साय-फाय – वर्क फ्रॉम कार ऑफिसपॅड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रसाद ताम्हनकर

लॉकडाउनच्या काळात वर्क फ्रॉम होम ची संस्कृती रुळली खरी पण ऑफिसमधल्या वातावरणात काम करण्याची मजा न्यारीच. वर्क फ्रॉम होम करतानाच तुम्हाला अगदी ऑफिसमध्ये बसून काम करण्याचा अनुभव मिळवून देणारी ‘ऑफिसपॅड’ ही ‘कन्सेप्ट कार’ ‘निसान’ या  जागतिक दर्जाच्या कार उत्पादक कंपनीने निर्माण केलेली आहे.

कोरोना महामारीच्या तडाख्याने अनेकांच्याच आयुष्याची वाटचाल बदलून टाकली, जीवनशैली बदलून टाकली, अगदी रोजच्या राहणीमानावरदेखील कोरोनामुळे प्रचंड बदल घडून आला आहे. दैनंदिन कामे आणि वेळापत्रकाबद्दल तर न बोललेलेच बरे! या कोरोनाच्या विषाणूच्या धाकाने जगभरच ‘लॉक डाऊन’ लागला, पण हार न मारता कोरोनाच्या मुकाबल्यासाठी एकीकडे औषधाचा शोध युद्धपातळीवर चालू असतानाच दैनंदिन कामकाजात खंड पडू नये यासाठी विविध क्षेत्रांनी अनेक नव्या संकल्पना उदयाला आणल्या.

‘वर्क फ्रॉम होम’, ‘एज्युकेशन फ्रॉम होम’ यांसारख्या संकल्पना तर आता रुळल्या आहेतच. पण आता आपलं सार्वजनिक जीवन पुन्हा सुरळीत होत आहे. या नव्या जीवनशैलीला अधिक सुखकर बनवण्यासाठी कोरोना काळातच विविध शोध आणि कल्पना राबवण्यात आल्या. ‘वर्क फ्रॉम होम’ची संकल्पना तर अनेक मोठय़ा कंपन्या आणि कर्मचायाऱयांनादेखील इतकी सोयीची वाटू लागली आहे की, गुगल, अॅमेझॉनसारख्या काही कंपन्यांनी तर अजून दोन वर्षेदेखील त्यांच्या निवडक कर्मचाऱयांनी ‘वर्क फ्रॉम होम’ करायला आपली हरकत नसल्याचे जाहीर केले आहे.

महत्त्वाचं काय, तर अनेक कर्मचारी या नव्या ‘वर्क फ्रॉम होम’ संस्कृतीला रुळले आहेत मात्र बरेचसे कर्मचारी असेही आहेत की, जे आजही आपल्या ऑफिसला विसरायला तयार नाहीत. ऑफिसचे वातावरण, तिथले टेबल, खुर्ची, फायली आणि मुख्य म्हणजे मोकळे वातावरण, निसर्ग या सगळ्या आनंदाला आपण कुठेतरी मुकत असल्याची खंत त्यांना सतत जाणवत असते. आता अशा कर्मचाऱयांसाठी आणि त्यांच्या बॉसेससाठीसुद्धा ‘निसान’ या जागतिक दर्जाच्या कार उत्पादक कंपनीने ‘ऑफिसपॅड’ ही ‘कन्सेप्ट कार’ निर्माण केलेली आहे. अत्यंत जबरदस्त फीचर असलेली ही कार तुम्हाला अगदी ऑफिसमध्ये बसून काम करण्याचा अनुभव मिळवून देणारी आहे.

‘निसान 350’ नावाने दाखल झालेल्या या ‘ऑफिसपॅड’मध्ये कामकाजासाठी एक टेबल आणि चक्क एक बाल्कनी देण्यात आलेली आहे. गाडीच्या आतूनच या बाल्कनीत जातादेखील येते. छानशी विश्रांती घ्यायला, बाहेरचा निसर्ग अनुभवायला ही बाल्कनी फारच उपयोगी आहे. सावलीसाठी एक मोठी छत्रीदेखील या गाडीसोबत देण्यात आलेली आहे. आता या गाडीला किती पसंती मिळते आणि व्यापारी तत्त्वावर तिचे उत्पादन चालू होते याकडे कार निर्मिती विश्वाचे लक्ष लागले आहे.

निसानने नुकत्याच भरलेल्या ‘ virtual 2021 Tokyo Auto Salon’ मध्ये या ऑफिस पॉड कन्सेप्टला सादर केले आहे. ‘वर्क फ्रॉम होम’ अर्थात ‘घरातून काम’ या संकल्पनेला निसानच्या या कन्सेप्ट कारने ‘कुठूनही काम’ या संकल्पनेत बदलले असल्याचे मत अनेक मोटार क्षेत्रातील तज्ञांनी यावेळी व्यक्त केले.  या कन्सेप्ट कारच्या डेकवर असलेल्या बाल्कनीने विशेषकरून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. कामाचा ताण जाणवल्यास या बाल्कनीलाच जोडलेली मोठी छत्री उघडून छानसा आराम करण्याची सोय अनेकांना भावली आहे. अगदी ऑफिसच्या कामातून विरंगुळा म्हणूनच नाही, तर एरवीदेखील निसर्गाच्या कुशीत एखादी छानशी कादंबरी हातात घेऊन या बाल्कनीत लोळायला नक्की हरकत नाही.

[email protected]