर प्रदेशातील हमीरपूर येथून अनुभवण्याचा योग आला. सूर्याची ‘खग्रास’ अवस्था होते तेव्हा विशेष चष्म्यातूनही काहीच दिसत नाही. डोळय़ांची काळजी घेऊन ‘खग्रास’ सूर्य नुसता पाहता येतो. तसाच तो आम्ही अनुभवला आणि त्या काही क्षणात एरवी सूर्यप्रकाशात लोपलेल्या सौर प्रभामंडलाचं तेजस्वी दर्शन घडलं. तो अनुभव अविस्मरणीय असाच आहे.

आता ‘पार्कर’ यान सूर्याच्या जवळात जवळ म्हणजे 60 लाख किलोमीटर इतक्या जवळ जाईल. हा एक विलक्षण विक्रम ठरेल. एवढय़ा जवळून सूर्य न्याहाळण्याचं भाग्य आपल्याला ‘पार्कर’च्या नजरेतून लाभणार आहे. हेलिऑस-2 यान सूर्याकडे पाठवलं गेलं तेव्हा म्हणजे एकोणीसशे ऐंशीच्या दशकात तंत्रज्ञान तुलनेने कमी असल्याने या यानाचा वेग ताशी 247000 किलोमीटर होता. आता आपण 2025 पर्यंतचा विचार करतो तेव्हा ‘पार्कर’चा सूर्यसापेक्ष वेग हेलिऑस-2 पेक्षा अधिक असेल.

माणसाच्या बुद्धिमत्तेची ही मोठीच झेप आहे. असं सर्व तांत्रिक यश प्राप्त करत असताना त्याला ‘हय़ुमन टच’ देण्याचं कामही ‘नासा’ने केलंय. या यानाबरोबर 11 लाख लोक सूर्याच्या वातावरणाला ‘स्पर्श’ करणार आहेत. हे कसं शक्य आहे? ही मंडळी स्वतः तर सूर्याच्या इतक्या जवळ इतक्या संख्येने जाऊच शकणार नाहीत, परंतु 11 लाख 37 हजार 202 लोकांनी आपलं नाव ‘पार्कर’वरून सूर्याकडे पाठवण्यासाठी नोंदवलं होतं. त्याचं मेमरी कार्ड 18 मे 2018 रोजी ‘पार्कर’वर समाविष्ट झालं. कालांतराने युजिन पार्कर प्रोब सुसाट निघाला… आणि ही नावं सूर्यस्पर्श करून ‘पावन’ होणार आहेत… अजूनही त्या नावात भर पडतेय की नाही ते ठाऊक नाही, पण आपल्याकडे सूर्यालाच बारा नावं आहेत. अशा ताऱ्याकडे आपलं नाव पाठवणं हे काव्यात्मक म्हणावं लागेल. विज्ञानाच्या प्रयोगातही अशा हलक्याफुलक्या गोष्टी असतात.