आभाळमाया : दूर जाई चंद्रमा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> [email protected]

या महिन्यात आपण चंद्राविषयी भरपूर माहिती घेतली याचं कारण स्पष्ट होतं. माणसाच्या चांद्रविजयाचा सुवर्ण महोत्सव साजरा होत होता. मुळात हा चंद्र पृथ्वीच्या जन्माच्या वेळी तिचा उपग्रह नव्हता. असं म्हटलं जातं की, एक प्रोटोस्टार पृथ्वी निर्माण झाल्यावर थोडय़ाच काळात म्हणजे लक्षावधी वर्षांनी पृथ्वीवर धडकला. या टकरीतून जे द्रव्य बाहेर पडलं त्यातून निर्माण झालेला चंद्र पृथ्वीभोवती फिरू लागला. असंही सांगितलं जातं की, त्या सुरुवातीच्या काळात चंद्र पृथ्वीपासून अवघ्या 22,500 किलोमीटर अंतरावरून फिरत होता. त्या तुलनेत आता आपण सोडलेला भूस्थिर कृत्रिम उपग्रह 36,700 किलोमीटरवर असतो. त्याच काळात पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा वेगही प्रचंड होता. अवघ्या पाच तासांत पृथ्वी स्वतःभोवती गरगरा फिरायची. याचा अर्थ त्यावेळी पृथ्वीवरची दिवस-रात्र 24 नव्हे, तर पाचच तासांची होती!

या सर्व घटना आपल्या सूर्यमालेभोवतीची ग्रहमाला आकार घेण्याच्या काळातल्या आहेत. आपल्या सूर्याचं वय सध्या पाच अब्ज वर्षांचं आहे. म्हणजे तो निम्म्या वयापर्यंत आलाय. पृथ्वी त्यानंतर काही काळाने तयार झाली. अर्थातच त्या तप्त रसाने भरलेल्या गोलकावर जीवसृष्टी असण्याचा प्रश्नच नव्हता. ती खूपच पुढली गोष्ट. कालांतराने पृथ्वी व चंद्राचे गोलक थंड झाले. त्यांचा स्वतःभोवती फिरण्याचा वेग बदलला. चंद्र हळूहळू पृथ्वीपासून लांब जात सध्याच्या जागी म्हणजे सरासरी 3 लाख 84 हजार किलोमीटरवर स्थिरावला. कल्पना करा, चंद्र फक्त 22,500 किलोमीटर अंतरावर असताना केवढा ‘प्रचंड’ दिसत असेल! आता आपल्याला चंद्र थोडा जवळ येतो तेव्हाच्या त्याच्या ‘सुपरमून’पणाचं कौतुक वाटतं. मग त्या काळात तर तो ‘सुपर-सुपर’ मून वाटला असता.

चंद्रा एका विशिष्ट अंतरापर्यंत जाऊन स्थिरावला आणि पृथ्वीभोवती इमानेइतबारे परिक्रमा करू लागला. त्याचे काव्यात्मक आणि वैज्ञानिक स्वरूप तर आपल्याला ठाऊकच आहे, परंतु चंद्र आजही पृथ्वीपासून थोडा थोडा दूर जातोय? त्याला ‘का रे दुरावा?’ वगैरे विचारता येणार नाही. कारण ‘वैश्विक’ वैज्ञानिक नियमांनी बांधलेल्या ग्रहमालेतील घडामोडींमागे कार्यकारणभाव असतोच.

दरवर्षी चंद्र पृथ्वीपासून 3.8 सेंटीमीटर इतका दूर जातोय. त्याच्या लंबवर्तुळाकार कक्षेमुळे तो कधी पृथ्वीच्या जवळ (उपभू) असतो तर कधी लांब (अपभू). या गोष्टी नेहमीच्याच, पण चंद्राची भ्रमणकक्षा वाढत असल्याने तो पृथ्वीपासून दूर जातोय. चंद्र हा पृथ्वीवरच्या भरती-ओहोटीला कारणीभूत असते हेसुद्धा आपल्याला माहीत आहे. त्यावेळीही पृथ्वीची चंद्राकडची बाजू चंद्राला अधिक ‘जवळ’ असते. चंद्र सूर्याभोवतीही फिरतो. तो तुलनेने सूर्याच्या जवळ (उपसूर्य) असताना पृथ्वीलाही जवळ असतो. अपसूर्य असताना उलट स्थिती होते. त्याचप्रमाणे चंद्र पृथ्वीच्या जवळ असताना त्याच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम पृथ्वीच्या त्या बाजूवर जास्त आणि विरुद्ध बाजूला कमी जाणवतो. त्यामुळे पृथ्वी सूक्ष्म प्रमाणात ‘ताणली’ जाते. याच स्थितीचा परिणाम चंद्रावरही होतोय. पृथ्वीवर भरती येते. ती पाण्याप्रमाणेच जमिनीलाही येते, पण त्याचे प्रमाण नगण्य असल्याने आपल्याला ते जाणवत नाही.

याशिवाय पृथ्वी स्वतःभोवती 24 तासांत तर चंद्र 27.3 दिवसांत (इतक्या हळू) परिक्रमा करतो. यातून निर्माण होणारा फुगवटा (बल्ज) चंद्राची गती वाढवून त्याला त्याच्या कक्षेत किंचित पुढे नेतो. या सगळय़ा गुरुत्वाकर्षणीय गुंतागुंतीमुळे चंद्राचा ‘परीघ’ (कक्षा) वाढतो.

याच कारणाने पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा वेग किंचित कमी होतो. शतकभरापूर्वीपेक्षा तो 2 मिली सेकंदांनी कमी झालाय. याचा अर्थ एका दिवस-रात्रीचा काळ किंचित का होईना, पण वाढलाय. अब्जावधी वर्षे हे सर्व चक्र सुरूच आहे. पृथ्वीच्या मोठय़ा आकाराने चंद्राचं ‘टायडल ब्लॉकिंग’ होऊन तो आताच्या कक्षेत भ्रमण करत असला तरी ‘दूर’ जातोय एवढं खरं. या गोष्टीचा शोध उक्रांती शास्त्राचा जनक चार्ल्स डार्विन याचा मुलगा जॉन डार्विन याने लावला. त्यामुळे त्याला भरती-ओहोटीच्या उक्रांतीचा (डायडल इव्हल्युशनचा) जनक म्हटलं जातं.

चंद्र पृथ्वीपासून दूर जाण्याचं निश्चित करण्यासाठी 1970च्या दशकात लेझर किरणांच्या परावर्तनाद्वारे त्याचं अचूक अंतर (पृथ्वीपासून) मोजण्याचे प्रयोग सुरू झाले. आता ‘लाँग बेसलाइन इन्टरफेरोमेट्री’चा वापर करून पृथ्वीचं रोटेशनही मोजता येते. पृथ्वीची स्वतःभोवती फिरण्याची गती कमी होतेय हे प्रसिद्ध हॅले धूमकेतूचा संशोधक एडमण्ड हॅली याने 1695 मध्येच सांगितलं होतं.

चंद्र पृथ्वीपासून बराच दूर जायला लक्षावधी वर्षे लागतील. त्यापूर्वी एक अवकाशी ‘खेळ’ मात्र गोलात येईल. तो आहे खग्रास सूर्यग्रहणाचा. ज्या अमावास्येला पृथ्वी-चंद्र-सूर्य एकाच सरळ रेषेत येतात तेव्हा सूर्यप्रकाश अडवणाऱया चंद्राची दाट छाया पृथ्वीच्या ज्या भागात पडते त्या काही किलोमीटरच्या पट्टय़ातून सूर्य संपूर्ण झाकलेला (खग्रास) दिसतो. त्याला ‘टोटॅलिटी पाथ’ म्हणतात. मात्र कंकणाकृती सूर्यग्रहण ज्या अमावस्येला घडतं तेव्हा चंद्र पृथ्वीपासून थोडा लांब असल्याने संपूर्ण सूर्यबिंब झाकू शकत नाही आणि सूर्य सोन्याच्या कंकणासारखा दिसतो. चंद्र कायमचा दूर गेला तर कंकण बांगडीसारखं न दिसता सोन्याच्या कडय़ासारखं जाड (रुंद) होत जाईल, पण त्यामुळे खग्रास सूर्यग्रहण काळात दिसणारं सौर प्रभामंडल, सौरज्वाला, आकाशी हिऱयाची अंगठी आणि भर दिवसाची रात्र अनुभवता येणार नाही, पण त्याला लक्षावधी वर्षे असल्याने आपल्याला चिंता नको. दक्षिण हिंदुस्थानातून 26 डिसेंबर 2019ला दिसणारं (कोईमतूर) कंकणाकृती सूर्यग्रहण चंद्राचे आभार मानून जरूर पहा!