प्रासंगिक- ‘जमावाची हिंसक प्रतिक्रिया; सामाजिक समस्या’

421

>> राजन वसंत देसाई

काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये एका पशुवैद्यकीय डॉक्टर तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला आणि नंतर त्या नराधमांनी तिचा खून करून देह पेट्रोल टाकून जाळून टाकला. ती मुलगी जनावरांची डॉक्टर, पण तिला खरी जनावरे कळलीच नाहीत. खरी जनावरे माणसेच होती. जनावरांना जनावर का म्हणावे हा खरा प्रश्न? नंतर जनतेच्या भावनांचा प्रकोप झाला आणि नराधमांच्या आणि विकृत मनोवृत्तींच्या विरोधात मोर्चे निघाले. सरकारचा निषेध झाला आणि कृष्णकृत्य करणाऱया नरधमांना त्वरित पकडून त्यांना फासांवर लटकवले पाहिजे असे सर्वसामान्यांना वाटले हे इथपर्यंत ठीक आहे. पण नंतर जमाव हिंसक बनला. काही ठिकाणी जाळपोळ झाली. हे मॉब रिऍक्शनचे कृत्य होते. योग्य-अयोग्य याचा निवाडा नाही तर त्याची वास्तविकता याचे भान ठेवण्याची गरज आहे.

देशात आज सीएए आणि एनआरआयच्या विरोधात दंगेधोपे चालू आहेत. दररोज वर्तमानपत्रात कुठे ना कुठे या कायद्याच्या विरोधात आणि बाजूने मोर्चे निघत आहेत. एखाद्या प्रश्नावर किंवा घटनेवर जनतेने आवाज उठवलाच पाहिजे ती लोकशाहीची गरज आहे, पण जनतेचा आवाज म्हणजे सार्वजनिक मालमत्तेची नासधूस हा अर्थ आहे का ? नागरिकत्वाच्या कायद्याच्या विरोधात हिंसक पाऊल कोणी उचलले? या देशात एकच नागरिकत्च हवे यावर खरे म्हणजे कुणाचेच दुमत नको. जगाच्या पाठीवर मला एक तरी देश दाखवा ज्या देशात परदेशी नागरिकांना असे स्वैराचाराने बिनदिक्कत राहता येते. परदेशी नागरिकांना हे फक्त पाहुणे म्हणून राहण्याचा अधिकार आहे आणि एखाद्या नागरिकाला जर दुसऱया देशात राहायचे असेल तर त्याला त्या देशाचे संपूर्ण कायदेकानून पाळावेच लागतात. साध्या चोरी किंवा सिग्नल तोडण्यावरून जबर दंड किंवा कडक कारवाई केली जाते. रस्त्यावर थुंकणे किंवा कागदाचा बोळा टाकणे हा अक्षम्य गुन्हा मानला जातो. आता आपल्या देशात राहणारे काही नागरिक केवळ स्वैराचारासाठी या देशात राहू इच्छित आहेत आणि नागरिकत्वावरून रणकंदन माजवत आहेत. विशेष म्हणजे त्यांना या देशाच्या राष्ट्रध्वजाला वंदन करणे, राष्ट्रगीत म्हणणे किंवा वंदे मातरम् म्हणणे, वाहतुकीचे नियम, कुटुंब नियोजनाचे नियम पाळणे हे त्यांना मान्य नाही. मग स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार करणाऱया या महाभागांना या देशात राहण्याचा अधिकार कोणत्या कायद्याने दिला जावा? वास्तविक असे कायदे मोडणाऱयांना आणि सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करणाऱयांच्या विरोधात कायदा अमलात आणला पाहिजे. राष्ट्रगीत, राष्ट्रध्वजाचा सन्मान आणि देशाच्या नागरिकत्वासाठी घटनात्मक तरतुदी आहेत. त्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे. यासाठी सरकारने कठोर पावले उचलण्याची त्याचबरोबर सर्वपक्षीय मंजुरी घेऊन जनतेच्या समोर त्या कायद्याचे वाचन मनन आणि चिंतन होणे गरजेचे आहे. असे झाले तर मॉब रिऍक्शनचा खरा अर्थ लक्षात येईल. आपण पुरातन काळात ऐकले-वाचले आहे. जेव्हा रामायण किंवा महाभारत घडले, इतकेच काय स्वराज्यासाठी शिवछत्रपतींनी ‘हर हर महादेव’ आणि त्यानंतर गांधीजींनी ‘चले जाव’ची चळवळ, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ‘जय हिंद’, ‘वंदे मातरम्’ या ज्या घोषणा दिल्या तो देव, देश आणि धर्म यांच्यासाठी अधर्माच्या विरोधात दिलेला आवाज होता. त्यामुळेच शिस्तबद्ध आंदोलने, लढाया झाल्या होत्या. त्यांनी आपल्याच सार्वजनिक मालमत्तेची कधी होळी केली नाही. म्हणूनच स्वातंत्र्य मिळाले. मॉब रिऍक्शन होण्यापूर्वी! जनतेचा पडसाद उमटण्यापूर्वी समाजाला, जनतेला पेटवण्यापेक्षा प्रथम सामंजस्यासाठी सर्वसामान्य जनतेला विश्वासात घेऊन सार्वमत घेणे गरजेचे आहे. आज शांतताप्रिय आणि सुसंस्कृत देशात अशा आगी लावून सर्वसामान्याच्या जीवनाचे वणवे पेटवणारे तयार होत आहेत. त्यासाठी सुजाण नागरिकांनी दक्ष राहून माथी भडकणाऱया नेत्यांना वेसण घातली पाहिजे. त्याचबरोबर राजकारण्यांनीसुद्धा साधनसुचिता बाळगून जनतेला विश्वासात घेणे गरजेचे आहे. प्रत्येक ठिकाणी देवाची आळंदी आणि चोरांची आळंदी निर्माण झाल्याचे चित्र आहे. समाजमन कुठे वळवायचे हे प्रत्येक नागरिकाने ठरवायचे. मॉब रिऍक्शन हे आगीसारखेच शस्त्र्ा आहे. आगीने अन्न शिजवता येते, त्याचबरोबर घरे जाळता येतात. कुठे जायचे आणि काय करायचे हे प्रत्येकाने ठरवण्याची वेळ आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या