महिलांच्या सक्षमीकरणासाठी…

>> सुनील कुवरे

अलीकडच्या काळात महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी स्पर्धा किंवा इतर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. थोडक्यात, हा दिन मोठ्य़ा उत्साहात साजरा करण्याची प्रथा रूढ झाली आहे. हे पाहिल्यावर महिलांविषयी केवळ सहानुभूती दाखविण्याचा तो एक प्रयत्न असतो, परंतु आज महिलांना केवळ सहानुभूती नको आहे तर समान हक्कांची, समान अधिकाराची किंवा समान वागणुकीची अनुभूती हवी आहे. कारण आजही आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक देशांत महिला दिनाचे गांभीर्य ओळखून त्यानिमित्ताने महिलांना भेडसावणाऱ्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न होत आहे, परंतु आपल्याकडे महिलांना सत्तेत ५० टक्के वाटा, महिलांना प्रधान्य, महिलांसाठी अमुक आणि महिलांसाठी तमुक. अशा प्रकारे अनेक पक्ष ढोल वाजवताना दिसतात. मात्र प्रत्यक्षात वस्तुस्थिती काय आहे? महिला उच्च पदावर पोहोचल्या, देशाच्या राष्ट्रपतीपदापर्यंत पोहोचल्या, परंतु महिलांवरील अत्याचार कमी झाले काय? अनेक कायदे तयार करण्यात आले. सत्तेतही महिला आल्या; परंतु टक्केवारी किती? अनेक मोठमोठय़ा नेत्यांची भाषणे संसदेत आणि सार्वजनिक ठिकाणी गाजतात. मात्र त्यानंतर पुढे काय? राजकीय, सामाजिक आणि अगदी सांस्कृतिक क्षेत्रातसुद्धा महिला-पुरुष समानतेचा नियम तंतोतंत पाळला जात नाही. सामाजिक स्तरावर तर महिलांवर होणारे अत्याचार आणि तिला मिळणारी सापत्न वागणूक अजूनही कायम आहे. सांस्कृतिक क्षेत्रामध्येदेखील महिलांचे चित्र विकृतपणे रंगवले जाते. आज महिलांना साधे संरक्षण मिळू शकत नाही. आज महिलांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे; पण घरात तरी त्या सुरक्षित आहेत काय? हाही एक असा प्रश्न की, त्यावर गेल्या कित्येक शतकात उत्तर मिळू शकलेले नाही.

आपली पुरुषप्रधान संस्कृती काही केल्या संपवण्यास तयारच नाही. स्त्रीयांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यास तयार नाही. स्त्री म्हणजे केवळ उपभोग्य वस्तू अशी आपल्याकडे संकल्पना आहे. ही संकल्पना पुरुषप्रधान संस्कृतीनेच रुजवली आहे. त्यामुळे स्त्रीला मातेसमान लेखणे गरजेचे असते. तिच्या देहाचा व्यापार आपल्या देशात होतो यासारखा विरोधाभास कुठे पाहायला मिळणार नाही. महिला सक्षमीकरणाच्या गप्पा आपण मारतो, परंतु अजूनही महिला सक्षम झालेली नाही. प्राचीन काळातील अशी अनेक उदाहरणे आहेत की, तिथे सर्व क्षेत्रांमध्ये महिलेने स्वतःचा सन्मान ठेवल्याचे पाहायला मिळते. काळाबरोबर काही बदल होत असतात, परंतु हे बदल सकारात्मक असायला हवेत. केवळ सरकारी योजना, कायदे करून स्त्री-पुरुष समानता येईल हे चुकीचे आहे, तर विविध क्षेत्रांतील महिलांचा सहभाग हा सकारात्मक वातावरणाचा भाग ठरू शकतो.

आपली प्रतिक्रिया द्या