लेख – ठसा – वेणूसखा विसावला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अरुण करमरकर

कोरोना महासंसर्गाच्या दुसऱया लाटेने इतके जोरदार तडाखे दिले आहेत की, जणू नियतीही तिच्यासमोर अगतिक झालेली भासू लागली आहे. स्थळ, काळ, वेळ, प्रकृती, वय, प्रवृत्ती या कशा कशाचेही औचित्य न सांभाळता बेगुमानपणे एकेका व्यक्तीला उचलून नेण्याइतका मृत्यूही मातलाय. अन्यथा संपूर्ण बांबू केंद्राचे प्रणेते आणि वंचितांच्या उन्नतीचा एक आदर्श मापदंड प्रस्तुत करणाऱ्या सामाजिक प्रकल्पाचे अध्वर्यू सुनील देशपांडे यांचा नुकताच ओढवलेला मृत्यू कोणत्याच तर्कात बसणारा नाही. वय जेमतेम 56-57 वर्षांचे. जीवनशैली संपूर्णपणे निसर्गस्नेही. जेमतेम एक महिन्यापूर्वी फोनवर संवाद करताना म्हणाले होते, ‘‘आमच्याकडे मेळघाटात सर्वत्र ऑक्सिजनच ऑक्सिजन… इथे कसला त्रास होणार?’’ सातपुडय़ाच्या एका टोकाला, मेळघाटाच्या परिसरात लवादा येथे अभिजात निसर्गाच्या आणि निसर्गपुत्रांच्या सान्निध्यात सुनील गेली पंचवीस-तीस वर्षे सपरिवार तळ ठोकून होता.

एमएसडब्ल्यूचे शिक्षण घेत असतानाच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आणि त्यातही ग्रामविकास व सेवाकार्याच्या उपक्रमाचे काम करण्यात सक्रिय असलेल्या सुनीलने हौसेमौजेच्या भावनेपलीकडे जाऊन ते काम केले. त्यामुळेच परिषद कार्यातून सहज प्राप्त होणारी सामाजिक ऋणमोचनाची प्रेरणा हा त्याचा स्थायीभाव बनला. पुढे ग्रामोदय क्षेत्रातले तपस्वी कार्यकर्ते नानाजी देशमुख, झारखंडच्या आदिवासीबहुल क्षेत्रात, बिशुनपूर, जिल्हा गुमला येथे मूलभूत सामाजिक उन्नतीचा प्रकल्प उभा करणारे डॉ. महेश शर्मा यांच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या सान्निध्यात सुनीलने ग्रामविकास, आदिवासी उन्नयन आणि अस्सल स्वयंसेवी प्रकल्प उभारणीचे धडे गिरवले. वयाची विशी गाठत असतानाच कसे जगायचे याचा सुस्पष्ट आणि ठाम निश्चय त्याच्या मनात आकार घेत गेला. विवाहाचा निर्णय करतानाही याच निश्चयाची संकल्पना स्वीकारणारी निरुपमासारखी जीवनसाथी लाभली. मग या दांपत्याने आधी आदिवासी बांधवांच्या जीवनशैलीत संपूर्ण एकरूप होण्यासाठी एक वर्ष मेळघाटातल्या कोरकू बांधवांसोबतच लवादा येथे मुक्काम ठोकला. त्यांच्या जीवनाशी संपूर्ण समरस होत तेथील बांधवांचे ते ताई-भाऊ बनले आणि मगच बांबू प्रकल्पाचे समाजशिल्प बांधण्यास त्यांनी सुरुवात केली.

कुपोषणग्रस्ततेचा शिक्का कपाळावर घेऊन वावरणारा हा परिसर. परंतु तेथे राहणारा बांधव हाच खरा निसर्ग विज्ञानाचा जाणकार (अशिक्षित, मागास नव्हे) श्रद्धाळू, पण शहाणा भूमिपुत्र (अंधश्रद्धाळू, अडाणी नव्हे)आणि खऱया अर्थाने वसुधैव कुटुम्बकमची उदात्त संकल्पना जगणारा संस्कृतीवाहक आहे हे देशपांडे दांपत्याने जाणले. या परिसरात अमाप पिकणाऱ्या बांबूमध्ये आदिवासी बांधवांना स्वयंपूर्ण बनविणारा आणि आधुनिक परिभाषेतील समृद्धी प्रदान करणारा जीवनरसही सामावलेला आहे ही खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली आणि सुरू झाला संपूर्ण बांबू केंद्राचा, समग्र विकासाचा महामार्ग प्रशस्त करणारा प्रवास. बांबूपासून विविध वस्तू (अगदी निवासी वास्तूही) निर्माण करण्याचे शास्त्र विकसित करून त्याचे प्रशिक्षण येथील सहा हजारांहून अधिक बांधवांना देण्याचे काम गेल्या पंचवीस-तीस वर्षांत साध्य झाले आहे. विविध वस्तूंचे 100हून अधिक नमुने-साचे (डिझाइन्स) विकसित करण्यात आले आहेत. या केंद्रात आदिवासी महिलांनी निर्माण केलेल्या बांबूच्या राख्या देशाच्या पंतप्रधानांच्या हातावर तर रुळल्याच, पण त्या आता देशाच्याही सीमा ओलांडून 40 देशांपर्यंत पोहोचल्या आहेत. 2001मध्ये कच्छ, भूजच्या परिसरात भीषण भूकंपानंतरच्या पुनर्वसन प्रक्रियेत साडेसातशे बांबूंची घरे संपूर्ण बांबू केंद्राच्या कारागिरांनी उभी केली. परिणामी देशाची निसर्गसंपदा आणि बांबूविषयक नीती नव्याने आखण्यात या केंद्राचा सहभाग राहिला आहे.

पंधराएक वर्षांपूर्वी सुनील-निरूपमा यांनी तेलंगणातील रवींद्र शर्मा गुरुजी यांच्या प्रेरणेने एक पुढचे पाऊल टाकण्याचा संकल्प केला. विविध पारंपरिक कलाकौशल्यांच्या विकासाची, प्रशिक्षणाची, प्रसाराची अद्ययावत व्यवस्था असलेले ग्राम ज्ञानपीठ उभे करण्याचा हा संकल्प. विज्ञानाच्या तसेच पर्यावरण-संवर्धनाच्या सगळ्या आधुनिक संकल्पनांशी पूर्णपणे सुसंगत, निसर्गस्नेही, समग्र कल्याणकारी आणि आस्थायुक्त, आत्मीयतापूर्ण जीवनशैली हा आदिवासी समाज बांधवांचा पिढय़ान्पिढय़ांचा स्थायीभाव आहे. याच स्थायीभावाच्या बळावर बाजारू आणि गळेकापू स्पर्धेवर मात करणारी विकासाची नवी वाट रेखांकित करण्याची प्रेरणा या ज्ञानपीठ प्रकल्पामागे आहे. 2016 साली मेळघाटात अमरावती जिह्याच्या धारणी तालुक्यात ग्राम ज्ञानपीठाच्या परिसराचे लोकार्पण सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत झाले. संकल्पाचा एक टप्पा पूर्ण झाला.

एका नव्या उमेदीने मार्गस्थ होण्यासाठी सज्ज झालेल्या सुनील देशपांडे नावाच्या वेणूपुत्रावर कोरोनाच्या अभद्र महासंसर्गाने घाला घातला. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेचा बहुधा सर्वात वेदनादायक पैलू हाच की, शुभशक्ती, सृजनशक्ती आणि सत्शक्ती साकार करणाऱ्या व्यक्तींवरच आघात होऊ लागले आहेत. सुनील देशपांडे हे त्यातलेच एक. तापाचे निमित्त झाले, तरीही कामाच्या व्यापात दोन-चार दिवस त्याकडे दुर्लक्ष करून (तेच भारी पडले की काय कुणास ठाऊक) जवळच्या रुग्णालयात दाखल झाले, दोन-तीन दिवसांनी केंद्रीय मत्री नितीन गडकरी यांनी काहीशा हट्टाने त्यांना नागपूरला हलविण्याचा निर्णय घेतला. परंतु दोन दिवसांनंतर तेथेच त्यांनी अंतिम श्वास घेतला.

सुनील देशपांडे यांच्या पत्नी निरुपमाताई यांनी म्हटल्याप्रमाणे ‘‘छप्पन्न वर्षांत शंभर वर्षांचे काम त्यांनी केले आहे.’’ ते आगामी शंभर वर्षे विकासमान वाटचाल करीत राहील, हे दायित्व आता कोणाचे? ‘समाजाच्या समस्या पाहू नका त्याचे सामर्थ्य पहा, ध्यानात घ्या, अनुभवा आणि वृद्धिंगत करा’ हे ब्रीद सुनीलजी जगले. विशुद्ध हिंदुस्थानी भाषा, भूषा, भाषण, भवन, भजन, भोजन यांची जोपासना करण्याचे व्रत त्यांनी अनुसरले. त्याच दिशेने एखादे पाऊल तरी टाकण्याचा संकल्प आपण करू शकू काय? तीच त्यांना यथार्थ आदरांजली ठरेल.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार असून सामाजिक चळवळींचे अभ्यासक आहेत.)