
>> तरंग वैद्य
खुनाचा शोध घेणारी ही मालिका. मर्डर मिस्ट्रीसोबत अनेक ट्विस्ट अँड टर्नची फोडणी देत साकारलेली ही मालिका रंजक आहे.
लग्नाच्या विधी आणि पद्धतींमध्ये काळानुसार बदल घडत गेले, नवनवीन गोष्टी जोडल्या गेल्या. पूर्वी आईवडील लग्न ठरवायचे, मुलगा-मुलगी हेही आईवडिलच बघायचे. नंतरच्या काळात मुलं आपली लग्न ठरवायला लागली. पुढच्या काळात मुलगा-मुलगी एकöदोन वेळा लग्नाआधी भेटू लागले, आपले विचार, आपली मतं समजून घेण्याकरता… आता काही वर्षांपासून ‘प्री वेडिंग शूट’ हा प्रकार प्रचलित झाला आहे. लग्नाआधी नवरा मुलगा-मुलगी एखाद्या नयनरम्य स्थळी फोटोग्राफरला नेऊन छान फोटो काढून घेतात. आता श्रीमंत घराण्यात ‘हनिमून फोटोग्राफी’ हा प्रकार अस्तित्वात येत आहे… थोडक्यात हनिमून जोडप्याबरोबर त्याचे फोटो काढणारा सोबत असतो. हाच विषय घेऊन आणि ‘हनिमून फोटोग्राफर’ हे नाव घेऊन जियो या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 27 सप्टेंबर 2024 पासून वेब सीरिज आली आहे. नाव ‘हनिमून फोटोग्राफर’ असले तरी ही प्रेमकथा नसून मर्डर मिस्ट्री या श्रेणीत मोडणारी आहे. कारण पहिल्याच भागात नवरामुलगा अधीरचा संशयास्पद मृत्यू होतो.
अधीरच्या वडिलांची फार्मास्युटिकल कंपनी आहे. श्रीमंत परिवार… अधीर लग्नानंतर आपल्या बायकोला झोयाला हनिमूनसाठी मालदीव येथे घेऊन येतो आणि त्यांच्यासोबत असते त्यांच्या हनिमूनचे फोटो काढण्यासाठी आलेली हनिमून फोटोग्राफर अंबिका नाथ! नयनरम्य मालदीव येथे प्रणयरम्य वातावरणात एका सकाळी अचानक बीचवर अधीरचा मृतदेह आढळतो आणि कथेला एक वेगळेच वळण मिळते. मालदीव पोलीस अपघाती निधन हा शेरा मारून केस बंद करतात. पण कुटुंबीय हत्येचा संशय म्हणून मुंबई पोलिसांकडे जातात. एक नामवंत उद्योजकाच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू हा प्रसार माध्यमांसाठी पण टीआरपीचा विषय आणि गृहमंत्रालयातून आदेश आल्यामुळे लगेच पोलीस यंत्रणा कामाला लागते, वेगाने तपास सुरू होतो आणि चौकशी दरम्यान अनेक दडलेल्या गोष्टी बाहेर पडतात. अधीरचा स्वभाव, झोयाची पूर्वकथा, तिचा भाऊ आणि त्याचा पूर्वइतिहास… अधीरच्या वडिलांचे व्यावसायिक गौडबंगाल… हे सगळं पोलिसांसमोर येतं. पण यातून हा योजनाबद्ध खून कोणी आणि का केला याची उकल होत नाही आणि कथा आणखीन रंजक होत जाते.
कथा तशी खूप मोठी नाहीये. पण पटकथेला वेग देऊन प्रेक्षकांना विचार करायला वेळ दिला गेला नाही, त्यामुळे प्रेक्षक रिमोटकडे जात नाही. शिवाय मालदीवचे दृश्यांकनही उत्तमरित्या केले गेले असल्यामुळे मालिका बघताना छान वाटते. एकूणच मालिकेला एक श्रीमंती रंग दिला आहे जो कथेला अनुसरून आहे. अंबिकाचा मित्र आणून त्याच्यासोबतच्या दृश्यांनी कथा पुढे नेण्याचा प्रयत्न आहे अन्यथा त्याची काही गरज नव्हती. तसेच फार्मा कंपनीची गफलत बघून या खुनामागे कोण याची कल्पनाही येते. पण त्याने मालिकेची रंजकता कमी होत नाही.
आशा नेगी हिच्या खांद्यावर ही मालिका आहे. अगदी पहिल्या फ्रेमपासून शेवटच्या फ्रेमपर्यंत ती आहे. ती दिसली पण छान आहे आणि अभिनयही छान केला आहे. नववधू झोया म्हणजेच अपेक्षा पोरवालवर सतत संशयाची सुई असते. तिचे काम ठीक. राजीव सिद्धार्थ यांनी पण आपले काम नेमके बजावले आहे. ऋतुराज सिंग व्यावसायिक कमी आणि अपराधी जास्त वाटलेत. हल्लीच्या मालिकांमधून पोलीस म्हटले की नवरा-बायकोतील दुरावे दाखवणे क्रमप्राप्तच आहे. इथेही मुख्य तपास अधिकारी दिव्या आणि तिच्या नवऱयाबद्दल असेच काहीसे दाखवायचा प्रयत्न केला आहे. पण ते इतक्या थोडक्यात आहे की नेमकं काय ते समजत नाही. ही भूमिका संवेदना सुवाल्काने निभावली असून तिने भूमिकेला न्याय दिला आहे.
शेवटच्या भागात अचानक एका पेन ड्राइव्हमध्ये सर्व रहस्य दडले असलेल्याचे समजते आणि सगळे पेन ड्राइव्हच्या शोधात पळू लागतात. पेन ड्राइव्हसारखे अस्त्र आता जुने झाले असल्यामुळे लेखकाने आपल्या भात्यातून काढलेला हा बाण धारदार वाटत नाही. पण कथा यालाच अनुसरून पुढे जाते. त्यामुळे आपण पण पेन ड्राइव्ह कोणाला मिळणार याकडे बघू लागतो.
एक नवीन कल्पक शीर्षक घेऊन आलेली ही मालिका एका खुनाचा शोध घेणारी मालिका असून इतर मर्डर मिस्ट्रीप्रमाणे यातही ट्विस्ट अँड टर्नची फोडणी देऊन रंजक करायचा प्रयत्न केला गेला आहे. एकूण सहा भाग आहेत आणि प्रत्येक भागाची लांबी आहे 26 ते 33 मिनिटे.
प्लॅटफॉर्म – जियो सिनेमा.
z [email protected]
(लेखक सिनेदिग्दर्शक व पटकथाकार आहेत)



























































