आभाळमाया – अंतराळी ‘लॉज’!

627

>> वैश्विक ([email protected])

अंतराळात पाऊल ठेवून माणसाने केलेला पराक्रम साठीचा झाला. एवढय़ा काळात अनेक देशांची अनेक यानं पृथ्वीभोवती फिरू लागली. पन्नास वर्षांपूर्वी चंद्र पादाक्रांत झाला आणि चंद्र-मंगळावर वस्ती करण्याचे किमान तिथे ‘ट्रीप’ नेण्याचे मनसुबे  रचले जाऊ लागले, एकूणच विश्वरचनेचा अभ्यास आणि अंदाज माणसाला आला, यात पुढे बदल होतील विश्वाची रचना आणखी किती गुंतागुंतीची आहे वगैरे समजेल. विविध वेगवान यानं कदाचित शंभर-दोनशे वर्षांनी माणसाला सूर्यमालेचीही सफर घडवून आणतील. अशा अनेक संभाव्य घटनांच्या आरंभाचे आपण साक्षीदार आहोत ही किती भाग्याची गोष्ट. माणूस अंतराळात गेल्यापासून ते कृत्रिम मानव अंतराळवीर म्हणून पाठवण्यापर्यंतची प्रगती आपण ऐकली, पाहिली.

आपला देशही चांद्रमोहीम पुन्हा आखणार आहे असं ‘इस्रो’चे अध्यक्ष सिवन यांनी नुकतेच सांगितले. चांद्रयान-2 च्या मर्यादित यशामुळे खचून न जाता नव्या उमेदीने नवा प्रकल्प हाती घेणं हाच वैज्ञानिक दृष्टिकोन असतो. आपल्या पुढच्या मोहिमा यशस्वी होतील आणि कालांतराने अनेक देश, खासगी संस्था, माणसांना अंतराळात पाठवण्याचं काम सहजतेने करू लागतील. 1903 मध्ये राईट बंधूंचे ‘फ्लायर’ हे प्राथमिक स्वरूपाचं पहिलं यंत्रयान उडालं तेव्हा कुठे माहीत होते की, सत्तरच्या दशकात ‘सुपरसॉनिक’ विमानंही आकाशात झेपावतील! आता तर पृथ्वीवरच्या वेगाच्या बाबतीत वेगक्रांती घडवणार आहे ते हायपरलूप! दिवसभरात पृथ्वीप्रदक्षिणा करून घरी परतण्याचा काळ फार दूरचा नाही आणि अंतराळात सुखाने वस्ती करण्याचाही!

त्याची जय्यत तयारी सुरू आहे. ‘नासा’ने ‘एअरोस्पेस’च्या सहकार्याने एक फुगून आकार धारण करणारं (इन्फ्लेटेबल) ‘लॉज’ बनवायचं ठरवलं आहे. चंद्र-पृथ्वी कक्षेमध्ये जाताना अंतराळात उतरण्यासाठी असं ‘हॉटेल’ स्पेस स्टेशनला जोडता यावं याविषयी संशोधन सुरू आहे.

असं ‘लॉज’ बनवण्यासाठी पाच कंपन्यांनी तयारी दाखवली असून ‘बिंजलो एक्स्पेरिमेन्टल ऑक्टिव्हिटी मोडय़ुल’ 2016 मध्येच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाशी ‘जुळणी’ करून त्यासोबत तरंगत होतं. एखादं महत्त्वाचं यान (प्रोब) चंद्र किंवा मंगळाच्या पृष्ठभागावर पाठवताना ते भक्कम फुग्यासारख्या वस्तूतून पाठवले किंवा त्याच्या भोवतीचा फुगा ते यान उतरताना फुगवला तर इतर ग्रहांवरच्या भूपृष्ठावरून चेंडूसारखं ‘बाऊन्स’ होऊन वेग कमी करत मूळ यान सुखरूप नेण्याचे यशस्वी प्रयोग ‘पाथफाइंडर’च्या वेळी झाले आहेत.

आता अंतराळप्रवासी ‘मजेत’ राहू शकतील अशी फुग्यासारखी प्रसरण पावणारी ‘लॉज’ बनवून ती अंतराळात सोडली तर चंद्र-मंगळावर सामग्री पाठवणं, तिथे जाणाऱ्यांना ‘प्रवाशांना’ मदत करणं सोपं होईल असं संशोधकांना वाटतं. ‘नासा’चे संशोधक माइक जर्नार्ड यांनी याबाबत पुढाकार घेतला आहे. ते म्हणतात की, ‘अशा लॉजचं स्वरूप कसं असावं किंवा नसावं’ यावर ऊहापोह सुरू आहे.

रॉबर्ड बिंजलो या धनाधीशाने नेवाडातील लास वेगास (कॅसिनोचं शहर) त्यांच्या बिंजलो एअरस्पेस कंपनीतर्फे बनवलेल्या अशाच एका ‘लॉज’ची पाहणी ‘नासा’च्या अंतराळयात्रींनी केली. बिंजलो कंपनीने बनवलेलं बी-330 हे लॉज ‘घडी’ करून रॉकेटद्वारे अंतराळात धाडण्यात येईल. कापडासारख्या पण टिकाऊ गोष्टीपासून ते बनवलेलं असल्याने सहजासहजी फाटणार नाही. या ‘मटेरिअल’मध्ये प्रवाशांचा स्पेसमधील किरणोत्सर्गापासून बचाव करण्याची शक्ती असेल. त्याचबरोबर अंतराळातील वेगाने येणारे दगडगोटे त्यावर आदळले तरी ते सहन करू शकेल.

अशा एका ‘लॉज’ची निर्मिती 1 अब्ज डॉलर खर्चून केली जाईल. 2028 पर्यंत अशी अंतराळी  ‘लॉज’ तयार होतील. बिंजल यांच्याप्रमाणेच बोईग, नॉर्थोप, ग्रमन, सिएरा आणि नेवाडा कॉर्पोरेशन तसेच लॉल्हिड मार्टिन या कंपन्यांनीसुद्धा अंतराळी लॉज बनवण्याची तयारी दर्शवली असून सर्वांच्या संकल्पनांवर ‘नासा’ विचार करत आहे.

या लॉजमध्ये छोटं स्वयंपाकघर, बेडरूम, टॉयलेट वगैरे जीवनावश्यक सोयी असतील. बिंजलो बी-330 मध्ये 6 जणांची सोय आणि दोन टॉयलेट असतील. यामध्येही पुढे स्पर्धा होईलच. हिंदुस्थानी कंपन्यांनाही कालांतराने नवे अंतराळ-बिझनेस मिळतील!

आपली प्रतिक्रिया द्या