
>> प्रज्ञा सदावर्ते
वनाधिपती, माजी मंत्री विनायकदादा पाटील यांचे माती, मैत्री आणि माणुसकी यांच्याशी एकसारखेच घट्ट नाते जुळलेले होते. त्यांनी जिव्हाळ्याचा विषय असलेल्या वनशेतीची चळवळ उभी करीत दूरदृष्टीचे दर्शन घडविले. त्याचबरोबर साहित्य, कला, संस्कृती, राजकारण, समाजकारण, सहकार या क्षेत्रांतही त्यांनी तेवढेच उल्लेखनीय योगदान दिले. ते रसिकांना खिळवून ठेवणारे वक्ते होते. सर्वांसाठी कायमच मार्गदर्शकाच्या भूमिकेत मनापासून रमणारे विनायकदादा हे विद्यापीठ होते.
नाशिक जिह्यातील निफाड तालुक्यातील कुंदेवाडी या गावी शेतकरी कुटुंबात 19 ऑगस्ट 1943ला त्यांचा जन्म झाला. शेती, त्यातही वनशेती त्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा आणि अभ्यासाचा विषय होता. 1986 मध्ये त्यांनी जेट्रोफा वनस्पतीची शेती केली. त्या बियांपासून डिझेलनिर्मितीचा प्रयोग यशस्वी करून दाखविला. आज अनेक देशांना हा विषय खुणावतोय, हे त्यांच्या दूरदृष्टीचे उत्तम उदाहरण आहे. जेट्रोफा आणि इंधननिर्मिती याचा लेखाजोखा मांडताना त्यांचे योगदान ठळकपणे अधोरेखित होईल. वनशेतीच्या माध्यमातून शेतकऱयांच्या प्रगतीसाठी ते प्रयत्नशील राहिले. वनीकरण, निलगिरी, जेट्रोफाचा प्रसार यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. ते खऱया अर्थाने हिंदुस्थानच्या सहकारी वनशेतीचे जनक आहेत. त्यांच्या या कार्यामुळेच कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनी त्यांना ‘वनाधिपती’ ही उपाधी दिली. वनशेतीतील योगदानासाठी त्यांना राज्य शासनाचा कृषिभूषण, वनश्री, केंद्र सरकारचा इंदिरा प्रियदर्शनी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. फूड ऍण्ड ऍग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन ऑफ युनायटेड नेशन्सचा आऊटस्टॅण्डिंग ट्री फार्मर ऑफ इंडिया आणि जिनिव्हा येथील रोलेक्स ऍवॉर्ड मिळविणारे ते पहिले हिंदुस्थानी ठरले. शेतीला परिवर्तनाशी जोडणं याला महत्त्व देत देश-विदेशातील शेतीमधील प्रयोग अभ्यासून येथील मातीत रुजवले. कमी पाण्यातील पीक आणि फळबागांचे प्रयोग करणाऱया शेतकऱयांना कायमच शाबासकी दिली.
शेतीइतकीच साहित्य, कला, संस्कृती यांची सखोल माहिती असणारे ते राजकारणातील एक व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या समकालीन, आधीच्या आणि नंतरच्या पिढीतील साहित्यिक, कलाकारांशी त्यांची मैत्री होती. समाजजीवनाचे त्यांचे अचूक निरीक्षण होते. समाजघटकांचे प्रश्न सोडविण्याच्या तळमळीतूनच शेकडो शेतकऱयांना त्यांनी मदतीचा हात दिला.
कुंदेवाडीचे सरपंच ते राज्य मंत्रिमंडळातील उद्योग, सांस्कृतिक कार्य, क्रीडा व युवक सेवा खात्याचे मंत्री असा त्यांचा प्रवास थक्क करणारा होता. महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळाचे ते अध्यक्षही होते. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले, त्यांचा आदर्श त्यांनी जपला. काँग्रेसमध्ये राहूनही त्यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी कायम घट्ट मैत्री होती. पक्ष, वय, क्षेत्र असे कुठलेच अडथळे त्यांच्या मैत्रीत कुणालाच कधीही जाणवले नाहीत. अफाट जनसंपर्क हा त्यांच्या आदर्श व्यक्तिमत्त्वामुळेच कायम विस्तारत गेला.
2005 मध्ये नाशिक येथे झालेल्या 78व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते कार्याध्यक्ष होते. त्यावेळी रसिकतेला वैचारिकतेची जोड मिळावी, हा भाव महाराष्ट्रभर गावोगावी रूजू लागलाय याचा आनंद त्यांनी व्यक्त केला होता. त्यांनी स्वतःदेखील हा भाव कायम जपला. त्यांच्या निधनाने सर्वच क्षेत्रांत आपला ठसा उमटवत मार्गदर्शकाच्या भूमिकेतून प्रोत्साहन देणारा आधारवड हरपला आहे. मात्र त्यांचे विचार कधीही विस्मरणात जाणार नाही.






























































