
>> दिलीप जोशी
आपला ‘संजीवक’ तारा सूर्य कसा आहे त्याची काही माहिती गेल्या लेखात घेतली. आपल्या दृष्टीने सूर्य ही अवकाशातील सर्वात प्रचंड वस्तू. ती खरंच तशी आहे का, हे यानंतरच्या लेखात पाहू, पण यावेळी आपल्या सूर्याचीच आणखी थोडी ओळख.
पावसाळा संपल्यावरच्या थंडीत सूर्याचा ऊबदार प्रकाश कमालीचा सुखावह वाढतो. कोवळय़ा-ताज्या उन्हात बसणं आणि त्याचा आस्वाद घेणं आल्हाददायक तर असतंच, पण तेवढंच आरोग्यकारकसुद्धा. पृथ्वीवरचं एकूणच जीवन म्हणजे सागराचं सतत उसळत राहणं. पाऊस पडणं, पीकपाणी, सूक्ष्म ते महाकाय प्राण्यांपर्यंतच्या प्रजाती, सूक्ष्म एकपेशीय ते प्रचंड वनांपर्यंतची निसर्गसंपदा या सगळय़ाचा निर्माता केवळ सूर्य. कारण मुळात पृथ्वीच सूर्याचं अपत्य आहे. केवळ पृथ्वीच नव्हे, तर अवघी सूर्यमाला सूर्यापोटीच जन्माला आलेली आहे. कारण सूर्याची ऊर्जा उत्सर्जन क्षमता प्रत्येक चौरस मीटरला 164 वॉट एवढी असते. त्यातील अतिनील किरणं आणि ‘ड’ जीवनसत्त्वाचं महत्त्व तर शालेय जीवनापासूनच आपल्याला ठाऊक असतं. झाडांमध्ये हरितद्रव्य किंवा ‘फोटोसिन्थेसिस’ प्रक्रिया सूर्यप्रकाशामुळेच घडते.
सूर्यामध्ये एवढी प्रचंड ऊर्जा निर्माण होण्याचे कारण म्हणजे त्याच्या गाभ्यातली ‘अणुभट्टी’ आहे हेही आपण पूर्वीच जाणलं. या ताऱयाच्या गाभ्यातील मूळच्या हायड्रोजनचं रूपांतर हिलियम वायूत होतं आणि त्या घुसळणीतून प्रचंड उष्णता तसंच प्रकाशकणांची निर्मिती होते हे पूर्वी ठाऊक नव्हतं. सन 1800 मध्ये लॉर्ड केलिन आणि जर्मन संशोधक हर्मन हेमोल्टझ् यांनी असं म्हटलं की, सूर्याच्या बाहय़ भागातील वस्तुमानाचा प्रचंड दाब त्याच्या गाभ्यावर पडून आतील वायू दबल्याने ‘कॉप्रेसर’मध्ये जशी उष्णता तयार होते तशीच तयार होते. त्यातूनच प्रकाश जन्म घेतो. मात्र तेवढेच खरे असते तर केवळ काही लाख वर्षांत त्याचं ‘पतन’ सुरू झालं असतं, पण तो आज पाच अब्ज वर्षांनंतरही तितक्याच ऊर्जेने तळपत आहे.
अर्थात 1800 मध्ये निदान सौर ऊर्जेच्या आधुनिक विचार सुरू झाला व या गोष्टीला चालना मिळाली. पुढं 1905 मध्ये अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडून भौतिकशास्त्र्ाात जी आमूलाग्र क्रांती घडवली, त्याचा परिणाम आपोआप खगोलभौतिकीवरही झालाच. आइन्स्टाईन यांनी मांडलेल्या वस्तुमानाचं ऊर्जेत रूपांतर होण्याच्या सिद्धांतानुसार सूर्यगाभ्यातील हायड्रोजन वायूचं हिलियममध्ये ‘सम्मीलन’ (फ्यूझन) होताना प्रचंड ऊर्जा आणि एकेक ‘फोटॉन’ किंवा प्रकाशकण निर्माण होतो. ‘मॅटर इनटू एनर्जी’ याचा हा प्रत्यक्ष पुरावाच.
तर अशा प्रकारे निर्माण झालेला ‘फोटॉन’चा कण प्रकाशकिरणांच्या रूपाने आपल्याला उजळून टाकतो. सूर्याच्या गाभ्यातील हायड्रोजन हिलियम प्रक्रियेत उष्णतेने अणूंचं आयनायझेशन होतं.
हा सगळा भाग अधिक विस्ताराने सांगायचं तर किचकट वाटेल, परंतु ‘प्रकाश’ सूर्याच्या अंतर्भागात निर्माण होतो आणि तिथून तो प्रकाशकण अनेक दाटीवाटीच्या वायूंच्या गर्दीतून कसाबसा वाट काढत सुमारे सात लाख किलोमीटरचं अंतर पार करायला दहा लाख वर्षे घेतो. अखेर त्याची दमछाक संपते. अनेकदा पुढे-मागे ढकलला गेलेला प्रकाशकण सूर्याच्या पृष्ठभागावर येताच ‘मुक्तते’चा अनुभव घेतो. आता तो वेगवान प्रवासाच्या तयारीत असतो. तिथून तो पृथ्वीवर यायला 15 कोटी कि.मी. पार करून सव्वाआठ मिनिटं घेतो! मग आपण सूर्योदयावरून पहिल्या ‘कोवळय़ा’ किरणाचं स्वागत करतो.
हा ‘किरण’ तोपर्यंत दहा लाख वर्षे आणि सव्वाआठ मिनिटं या वयाचा झालेला अतिअतिवृद्ध असा म्हणावा तसा असतो, परंतु हे झालं त्याचं केवळ वय. तो ‘अजर’ म्हणजे वृद्धत्वाने थकलेला नाही. तो त्याच्या जन्मवेळेइतकाच ताजा आहे. ‘शिळं’ असेल ते त्याचं वय, पण त्याची ऊर्जा सतत ताजीच राहते.
सूर्याच्या गाभ्यातली ही प्रकाशकणांची निर्मिती आपल्याला जगवते. त्यामुळे त्या ‘हिरण्यगर्भ’ सूर्याचं आपण कृतज्ञच असायला हवं. खग्रास सूर्यग्रहणाच्या क्षणी त्याचा ‘करोना’ दिसतो. अनेक ‘स्पाईक’ असलेला आणि चहूबाजूला विखुरलेला हा सूर्याचा तेजस्वी करोना म्हणजे त्याचं शीतल प्रभामंडळ. ते फक्त खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळीच नुसत्या डोळय़ांनी दिसतं. त्याच्या त्या ‘स्पाईक’सारख्या आकारावरून दोन वर्षांपूर्वी ‘कोविड-19’ या महामारी ‘कोरोना’ नष्टच व्हायला हवा, पण सौर-करोना विलोभनीय राहणार. जीवनदाता सूर्य तारक आहे, तो मारक कसा ठरेल त्याची काळजी करण्यापेक्षा पृथ्वीची काळजी अधिक घेऊया. आणखी पाच अब्ज वर्षे सूर्य आपल्याला वयोवृद्ध, पण ताजा प्रकाश देतच राहणार आहे.






























































