साहित्याकडून चित्रपटाकडे जाणारी लेखणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> संजीवनी धुरी-जाधव

प्रसिद्ध लेखिका, अनुवादक सुनंदा अमरापूरकर. शब्द… साहित्यात रमणारी लेखणी आता चित्रपटाची प्रस्तुती करण्यास सरसावली आहे.

जगात अशक्य असे काही नाही. ठरवलं तर सगळं काही शक्य आहे, त्यामुळे जी पुस्तकं वाचली, जी भावली ती लोकांपर्यंत पोहोचावीत त्यासाठी मी अनुवाद करत गेले. माझ्या व्यस्त वेळापत्रकात अनुवाद करणे मला सोपा मार्ग वाटला असे सांगतायत प्रसिद्ध मराठी लेखिका सुनंदा अमरापूरकर. अनुवाद करतानाच आपल्याला त्या आता नव्या भूमिकेत दिसणार आहेत. रीमा अमरापूरकर दिग्दर्शित ‘पुरुषोत्तम’ या चित्रपटाची प्रस्तुती सुनंदाताईंनी केली आहे.

सुनंदा अमरापूरकर या उत्तम अनुवादक आहेत. अनुवाद करता करता चित्रपटाच्या प्रस्तुतीकडे कसे वळलात असे त्यांना विचारले असता त्या सांगतात की, आमचं संपूर्ण कुटुंब हे सामाजिक विषयाबाबत जागरुक आहे. माझे पती सदाशिव अमरापूरकर एक चांगले अभिनेते तर होतेच, पण त्याचबरोबर उत्तम विचारवंत आणि सामाजिक कार्यांमध्ये सक्रिय असलेले व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे समाजकार्य आम्ही जवळून पाहिले आहे. त्यामुळे सामाजिक विषयांशी आमचा कायमचा जिव्हाळा आहे. ज्यावेळी रीमाने मला ‘पुरुषोत्तम’चे कथानक ऐकवले त्यावेळी ते ऐकून मी प्रभावित झाले आणि चित्रपटाची प्रस्तुती करण्याचा निर्णय घेतला.

सुनंदाताई ‘पुरुषोत्तम’ या चित्रपटाविषयी सांगतात की, हा चित्रपट माझ्या अगदी जवळचा आहे. माझ्या दोन्ही मुली चित्रपटाचा भाग आहेत.रीमाचा दिग्दर्शन क्षेत्रातला हा दुसरा चित्रपट आहे. तिने याआधी ‘आरं आरं आबा आता तरी थांबा’ हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. तर केतकीचे या चित्रपटातून पदार्पण आहे. तिनेही प्रचंड मेहेनत घेतली आहे.

सदाशिव अमरापूरकर असताना चित्रपट करावासा वाटला नाही क़ा असे विचारले असता त्या सांगतात त्यावेळेला त्यांच्या कामाचा इतका डोलारा होता की, तो सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर होती. त्यांच्या प्रत्येक भूमिकेत त्यांच्या कामात मी सर्वार्थाने सहभागी होते. त्यांनी खूप माणसं जोडली होती. त्या सगळ्या व्यस्त जीवनशैलीत चित्रपटाचा विचार केला नाही.

स्वैर अनुवादाविषयी त्यांना विचारले असता त्या सांगतात एखाद्या कादंबरीचा अनुवाद म्हणजे काय तर इंग्रजी कादंबरीचा शब्दन शब्द अनुवाद करणे असे नाही. तर अनुवाद म्हणजे दुसऱयाचं मुलं आपलं म्हणून वाढवणं. मूळ लेखकाने लिहिलेली कथा वाचकांपर्यंत पोहोचवण्याची कला असते. इंग्रजी भाषेची शैली मराठी भाषेत लोकांना कशी भावेल त्यासाठी माझा प्रयत्न असतो.

पुस्तकाशी एकरूप व्हावे लागते
अनुवाद करताना पुस्तकात शिरावे लागते त्याच्याशी एकरूप व्हावे लागते. जसे एका अभिनेत्रीला भाजी विक्रेत्या महिलेचा अभिनय करायचा असेल तर फक्त तिचा पोषाख महत्त्वाचा नसतो तर त्याबरोबर तिची बोलण्याची पद्धत, चालण्यातली लकब, तिचे हावभाव या सगळ्या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या असतात.

आगामी पुस्तके
सध्या मी इजिप्शिअन लेखिका लैला अबुलिया यांच्या एल्सव्हेअर, होम हा लघुकथांचा संग्रह अनुवादित केला आहे. त्यानंतर शांघाय गर्ल्स, ड्रीम्स ऑफ जॉय ही आगामी पुस्तकं आहेत.

अनुवाद करण्यासाठी शब्दांचा अभ्यास
अनुवाद करण्यासाठी अभ्यास तर असतोच. एखादा देश, तिथली संस्कृती याची आपल्याला माहिती असावी लागते. ती माहिती नसल्यास त्याचा शोध घेऊन ती जाणून घ्यावी लागते. एखादा वेगळा शब्द त्याची अर्थछटा याची माहिती असावी लागते. अनेक शब्द असे आहेत त्याचा अर्थ शोधून काढावा लागतो. त्यासाठी त्याचा अभ्यासही तितकाच आवश्यक आहे. शब्दशः रूपांतर न करता त्याचा मथितार्थ समजून घेणे, सौंदर्यस्थळे जाणून घेऊन ती योग्य पद्धतीने उतरविणे हेही त्यातले आव्हानच असते असे सुनंदाताई सांगतात.

[email protected]