मुद्दा : शिक्षक आणि विद्यार्थी

88

>>रामकृष्ण पांडुरंग पाटील<<

पूर्वी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना चोपून काढणारा शिक्षक लोकप्रिय होता. शाळेत गुरुजींनी मारल्याची तक्रारही पालक ऐकून घेत नसत. तू अभ्यास केला नसशील म्हणून तुला शिक्षकांनी मारलं असेल. नाहीतर शिक्षक तुझे दुष्मन आहेत का, असे सांगत तक्रार करणाऱ्या मुलालाच बोलत असत. आता तो काळ राहिला नाही. आता आधुनिक युग आलंय. या आधुनिक युगात विद्यार्थी बदलला, पालक बदलला तसेच शिक्षकदेखील बदलला. आज विद्यार्थी शिक्षकांना मान देताना दिसतोय का?  ही आत्मचिंतन करायला लावणारी व विचार करायला लावणारी गोष्ट आहे. द्रोणाचार्यांनी एकलव्याला शिकवणसुद्धा दिली नव्हती, तरीही तेव्हा त्यांचा पुतळा समोर ठेवून एकलव्याने धनुर्विद्या प्राप्त केली. नंतर द्रोणाचार्यांनी एकलव्याकडून गुरुदक्षिणा म्हणून त्याचा उजवा अंगठा मागितला तेव्हा त्याने मागे पुढे न पाहता त्याचा अंगठा गुरुदक्षिणा म्हणून द्रोणाचार्यांना दिला, एवढा आदर ठेवला जातोय का आजच्या काळात शिक्षकांचा? देश खूप प्रगत झालाय व होतोय. आपण प्रत्येकजण सोशल मीडियाच्या जगात वावरतोय. याच सोशल मीडियावर शिक्षकांविषयी जोक्स व कमेन्ट करतोय. आपल्याला ज्यांनी लिहायला वाचायला व जगातल्या घडामोडी सांगितल्या, शिवरायांचा इतिहास शिकवला, भूगोल शिकवला त्यांच्याबद्दल टिंगलटवाळी का केली जाते? त्यांनी आपल्याला जे ज्ञान दिले त्याच्या जोरावर आज आपण इथपर्यंत पोहचलो आहोत आणि आज आपण त्यांची काय परतफेड करतोय त्याचे आत्मचिंतन करावं लागेल. त्यांना मानसन्मान द्यावा लागेल. सोशल मीडियावर टिंगल करणं कुठे तरी बंद करावं लागेल. लहानपणी हेच शिक्षक आपल्याकडून बालगीत म्हणवून घेताना ते स्वतःदेखील मग्न व्हायचे व आपल्यालाही मग्न करायचे. आज तेच त्यांचे विद्यार्थी मोठे होऊन काय करतायत? त्यांनी विचारसुद्धा केला नसेल की आपले विद्यार्थी मोठे झाल्यावर आपली थट्टामस्करी करतील. मी असं म्हणत नाही की सर्वच शिक्षक चांगले आहेत, पण जे आहेत त्यांच्याविषयी तरी आपण संयम पाळायला हवा. आज असेही लोक आहेत की ते आपल्या गुरूंना मानसन्मान खूप देतात. पण ते अपवादात्मक आहेत. अजून वेळ गेलेली नाही. गुरू विद्यार्थ्यांविषयी कधीच राग ठेवत नाहीत. गुरू म्हणजेच शिक्षक कायमच विद्यार्थ्यांना माफ करीत असतात. आता वेळ आली आहे शिक्षकांना मान देण्याची, त्यांचा सन्मान करायची.

आपली प्रतिक्रिया द्या