
>> ब्रिगेडियर हेमंत महाजन
चायनीज कम्युनिस्ट पार्टी (Chinese Communist Party)आपला शंभरावा वर्धापन दिवस साजरा करत आहे. त्यांनी गेल्या शंभर वर्षांत त्यांनी नेमके काय कमावले आणि काय गमावले? हा अभ्यासाचा विषय आहे. हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त चीनला शुभेच्छा दिल्या नाहीत. अनेक वर्षांत हे पहिल्यांदा घडले. काही दिवसांनंतर तिबेटीयन धर्मगुरू दलाई लामा यांच्या वाढदिवसाला मात्र त्यांनी शुभेच्छा दिल्या, जो चीनला एक इशारा होता.
चीनचा गेल्या 70 वर्षांतील प्रवास संघर्षमय आहे. क्रांतीच्या सुरुवातीच्या काळात चुकीची धोरणं आणि दडपशाहीमुळे कोटय़वधी लोक मृत्युमुखी पडले. मात्र 40 वर्षांत सरासरी 10 टक्क्यांहून अधिक आर्थिक विकासाचा दर राखत चीनने नेत्रदीपक आर्थिक प्रगती केली आहे. 1950च्या दशकात तिबेट गिळंकृत करणे, कोरियन युद्ध, 1962 ला हिंदुस्थानविरुद्ध युद्ध, त्यानंतर व्हिएतनाम युद्ध यात चीन सहभागी होता.
माओंनी अमेरिकेशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेतला. पाकिस्तानच्या माध्यमातून चाऊ एनलाई आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव हेन्री किसिंजर यांच्यात गुप्त वाटाघाटी झाल्यानंतर 1972 साली अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी चीनचा दौरा करून माओची भेट घेतली. आज चीनने साधलेल्या प्रगतीचे बरेचसे श्रेय डेंग व अमेरिकेला जाते.
सोव्हिएत रशियाविरुद्ध चीनला उभे करण्यासाठी अमेरिकेने जपान आणि कोरियासह चीनमध्ये प्रचंड प्रमाणावर गुंतवणूक केली. चीनला आधुनिक तंत्रज्ञान दिले.चीनने कम्युनिस्ट कामगार कायदे गुंडाळून निर्यात प्रधान उत्पादन व्यवस्था बनवली. शेतीचे आधुनिकीकरण केले. पायाभूत सुविधांमध्ये, शिक्षणामध्ये मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक केली व नेत्रदीपक आर्थिक प्रगती केली.
बहुराष्ट्रीय कंपन्यांनी विकसित केलेले तंत्रज्ञान वैध-अवैध मार्गांनी आत्मसात करून सरकारी मदतीने/ सहभागाने स्थापन झालेल्या कंपन्यांद्वारे चीन जगाशी स्पर्धा करत आहे. आज संगणक, मोबाईल, इलेक्ट्रिक कार, नेटवार्ंकगसारख्या क्षेत्रात चिनी कंपन्यांनी जगासमोर मोठे आव्हान उभे केले आहे.
चीन विकास करत असताना अमेरिका आणि पाश्चिमात्य देश गाफील राहिले. त्यांनी स्वतःच समज करून घेतला की, चीन ही हलक्या दर्जाच्या वस्तू बनवण्याची किंवा स्वस्तात उत्पादन करण्याची जागा असून लोकशाही व्यवस्था नसल्यामुळे नावीन्यपूर्ण आणि जागतिक दर्जाचे तो काही बनवू शकणार नाही. तिथेच त्यांची चूक झाली. जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांची जगाच्या कानाकोपऱयात निर्मिती, आफ्रिका, मध्य आशिया आणि दक्षिण अमेरिकेतील नैसर्गिक साधनसंपत्तीवर आपल्या कंपन्यांच्या माध्यमातून ताबा मिळवणे आणि बेल्ट-रोड प्रकल्पाच्या माध्यमातून चीनला रस्ते, रेल्वे, बंदरं, विमानतळं आणि वित्तीय व्यवस्थेच्या माध्यमातून जोडणे यामुळे चिनी अर्थव्यवस्था जगावर राज्य करु लागली.
मात्र सध्याची परिस्थिती काय आहे? चीनचे आज युरोप आणि अमेरिकेशी व्यापार युद्ध सुरू आहे. अमेरिका आणि युरोप आता चीन पासून आपल्या अर्थव्यवस्थेला वेगळे करण्याचा प्रयत्न करत आहेत. आक्रमक चीन हा सगळ्या जगाला धोका बनलेला आहे . सगळे जग आपापल्यापरीने चीनच्या विरोधात काम करत आहे, यामुळे येणाऱया काळामध्ये चीनला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
चीनच्या अर्थव्यवस्थेचा प्रतिवर्षी वाढण्याचा वेग पहिले प्रतिवर्षी सात ते आठ टक्के असायचा, तो आता दोन टक्क्यांवर पोहोचला आहे, म्हणजेच फार कमी झाला आहे. चीन सर्वात जास्त कर्जबाजारी राष्ट्र झाले आहे. चिनी सरकारचे कर्ज हे यांच्या जीडीपीच्या तुलनेत 270 टक्के आहे, जे शंभर टक्क्यांहून कमी असायला पाहिजे. चीनमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे इतर देश गुंतवणूक करायचे. जगातली सर्वात जास्त चार टक्के गुंतवणूक ही चीनमध्ये व्हायची. यामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा व्हायचा. आता ते प्रमाण एक टक्क्याहूनसुद्धा कमी झाले आहे. यामुळे अर्थातच त्यांच्या अर्थव्यवस्थेचा वेग कमी होणार आहे.
चीनचा मध्यमवर्ग म्हणजे मिडल क्लास हा 70 टक्के एवढा मोठा आहे. या वर्गाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे महत्त्वाचे असते. मात्र चिनी सरकार यशस्वी चिनी नागरिकांचे कौतुक करायच्या ऐवजी त्यांच्यावर बंधने लादते. म्हणून अनेक यशस्वी चिनी नागरिक चीनच्या बाहेर वसण्याच्या प्रयत्नात आहेत. वन चाईल्ड पॉलिसीमुळे चीनमध्ये मुली आणि मुले यांच्या संख्येमध्ये प्रचंड विषमता निर्माण झालेली आहे, ज्यामुळे चिनी मुलांना लग्न करायला मुली मिळत नाहीत. म्हणून चीन पाकिस्तान, सेंट्रल एशियन रिपब्लिक आणि अनेक देशांतून लग्नाकरिता मुली स्मगलिंग करतो.
चिनी समाज आता म्हातारा होत आहे, ज्यामुळे यांची उत्पादक क्षमता येणाऱया काळामध्ये अजून कमी होईल. सोशल मीडिया नावाचा प्रकार जसा हिंदुस्थानमध्ये आहे, चीनमध्ये नाही. चिनी सोशल मीडियावर चिनी सरकारचे पूर्णपणे लक्ष आहे. यामुळे कुठल्याही प्रकारचा प्रतिरोध, सरकारच्याविरुद्ध बोलणे, चिनी सैन्याच्या विरुद्ध बोलणे किंवा कम्युनिस्ट पार्टीच्या विरुद्ध बोलणे हे अजिबात सहन केले जात नाही. यामुळे चीनमध्ये प्रचंड राग आहे.
डेंग शाओपिंगचा मंत्र होता ‘संयतपणे प्रतिक्रिया द्या, खंबीरपणे उभे रहा, स्वतःच्या क्षमता शत्रूपासून लपवून ठेवा आणि योग्य वेळ येण्याची वाट पहा’. मात्र सध्याचे नेतृत्व शी जिनपिंग यामध्ये मोठा बदल करून अतिशय आक्रमक कारवाया करत आहे, ज्यामुळे त्यांनी सगळ्या जगाचा राग आपल्यावर ओढवून घेतला आहे. यामुळे चीनची अर्थव्यवस्था यापुढे त्याच वेगाने वाढेल का?
आज चीनची अर्थव्यवस्था ही जगातली नंबर दोनची अर्थव्यवस्था समजली जाते आणि त्यांची पर्चेसिंग पॉवर ही आता अमेरिकेहूनसुद्धा जास्त आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी ते अमेरिकेच्यासुद्धा पुढे आहेत. जे इतर कम्युनिस्ट राष्ट्रांना जमले नाही ते चीनला जमले. आज चीन हा जगाचा कारखाना आहे. सगळ्या जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये चीनने प्रचंड घुसखोरी केलेली आहे. युरोप, अमेरिका आणि इतर जग चीनच्या आर्थिक चक्रव्यूव्हामध्ये अडकले आहे. त्यांना बाहेर पडायला अनेक वर्षे लागतील.






























































