
>> जयू पेठे देवधर
पहिली बेटी धनाची पेटी’, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अशा अनेक घोषणांतून केवळ जनजागृती होत असताना ‘एक झाड, एक लेक’ हा उपक्रम प्रत्यक्षात परिणामकारक होईल यात शंका नाही. त्या झाडाइतकीच माया, प्रेम, काळजीही आपलीशी वाटेल व ते झाड मोठे होताना, बहरतानाचा आनंद जीवन जगायला प्रोत्साहन देईल. हिरव्यागार, टवटवीत, प्रफुल्लित असलेल्या झाडांशी बोलताना मन प्रसन्न होईल. झाडं वाढतात, सावली देतात, पक्ष्यांना हक्काची विसावायची जागा देतात तसंच आम्हां मुलींचे पण आहे. आजच्या प्रदूषणात झाडाला पर्याय नाही हे जसे सत्य आहे, तसे मुलींशिवाय समाज नाही हे त्रिवार सत्य आहे. आपल्या विविध कार्यांनी सर्वदूर पसरलेल्या स्त्रिया या समाजाचा, घराचा घट्ट आधार आहेत… अगदी खोलवर गेलेल्या मुळांसारखा ! आपल्या परंपरेत जसे अनेक झाडांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. पहाटेच्या वेळेस अलगद बकुळीचं फूल टपकन् अंगावर पडावे व आपण ते झेलावे तसे आम्हां मुलींचे आहे. एकीकडे लहानाचे मोठे होतो व क्षणात दुसरीकडे आपले म्हणून सामावूनही जातो. परसबागेतील छोटय़ाशा झाडाचे फूल जितके मोहक आहे, तितकीच छोटी-छोटी नाजूक धावणारी पावलेही मोहक आहेत. तेव्हा अशा या रोपटय़ांना बहरू द्या, फुलू द्या. त्यांच्याशी मैत्री करूया, संवाद साधू या व स्वतःत बदल घडवूया. या रंगबिरंगी फुलांना सारी ऊर्जा देऊन सशक्त करूया म्हणजेच जिव्हाळ्याचे, मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील. झाडाची सावली, परोपकारी वृत्ती, घट्ट पाय रोवून खंबीरपणे उभे रहाणे, दातृत्व हा तर आम्हा मुलींचा जन्मजात गुण आहे. ‘ती आहे तर मी आहे, ती आहे तर घर आहे’ हा क्रांती घडविणारा विचार समजावून घेऊ व सुदृढतेचा वारसा पुढे नेऊयात! तेव्हा भूतकाळातील आठवणींमध्ये रममाण होण्यापेक्षा हीच आनंदाची झाडे वाचवून आपला भविष्यकाळ हसता खेळता करूया !
नव्या पिढीला देऊ ही भेट
उठेल मग सगळीकडे समतेची लाट,
मुलगी जगवा, मुलगी वाचवा तरच
उजाडेल समृद्धीची पहाट !




























































