
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर 2022 या वर्षाचे देशभर स्वागत होत असतानाच तिकडे माता वैष्णोदेवी मंदिराच्या आवारात ऐन रात्रीच मृत्यूची दुर्दैवी घटना घडली आणि सकाळ होता होता देश या घटनेने हादरून गेला. तब्बल बारा लोकांचे दुर्दैवी बळी गेले आणि अनेक जण जखमी झाले. दुर्दैवी घटना घडली त्याचे कारण म्हणजे नववर्षात जात असताना माता वैष्णौदेवीचे दर्शन आणि आशीर्वाद घ्यावा यासाठी अलोट गर्दी जमली. विशेष म्हणजे देशात काय किंवा राज्यात काय, अनेक देवस्थानांमध्ये कमी अधिक प्रमाणात अशीच गर्दी झाली होती. गंभीर बाब म्हणजे याच वेळी कोरोना संकट वाढू लागल्याने पेंद्र व राज्य सरकारांनी कडक निर्बंधांची घोषणा केली होती.
अगोदरच कोरोनाच्या सावटाखाली 2022 चे स्वागत करताना एका अनामिक भीतीच्याखाली आपण सगळेच आहोत. कुठून तरी दोन क्षण आनंदाचे, सुखाचे मिळावे यासाठी जो-तो प्रयत्न करीत आहे. देवी-देवतांचे दर्शन घेऊन नवीन वर्षाचे स्वागत करावे अशी इच्छा मनी बाळगून हजारोंच्या संख्येने भाविक धार्मिक स्थळे, मंदिरे गाठतात, मात्र काही दुर्दैवी घटनांचे बळी ठरतात.
धार्मिक स्थळांवर अलोट गर्दी होणे हे काही नवीन नाही, मात्र त्याचे योग्य नियोजन आणि नियोजनाची अंमलबजावणी तसेच स्वशिस्त पालन करण्याचे भान प्रत्येक भाविकाने पाळणे गरजेचे आहे. अनेक मंदिराचे व्यवस्थापन हे सरकार, खासगी संस्था यांच्याकडे आहे. काही ठिकाणी नियोजनाचे तीनतेरा वाजतात तर काही ठिकाणी उदा. शेगावसारख्या ठिकाणी नेहमीच उत्तम नियोजन असते. नववर्षाचे स्वागत करताना शिर्डी, पंढरपूर, शेगावसारख्या अनेक धार्मिक स्थळांवर मोठी गर्दी उसळली होती. सुदैवाने राज्यात कुठलीच दुर्घटना घडली नाही, मात्र 2013 साली सातारा जिह्यातील मांढरदेवी दुर्घटना घडली होती त्यात तब्बल 340 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता तर 2003 साली नाशिक पुंभमेळ्यात धावपळीत अनेकांनी जीव गमावला होता. या राज्यातील दोन घटना लवकर विस्मरणातून जाणाऱ्या नाहीत. केरळमधील शबरीमाला येथेदेखील काही वर्षांपूर्वी अशीच दुर्दैवी घटना घडली होती. मुस्लिमांचे पवित्र स्थान मक्केतदेखील भाविकांच्या अलोट गर्दीमुळे चेंगराचेंगरीत अनेकांचे दुर्दैवी मृत्यू झाले आहेत.
वैष्णोदेवी दुर्घटना घडली ती भाविकांच्या प्रचंड गर्दीमध्ये व्हीआयपी दर्शनासाठी झालेल्या गोंधळाचे पर्यावसान भाविकांमध्ये गोंधळ उडाला आणि अनियंत्रित चेंगराचेंगरी झाली. रात्रीची वेळ काही जणांसाठी कर्दनकाळ ठरली. वास्तविक वैष्णोदेवी दर्शनासाठी कटरा येथे वैष्णोदेवी संस्थानाकडे नोंदणी केली जाते, मगच भाविकांना प्रवेश दिला जातो. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर 25 हजार जणांना परवानगी दिली गेल्याचे सांगण्यात आले मग एवढी अनियंत्रित गर्दी जमली कशी? गर्दी जमत असताना स्थानिक प्रशासन, मंदिर व्यवस्थापन, सुरक्षा यंत्रणा यांनी समन्वयाने नियोजन करणे गरजेचे होते, मात्र नेहमीप्रमाणे दुर्घटना घडली की चौकश्यांचा फार्स, मृत, जखमींबाबत सहानुभूतीचे दोन शब्द, काही आर्थिक मदतीची घोषणा, भविष्यात अशा घटना घडणार नाही याची काळजी घेतली जाईल अशी पोकळ आश्वासने यापलीकडे आपल्या देशातील चित्र बदलायला तयार नाही. भाविकांनीदेखील आपल्या भक्तीला मुरड घालून आपल्या आवडत्या देवतांचे घरीच स्मरण, पूजापाठ करायला हवे. मंदिरातच जाऊन देव पावेल अशी धारणा काळानुरूप, परिस्थितीचे भान राखून बदलायला हवी. परमेश्वराचे अस्तित्व सगळीकडे असे आपण मानतो मग एकाच वेळी मंदिरांमध्ये गर्दी करण्याचे औचित्य तरी काय? जीवन हे अनमोल आहे. चेंगराचेंगरीत जीव जाणे आणि आयुष्याला कायमचे मुकणे हे योग्य नाहीच. शेवटी जान है तो जहाँ है. नववर्षाची अशी सुरुवात होणे दुर्दैवीच.
- अनंत बोरसे


























































