निरामय – उपवासी धान्य

>> शमिका कुलकर्णी, (आहारतज्ञ)

आज आपण आपल्या आहारात उपवासाला कोणते धान्य खाऊ शकतो याबाबत माहिती घेऊया. ही धान्यं पौष्टिक आणि आरोग्यदायी आहेत आणि त्यापासून केलेले पदार्थ प्रत्येकाने आवर्जून उपवासात खावे. साधारणतः उपवासाला चालणारी धान्य म्हणजे :

राजगिरा – राजगिरा हा अतिशय पौष्टिक आणि चविष्ट असतो. यात उपयुक्त कर्बोदकांसह प्रथिने, पॅल्शियम, लोह, फॉस्फरस, मॅग्नेशियमसारखे उपयुक्त घटक असतात. या धान्यापासून भाकरी, घावन करता येतात. राजगिरा लाडू किंवा खीरही उत्तम होते. राजगिरा पिठात काकडी घालून चविष्ट थालीपीठ तयार होते. याबरोबर एखादी भाजी आणि दही खाल्ले की, संतुलित आहार उपवासात खाता येतो.

शिंगाडा – राजगिऱयासारखे शिंगाडय़ाचे पीठही पौष्टिक आणि आरोग्यदायी असते. शिंगाडय़ाच्या भाकऱया, थालीपीठ किंवा गोड पौष्टिक शिरा करता येतो.

वरी तांदूळ – वरीचे तांदूळ उपवासाच्या दिवशी भाताऐवजी खाता येतात. वरी तांदळासोबत दाण्याची आमटी आणि भाजी असे खावे. वरीचे तांदूळ आरोग्याला चांगले. त्यात उपयुक्त कर्बोदके आणि इतर जीवनसत्त्वे असतात.

उपवास भाजणी – उपवासाची भाजणी अतिशय पौष्टिक असते. कारण त्यात विविध घटक असतात. कर्बोदके, प्रथिने आणि जीवनसत्त्व त्याचबरोबर तंतुमय पदार्थ असल्यानेही उपवासाला योग्य असते. भाजणीचे थालीपीठ आणि दही हा पौष्टिक आहार असतो. थालीपीठ करताना त्यात काकडी किंवा लाल भोपळा घालावा.

उपवासाच्या फराळात अशा धान्यांचा समावेश आवर्जून केला पाहिजे. पोळी किंवा भाकरीची कमी भासत नाही. त्याबरोबर भाजी आणि दही खावे आणि योग्य फराळ करावा. त्यामुळे जेवणात व्यवस्थित खाल्ले जाते आणि थकवा किंवा अशक्तपणा येत नाही.

आपली प्रतिक्रिया द्या