लेख – शब्दावाचून कळताना…

513

>> दिलीप जोशी

एखादा विचार लिखित स्वरूपात मांडायचा तर लिपी आली. मग ती देवनागरी असेल किंवा रोमन किंवा अरबी लिप्यांची उक्रांती झाली आणि लिहिणं-वाचणं सोपं झालं. पुस्तकं झाली. उच्चारावाचून आपल्या भावना इतरांपर्यंत पोचवता येऊ लागल्या. कारण अक्षर म्हणजेच उच्चाराचा आकार ठरला. ते ठरावीक ‘नोटेशन’ झालं. संगीतात असतं तसं. ‘अ’ हे अक्षर नजरेस पडताच साक्षराला लगेच त्याचा उच्चार कळू लागला. माणसाच्या बौद्धिक प्रगतीच्या काळातला लिपी हा एक मोठा टप्पा होता.

प्राचीन काळापासून लिखाणाची गरज माणसाला वाटत आली आणि त्याने ‘शब्देविण संवादु’ साधण्यासाठी सर्वांना, म्हणजे त्या त्या परिसरातील लोकांना समजतील अशा ‘चिन्हां’ची निर्मिती केली. हा शब्देविण संवाद आध्यात्मिक नव्हे तर रोजच्या व्यवहारामधला होता. सुरुवातीची सारी ‘चिन्हं’ निसर्गाशी निगडित, आसपास जे दिसतं त्याची चित्रनोंद करून इच्छित संदेश देणं सुरू झालं. त्यातूनच चित्रलिपी आकाराला आल्या. चीन आणि जपानमध्ये तर चित्रलिपी छपाईचा काळ आल्यानंतरही सुरू राहिली. चिनी भाषेत 275 मुळाक्षरं होती. जपानी भाषेत कितीतरी होती. पुढे त्यात सुधारणा होत टायपोग्राफी, की-बोर्ड वगैरेंच्या सोयीसाठी बदल झाले. ते काळाच्या ओघात आवश्यकच होते. इंग्लिशमधली फक्त सत्तावीस मुळाक्षरे हे त्या भाषेच्या सहज छपाईचं बलस्थान.

पत्र लिहिणे, खलिते पाठवणे यातून भावना, संदेश पोचवण्याचं काम जगातील अनेक लिप्यांनी केलं. देवनागरी ही आपली लिपी जास्तीत जास्त उच्चारानुवर्ती मानली जाते. इंग्लिश शब्दकोषात सीएटी ‘कॅट’ शब्दाचा उच्चार त्यांना ‘केएटी कॅट’ असा कंसात लिहावा लागतो. असं स्पष्टीकरण मराठीला गरजेचं नसतं. आपण ‘अ’ म्हटलं की ‘अ’च उच्चारतो. हे या लिपीचं बलस्थान आहे.

बऱयाच वर्षांपूर्वी माझ्या एका मित्राकडे एक जपानी तरुण आला होता. त्सुयोशी नाकायामा असं त्याचं नाव. ‘योगा’ शिकायला तो हिंदुस्थानात आला. जुजबी इंग्लिश बोलणारा तो आमच्याशी बऱयाच वेळा हावभाव करून बोलायचा. तसंही ‘हाताची घडी, तोंडावर बोट’ या गप्प बसण्याच्या शालेय आज्ञेत हावभावालाच महत्त्व असतं. तर इथल्या गर्दीत त्याचं पाकीट हरवलं. त्याला वाईट वाटतं. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी त्याने एक कागद घेतला आणि त्यावर जपानी चित्रलिपीत बरंच काही लिहिलं. ‘हे काय?’ असं आम्ही विचारताच तो म्हणाला, ही एक निराशा घालवणारी कविता आहे. मग त्यातल्या काही गोष्टी त्याने समजावण्याचा प्रयत्न केला. आपण कागदावर आडव्या रेषेत लिहितो. तो एकाखाली एक चित्राक्षरं उभ्या पद्धतीने लिहीत होता, त्याची गंमत वाटली.

आम्हाला अगम्य असली तरी त्याची चित्रलिपी त्याला सुगम होती. नाहीतरी आपली लिपी त्याला कुठे समजत होती! तो कुतूहलाने मराठी पुस्तकं चाळायचा. चित्रांचा तक्ता बघून त्याने ‘उशी’ म्हटलं आणि ‘उशी’चा जपानी अर्थ ‘गाय’ होतो हे समजलं. मग लक्षात आलं शब्दोच्चार निराळे असले तरी चित्रांची भाषा संगीतासारखी वैश्विक आहे. जे आहे ते तसंच चितारलं तर भाषा वाचून कळण्याऐवजी भाषेवाचूनही समजतं.

पण अशी किती ‘चित्रं’ काढणार? कमी जागेत अधिक आशय नोंदण्यासाठी सध्याच्या लिपींची सोय उत्तमच आहे. इंग्लिशची लिपी तर जवळजवळ जगभर पसरतेय. त्यातही आता संक्षिप्त शब्दांनी सोयीसाठी धुमाकूळ घातलाय. ‘फिन-मिन’ म्हणजे फायनान्स मिनिस्टर असं लिहिलं जातं. प्रोग्रॅमचा ‘प्रॉग’ होतो. उद्याच्या जगाची भाषा अशीच असेल! कुणास ठाऊक काळ ठरवेल. आमच्या पिढीच्या नजरेला मात्र असे शब्द टोचतात हे खरं.

त्यापुढची गोष्ट म्हणजे ‘इमोजी’मधून व्यक्त होणं. म्हणचे बघा हजारो वर्षांचा प्रवास करून लिपी पुन्हा चित्राभिव्यक्तीकडे चाललीय. हसण्याचा, रडण्याचा, आश्चर्य वाटण्याचा इमोजी! शब्दाविण संवादु! मात्र याचाही चांगला उपयोग करता येतो हे पाश्चात्य देशातल्या एका प्राध्यापिकेने दाखवून दिलं. इतिहासाचे धडे शिकवताना प्राचीन इजिप्तमधल्या चित्रलिपीतल्या संकल्पना समजावताना तिच्या लक्षात आलं की, आजकालच्या ‘इमोजीं’मध्ये आणि त्या चित्रलिपीतील आशयामध्ये साम्य आहे. शेवटी किती काळ लोटला तरी झाडाचं, नदीचं चित्र तसंच राहणार. तसंच इजिप्तमधल्या त्या प्राचीन भाषेतलं. ‘नाच’ व्यक्त करणारं चित्र सध्याच्या ‘डान्स’साठी दाखवल्या जाणाऱया इमेजीसारखंच आहे. माणसाची संस्कृती अशी आवर्तनं घेत
असते. या इव्हियन मॅडम म्हणतात, चित्रातली अभिव्यक्ती अनेकदा शब्दांपेक्षा प्रभावी ठरते तेही खरंच. अशाच तुलनेतून किंवा विचारातून कधी सिंधू संस्कृतीतल्या लिपीचं गूढ उलगडेल? वाट पाहूया.

आपली प्रतिक्रिया द्या