
>> प्रा. सचिन जयस्वाल
आज राष्ट्राचा नकाशा गाव आहे. राष्ट्राच्या उन्नतीसाठी अगोदर गाव विकसित झाले पाहिजे. हिंदुस्थान हा खेडय़ांचा देश आहे. गावाच्या विकासावर हिंदुस्थानचा विकास अवलंबून आहे. ग्रामीण भागात स्वच्छतेचे महत्त्व व त्याचा आरोग्याशी असलेला संबंध ‘ग्रामशुद्धी’ या अध्यायातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी मांडला आहे. गावाची शुद्धता, स्वच्छता, आरोग्य, गावाचा कारभार, वतनदार, इनामदार इत्यादी बाबतीतदेखील त्यांनी मते मांडली आहेत. या अर्थाने तुकडोजी महाराज विश्वशांतीचे दूतच म्हणावे लागतील.
विश्वस्नेह का ध्यान धरे। सबका सब सन्मान करे।।
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी समाजसेवेसाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. भजन, कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी जनजागृती केली. ग्रामोन्नतीसाठी त्यांनी लिहिलेला ‘ग्रामगीता’ हा ग्रंथ अजरामर असा आहे. ‘ग्रामगीते’च्या माध्यमातून राष्ट्रसंताने ग्राम विकासासाठी अनेक मार्ग सांगितले.
‘ग्रामगीता म्हणजे माझे हृदय,त्यात बसले सतगुरु राय’ अशा प्रकारची जाणीव करून देणारा ‘ग्रामगीते’चा अपूर्व ठेवा राष्ट्रसंतांनी सर्वांसाठी करून ठेवला आहे. त्यांनी ‘ग्रामगीते’सोबतच आत्मप्रथा, जीवनज्योत, लहर की बरखा, मेरी जपान यात्रा, प्रार्थना पद्धती इ. अजरामर ग्रंथांची रचना केली. हिंदुस्थानातील नागरिकांना चांगले जीवन जगता यावे, जनतेतील वाईट व अनिष्ट रूढीपरंपरा नष्ट होण्यासाठी राष्ट्रसंतांनी आपले विचार मांडले. भजने गाऊन सामाजिक तसेच शैक्षणिक वातावरण निर्माण केले. ‘ग्रामगीते’त एकूण 41 अध्याय आहेत. या सर्व अध्यायांमधून त्यांनी गावासंबंधी समस्या, रूढी, प्रथापरंपरा, सणउत्सव, विवाह, चालीरीती इत्यादीविषयक मार्गदर्शन केले. ग्राम निर्माण झाले तर माणूस निर्माण होईल व त्यातून राष्ट्राची प्रगती साधली जाईल असा मार्ग त्यांनी दाखविला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की,
‘का छळता दुसऱ्या धर्मा, का यात मिळे प्रभू प्रेमा?
कुणी उभेच भक्ती करिती, कुणी ध्यान समाधी धरती,
कुणी नमाज अपुले पडती, तुम्ही त्यास हसुनी निष्कामा,
का यात मिळे प्रभू प्रेमा?।।’
प्रत्येकाने स्वधर्माबरोबर इतर धर्माचासुद्धा सन्मान केला पाहिजे. विश्वकल्याणासाठी, सर्व धर्मीयांसाठी सामुदायिक प्रार्थना त्यांनी सांगितली. सामुदायिक प्रार्थनेत समोर कुणाचीही मूर्ती वा प्रतीक न ठेवता फक्त एक आसन ठेवतात. सर्व साधक आपापल्या ईश्वरास त्या आसनावर कल्पितात. इथे येऊन प्रत्येक साधक आपल्या बरोबरच विश्वकल्याणासाठी नतमस्तक असतो. अशा या सामुदायिक प्रार्थनेचे केंद्र प्रत्येक गावात असावे अशी राष्ट्रसंतांची इच्छा होती. बिघडलेली सामाजिक परिस्थिती सुधारण्यासाठी, धार्मिक सलोखा कायम ठेवण्यासाठी राष्ट्रसंत समाजातील विचारवंतांना, साधुसंतांना जनतेस मार्गदर्शन करण्याचे आवाहन करतात.
‘बिघडले ब्रीद जनतेचे, चरित्रे नासली सारी ।
मंत्र द्या राष्ट्रधर्माचा, सुधरविण्या तारण्या लोका ।।
बहुदिवसांची ही रुजली विषमता पंथ जातीयता ।
करा नवनिर्मिती जमूनी, वाजवा भारती डंका ।।
प्रार्थीतो संत साधूना शक्ती द्या बुद्धी द्या लोका ।।
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना ‘राष्ट्रसंत’ ही पदवी हिंदुस्थानचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी दिली. त्यांनी असे म्हटले होते की,‘‘आप केवल संत नही, बल्की राष्ट्रसंत हैं.’’ डॉ. राजेंद्र प्रसादांच्या आग्रहावरून तुकडोजी महाराजांनी राष्ट्रपती भवनात भजनांचा कार्यक्रम केला होता. 1962च्या हिंदुस्थान-चीन युद्धाच्या वेळी राष्ट्रसंतांनी सीमेवर जाऊन हिंदुस्थानी जवानांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
‘अरे मेला तर तू शहीद होशील कीर्ती तुझी देशावरती,
जिंकलास तर वीर म्हणोनी पदवी देतील राष्ट्रपती ।
या भारतमातेचे तुजवर प्रेम असे, अति ऋण असे,
तरुण असोनी रक्त न उसळे, नौजवान तुज म्हणावे कसे ।।’
अशा प्रकारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी तरुणांच्या मनात देशप्रेम रुजवण्यासाठी भजनांच्या माध्यमातून प्रयत्न केले. ग्रामीण भागात सुधारणा घडवण्यासाठी ‘ग्रामगीते’च्या माध्यमातून त्यांनी जनप्रबोधन केले. ‘ग्रामगीते’मधील ‘ग्रामरक्षण’ या अध्यायात गावाचे संघटन, त्यांचे फायदे यांचे महत्त्व सांगितले.
‘ईश्वरसेवाची गावसेवा, तो सर्वांच्याच सुखाचा ठेवा ।
परि काही असुरही असती गावा, यज्ञभंग करावया ।।’
जनसेवा हीच ईश्वरसेवा असते. गाव व ग्रामकरी जो निर्णय घेतील तो सर्वश्रेष्ठ असतो.
तुकडोजी महाराज प्रचलित व्यवस्थेवर प्रहार करतात. ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर नुसते ‘खेडय़ाकडे चला’ अशा घोषणा देऊन चालणार नाही, तर खेडय़ामध्ये प्रथम मूलभूत सोयीसुविधा निर्माण केल्या पाहिजेत. आज गावातील जनतेला राहायला घरे नाहीत, त्यांचे आरोग्य सांभाळणारी अद्ययावत व्यवस्था नाही. अगदी प्राणिमात्राप्रमाणे त्यांना जीवन जगावे लागते. अशा परिस्थितीत लोक खेडय़ाकडे कसे वळतील? असा सवाल करतात.
खेडय़ातील वास्तवतेचे अतिशय समर्पक वर्णन त्यांनी केले आहे. ग्रामीण भागातील हागणदारी, गटारगंगा, दूषित पाणी, वैयक्तिक व परिसरातील अस्वच्छता यामुळे ग्रामीण जनतेचे स्वास्थ्य बिघडते. अनेक साथींच्या आजाराने त्यांना ग्रासले जाते. शहराप्रमाणे कोणत्याच सोयासुविधा खेडय़ात नाहीत. मग ‘खेडय़ांकडे चला’ हा नारा यशस्वी कसा होऊ शकेल? असा प्रश्न ते विचारतात.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामनिर्माण कलेबद्दल प्रबोधन करतात. ग्रामनिर्माण झाल्यास खेडय़ांचा विकास व समाज निर्मिती होईल.
‘हात फिरे तिथे लक्ष्मी शिरे । हे सूत्र ध्यानी ठेवूनी खरे ।
आपले ग्रामची करावे गोजिरे । शहराहुनी ।।
हे गावची लोक विसरले । आळसाद्वारे दुर्दैव शिरले ।
दैन्य, दारिदय़ सर्वत्र भरले । गावामासी ।।
प्रत्येक व्यक्तीच्या अंगी एकतरी कला असावी. असा व्यक्ती आपल्या कलेच्या माध्यमातून तो आपला जीवन चरितार्थ करेल व त्याच माध्यमातून आपल्या समाजाची सेवा करेल. खेडय़ात असणाऱ्या विविध समस्यांचा केवळ ऊहापोह न करता त्या सोडवण्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे. ‘हात फिरे तिथे लक्ष्मी शिरे’ या सूत्रानुसार आपण काम केले तर बेरोजगारी दूर होईल, परंतु आज आळसाने माणसाला पूर्णतः परावलंबी केले आहे. त्यामुळे प्रत्येकाने काम केले पाहिजे. ग्रामीण जनतेला स्वास्थ्य नसेल तर काहीही साध्य होऊ शकत नाही. गावात आरोग्यविषयक अनेक गैरसमजुती असतात. देवाचा प्रकोप, दैवी शाप, नशिबाचा खेळ अशा खुळचट कल्पनांमुळे गावातील नागरिक डॉक्टरकडे न जाता भोंदू वैद्याकडे जातात यावर महाराज प्रहार करतात.
‘देवीदेवतांचा कोप झाला ।
कॉलरा पटकीचा सटका आला ।
म्हणजे सुधारू न शके कोणाला । बाप वैद्याचा ।।
अशा प्रकारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गावातील अंधश्रद्धेवर प्रहार करतात.
अशा या विश्वपुरुषास आज त्यांच्या जयंतीदिनी, ग्राम जयंतीदिनी शत शत नमन !



























































