तो आणि ती!

>> दिव्या नेरुरकर-सौदागर

लग्न होणं आणि लग्न करणं यात ‘जबाबदार वृत्ती’चा फरक असतो. म्हणूनच जोपर्यंत आपण मानसिकदृष्टय़ा तयार होत नाही तोपर्यंत वेळ घेणं गरजेचं असतं. अर्थात, कुठलंही नातं हे आदर्श नसतं. पण त्या व्यक्तींसाठी योग्य असतं. प्रत्येक नात्यात अपेक्षा असणं साहजिकच आहे. परंतु वास्तवता आणि समोरच्या व्यक्तीच्या मर्यादा समजणंपण गरजेचं आहे. तरच खऱया अर्थाने नातेसंबंध बहरतील.

ही गोष्ट आहे एका जोडप्याची – शोभना आणि शेखरची (नावे बदलली आहेत). हे जोडपं एका आटपाट शहरात रहात होतं. खाऊन पिऊन सुखी होतं. तसं बघायला गेलं तर राजा-राणीचा संसार म्हणता येईल असं दोघांचंही आयुष्य चाललं होतं. आठवडाभर ऑफीस आणि सुट्टीच्या दिवशी काहीतरी प्लॅन असे त्यांचे दिवस जात होते. त्या दोघांनीही ‘विभक्त कुटुंब’ (Nuclear Family) पद्धतीचा स्वीकार केला असल्याने ती दोघंच घर चालवत होती. एकमेकांची मर्जी सांभाळत होती. रुसवे-फुगवे, एकमेकांना मनवणं या साऱया गोड आठवणी साठवत त्या दोघांचा एक-एक दिवस जात होता.

पण जसे नव्याचे नऊ दिवस असतात तसंच त्यांच्याही बाबतीत होऊ लागलं. त्या दोघांमध्ये कुरबुरी चालू झाल्या. छोटय़ा छोटय़ा कारणांवरून खटके उडू लागले. काही सवयी (ज्या आधी कौतुकाने चालवून घेतल्या जात होत्या) आता नकोशा होत चालल्या होत्या. ‘समजून घेणं’ कुठेतरी मागे पडू लागलं होतं आणि त्याची जागा भांडणांनी घेतली होती. एकमेकांना मनवणं थांबलं होतं आणि त्या जागी ‘नको ती कटकट’ असं म्हणून अबोला आला होता.

‘माझ्यावर त्याचे आता प्रेम राहिलेले नाही’ हा विचार शोभनाच्या मनात घट्ट रुजत चालला होता आणि ती मला कायम डॉमिनेट करते असा शेखरचा पक्का ग्रह होत चालला होता. सरतेशेवटी हाच ‘राजा-राणी’चा प्रवास ‘वेगळं’ होण्याच्या टप्प्यावर येऊन थांबला होता. समुपदेशनासाठी ती दोघंही आली असता एकमेकांच्या एकमेकांबद्दल ज्या तक्रारी सुरू झाल्या त्या ‘मला नाही त्याला समजवा’ इथपर्यंत येऊन थांबल्या.

नातेसंबंधांवर, खासकरून वैवाहिक जीवनाबद्दल जेव्हा समुपदेशन करायचे असते त्या वेळी समुपदेशकाला अत्यंत तटस्थ तसेच अत्यंत संवेदनशील राहावे लागते. यात तोडगा हा लगेच काढून चालत नाही. कारण शेवटी दोन स्वतंत्र व्यक्तिमत्त्वं स्वतःला शोधत असतात… जे बऱयाच वेळा लग्न झाल्यानंतर कुठेतरी हरवत गेलेलं असतं. त्यामुळेच त्या दोघांनाही वेळ हवा असतो, एक ‘सुरक्षित जागा’ हवी असते जिथे तज्ञ व्यक्तीच्या मदतीने त्यांना ‘त्यांच्या पुढील आयुष्याबद्दल योग्य तो विचार तसंच निर्णय घेणं’ शक्य होतं.

हे जोडपं यासाठीच समुपदेशनाला आलं होतं. त्या दोघांनाही स्वतःची अशी एक ‘Space’ हवी होती. कारण दोघांचेही ऐन विशीत लग्न झाल्यामुळे लवकरच एकमेकांची जबाबदारी आलेली होती ज्यासाठी ती दोघंही त्या वेळी बिलकूल मानसिकदृष्टय़ा तयार नव्हती. तसंच सहजीवनाच्या त्यांच्या कल्पना परस्परांविरुद्धच होत्या. शोभना अत्यंत बोलकी तर शेखर खूप कमी बोलायचा. शोभनाला घर सजवणं खूप आवडायचं आणि ते सगळं शेखरने नोटीस करून बोलूनही दाखवायचं ही अपेक्षा असायची. तर शेखर ऑफीस आणि स्वतःच्या कामात गुंतला होता. त्यामुळे बऱयाच वेळा त्याला गोष्टी लक्षातही यायच्या नाहीत.

त्या दोघांचंही एकमेकांवर प्रेम होतं. पण ते कायम ‘बोलूनच दाखवलं पाहिजे’ असा शोभनाचा आग्रह होता आणि इथूनच ठिणगी पडायला सुरुवात झाली. शेखरला हे असं कायम बोलून व्यक्त होणं हे अवघडल्यासारखं वाटायचं, फिल्मी वाटायचं. आधी त्याने तिच्यासाठी म्हणून या गोष्टी केल्याही. पण नाही जमल्या त्याला! ‘माझा स्वभाव तो नाही’ असं त्याला पक्कं वाटू लागलं आणि तिच्या या एकाच अपेक्षेमुळे तो अजूनच कठोर होत गेला.

या प्रकरणात नंतर दोघांचंही मित्रमंडळ सामील होत गेलं. त्यांचे सल्ले त्यांना अजूनच गोंधळवून टाकत होते. घरातली वडीलधारी मंडळी यात कशी मागे राहतील? ‘लग्नानंतर कसं वागावं?’ याचं बाळकडू दोघांनाही फोनवर मिळायला लागलं. या सगळ्याचा परिणाम असा झाला की, दोघंही आत्मविश्वास गमवत चालली होती आणि हे लग्न आपण पेलवू शकणार नाही ही त्यांची ठाम समजूत झाली. त्यामुळेच एकमेकांवर राग, चिडचिड या गोष्टी झाल्या आणि त्याचं रूपांतर ‘आपण वेगळे होऊ’ या टोकाच्या निर्णयात झालं. लग्न होणं आणि लग्न करणं यात ‘जबाबदार वृत्ती’चा फरक असतो. म्हणूनच जोपर्यंत आपण मानसिकदृष्टय़ा तयार होत नाही तोपर्यंत वेळ घेणं आणि गरज असेल तर घरातील इतर सदस्यांनाही पटेल अशा शब्दांत सांगणं गरजेचं असतं.

दुसरी महत्त्वाची गोष्ट असते ती ‘वास्तवात राहण्याची’. बरेचदा, पती-पत्नीच्या बेबनावाचं हे मुख्य कारण असू शकतं. बऱयाच वेळा जोडप्यांमध्ये हे पाहिलं गेलेलं आहे की त्यांचा जोडीदार हा त्यांच्या कल्पनेप्रमाणेच असावा लागतो. मग अशा आदर्श कल्पना जोडीदारासाठी तणावाचं कारण बनू शकतात आणि जर त्यात तुलना असेल तर जोडीदार आत्मविश्वास गमावून बसू शकतो. हळूहळू त्याला संसार हे ओझं वाटू लागतं. म्हणूनच बऱयाच वेळा जोडप्यांना समुपदेशन करताना ‘माझा जोडीदार हा तासन्तास मोबाईलवरच असतो’ या तक्रारीला अत्यंत संवेदनशीलतेने हाताळावे लागते.

शोभना आणि शेखरला समुपदेशन करताना हे सर्व सांगावे लागले. जमेची बाजू ही होती की त्या दोघांनाही स्वतःच्या आणि एकमेकांबद्दल आता कुठलाही घाईगडबडीत निर्णय घ्यायचा नव्हता. तसंच त्या दोघांनीही आपल्या घरी मोठय़ांना तशी कल्पना दिल्यामुळे घरून आपोआप पाठिंबा त्यांना मिळाला. नियमित समुपदेशनाची सत्रे आणि त्यात दिला जाणारा सराव जो मुख्यतः जोडीनेच करायचा होता; तो त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे केला. हे सगळं करताना त्यांना अडचणी आल्या, काही वेळा दिलेला सराव हा त्यांना कठीणही वाटला. पण ती दोघं यात यशस्वी झाली.

आज ती दोघंही स्वतःला आणि एकमेकांना “Quality Time” देत आहेत. मोबाईल हा त्या दोघांसाठी शेवटचा पर्याय झाला आहे. मला इथे आवर्जून नमूद करावंसं वाटतं की, कुठलंही नातं हे आदर्श नसतं. पण त्या व्यक्तींसाठी योग्य असतं. प्रत्येक नात्यात अपेक्षा असणं साहजिकच आहे. परंतु वास्तवता आणि समोरच्या व्यक्तीच्या मर्यादा समजणंपण गरजेचं आहे. तरच खऱया अर्थाने नातेसंबंध बहरतील.

[email protected]

(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)

आपली प्रतिक्रिया द्या