वेब न्यूज – ‘झूम’ पराक्रमी विशाल गर्ग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> स्पायडरमॅन

जगभरातील इंटरनेटच्या विश्वात सध्या ‘झूम’ आणि ‘विशाल गर्ग’ हे दोन विषय प्रचंड चर्चेत आहेत. चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रियांना यातील विशाल गर्ग यांना सामोरे जावे लागत आहे. हे विशाल गर्ग आहेत तरी कोण आणि अचानक ते चर्चेत येण्याचे कारण काय?

विशाल गर्ग हे अमेरिकन कंपनी ‘बेटर डॉट कॉम’ या मॉर्गेज फर्मचे ‘सीईओ’ आहेत. 6 अब्ज डॉलर्स एवढे मूल्यांकन असलेल्या या कंपनीमध्ये जपानच्या ‘सॉफ्टबॅंक’ या बलाढय़ कंपनीचादेखील हिस्सा आहे. तर या विशाल गर्गसाहेबांनी नुकतीच आपल्या कंपनीच्या काही कर्मचाऱयांची एक ‘झूम मीटिंग’ बोलावली होती. तब्बल 900 कर्मचारी हजर असलेल्या या मीटिंगमध्ये विशाल गर्गसाहेबांचे सुरुवातीचे शब्द होते, ‘‘ तुम्ही आता या झूम मीटिंगमध्ये उपस्थित असाल, तर तुम्ही त्या दुर्दैवी कर्मचाऱयांपैकी एक आहात, ज्यांना कंपनीकडून कामावरून कमी केले जात आहे!’’ एका क्षणात, एका मीटिंगमध्ये तब्बल 900 कर्मचाऱयांना नारळ देण्यात आला. या मीटिंगनंतर काही तासांतच त्याचा व्हिडीओ इंटरनेटवर अपलोड झाला आणि जगभरातील नेटकऱयांना एकच धक्का बसला.‘अविश्वसनीय’, ‘हा प्रॅंक होता का?’, ‘हे काय चालले आहे नक्की?’, ‘अत्यंत दुर्दैवी आणि कठोर’ या शब्दांत जगभरातून लोकांनी आपला संताप व्यक्त केला.

या घटनेनंतर विशाल गर्ग पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी कंपनीने आपल्या कर्मचाऱयांना कमी करताना ’मार्केटमध्ये होत असलेले बदल, उत्पादन क्षमता आणि कर्मचाऱयांची कामगिरी यांचा विचार करता कंपनीला 15 टक्के कर्मचारी कपात करावी लागत आहे’ असे कारण दिले आहे. मात्र त्याच वेळी गेल्या आठवडय़ात या कंपनीला तिच्या गुंतवणूकदारांकडून 750 दशलक्ष डॉलर्सची मदत मिळाली आहे हे कर्मचाऱयांपासून लपवून ठेवण्यात आले असा आरोप होत आहे. तर या निर्णयानंतर गर्ग यांनी एक निनावी ब्लॉगपोस्ट लिहिल्याचादेखील आरोप होत आहे, ज्यात त्यांनी कर्मचाऱयांवर अकार्यक्षम तसेच कामाप्रति निष्ठावान नसल्याचा आरोप केला आहे.