पर्यटन : जबाबदारी व खबरदारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अजित कवटकर

आपला उत्साही दृष्टिकोन न थोपवता वैशिष्टय़पूर्ण नैसर्गिक आकर्षणं सुरक्षित, शाश्वत राहतील अशा प्रकारे त्यांचा आनंद घेणे पर्यटकांकडून अपेक्षित असते. खर्च होणारा प्रत्येक रुपया पूर्ण वसूल करण्याच्या संकुचित विचारसरणीतून पर्यटन स्थळं बदनाम होत आहेत. हे रोखण्याची मोठी जबाबदारी ही स्थानिक पातळीवर पर्यटन सेवासुविधा पुरविणाऱया व्यावसायिकांवर येते. गिऱहाईक बांधून ठेवण्यासाठी त्यांच्या संस्कारशून्य, उपद्रवी, बेशिस्तीला चालवून घेणे हे संस्कार-संस्कृतीला मारक ठरते. नैसर्गिक पर्यावरण, संस्कृतीची जोपासना करणे ही तेथील स्थानिकांची व येणाऱया पर्यटकांची सामाजिक जबाबदारीच नव्हे तर दायित्वदेखील आहे. ही खबरदारी प्रत्येकाने घेणे अत्यावश्यक आहे.

राष्ट्रीय एकात्मता व सांस्कृतिक देवाणघेवाण घडवून आणण्याचे कार्य जे अधिक परिणामकारकतेने करू शकते ते सेवा क्षेत्र म्हणजे पर्यटन होय. पर्यटनानिमित्ताने लोकांचा बाहेरगावी होणारा प्रवास, वास्तव्य, संपर्क यांमुळे निर्माण होणारा स्नेहपूर्ण बंधुभाव व जिव्हाळा हाच आपल्या देशातील विभिन्नतेला एकमेकाशी जोडून ठेवण्याचे कार्य करतो. इतर संस्कृतींमधील चांगल्याचा आदरपूर्वक स्वीकार करण्याचे संस्कार हे पर्यटनामधूनच लाभलेली प्रेरणा असावी. आपल्या रोजच्या जीवन पद्धती, रीतिरिवाज, भाषा – पेहराव – खाद्य संस्कृतीच्या तुलनेत वेगळा अनुभव देणाऱ्या त्या वेगळ्या प्रांतातील त्या गोष्टी कधीतरी अनुभवण्याची आसक्ती व जिज्ञासा ही प्रत्येकामध्येच थोडय़ाफार प्रमाणात असते आणि त्यातूनच एक रोमांचकारी व साहसी क्रिया म्हणूनदेखील पर्यटनाकडे बघितले जाऊ लागले आहे. आजचा तरुण वर्ग हा त्यामुळेच या उद्योगाचा एक आधारस्तंभ झाला आहे, परंतु आजचा पर्यटक हा नव्या प्रदेशातील संस्कृती व पर्यावरणाबद्दल किती संवेदनशील आहे? त्यांच्या जतन / संवर्धनासाठी तो किती जागरूक आहे?

पर्यटनाला प्रोत्साहित करणाऱ्या विविधतेत जे सर्वात अधिक आकर्षक आणि म्हणूनच निर्णायक ठरते ते ‘नैसर्गिक पर्यावरण’. आजच्या जागतिकीकरणाच्या युगात जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील वस्तू ही जगाच्या इतर कोणत्याही दुसऱ्या कोपऱ्यात सहजतेने उपलब्ध होत आहे. पाककलेचा प्रसारदेखील त्यातील अस्सलपणा टिकवून होत आहे, परंतु एखाद्या प्रदेशाच्या भौगोलिक व सांस्कृतिक नैसर्गिकतेचे मात्र स्थलांतर किंवा आयात – निर्यात करता येत नाही. ते शुद्ध रूपात अनुभवण्यासाठी त्यांच्या त्या नैसर्गिक अधिवासातच जाऊन अनुभवणे अपरिहार्य असते, परंतु आजच्या भौतिकवादी जगातील पर्यटन उद्योगदेखील या नैसर्गिकतेला दुर्लक्षून, त्यात अनैसर्गिक बदल घडविणारी अवहेलना करून स्वार्थ साधण्याचा संकुचित दृष्टिकोन ठेवत आहे, पण एखाद्या निसर्गरम्य किंवा पर्यटनदृष्टय़ा समृद्ध असणाऱया प्रदेशाचे ते नैसर्गिक वेगळेपणच जेव्हा असंवेदनशील स्वार्थकारणात नष्ट केले जाते तेव्हा ते ठिकाण आपले नैसर्गिक / सांस्कृतिक वैभव, समृद्धी, सौंदर्य तर गमावतेच, परंतु त्याचबरोबर त्यावर निर्भर असणाऱया मनुष्य व प्राणी जगतालादेखील निराधार करते. त्यासाठी स्थानिकांनी आपली निसर्ग समृद्धी व सांस्कृतिक वैभव टिकवूनच पर्यटन व्यवसायाची व्यावहारिकता जोपासावी.

भगवान परशुरामाची भूमी म्हणून ख्याती असलेले कोकण हे निसर्गाने तर समृद्ध आहेच, पण त्यास अलंकृत करणारी संस्कृती ही तेवढीच सुंदर, लोभस आहे. हेच अनुभवण्यासाठी आज पर्यटक मोठय़ा संख्येने या प्रदेशाला पहिली पसंती दाखवत आहेत. घनदाट हिरवळीच्या कुशीत वसलेल्या रत्नागिरी, सिंधुदुर्गचे स्वच्छ – निरागस समुद्र किनारे, तेथील भाषा – पाककला – लोककला व परंपरा, पाहुणचार, धर्मसंस्कृती हे जगाच्या पाठीवरदेखील आकर्षक ठरतील एवढे अद्वितीय आणि या सगळ्यावर मुकुटमणी म्हणजे इथली बहारदार वनस्पतीसृष्टी आणि पारंपरिक जीवनशैली. पाहण्यासाठी इथे लोक येतात. इथेच कशाला, तर प्रत्येक ठिकाणाबद्दलची आसक्ती ही तेथील वैशिष्टय़ांसाठीच असते. अशा या नैसर्गिक पर्यावरण, संस्कृतीची जोपासना करणे ही तेथील स्थानिकांची व येणाऱ्या पर्यटकांची सामाजिक जबाबदारीच नव्हे तर दायित्वदेखील आहे. ही खबरदारी प्रत्येकाने घेणे अत्यावश्यक आहे.

महाराष्ट्राच्या दक्षिणेला असलेले एक छोटेसे राज्य, जे सांस्कृतिकदृष्टय़ा अतिशय समृद्ध, संपन्न, सुंदर आहे, परंतु सध्या ‘बुझ कल्चर’ म्हणजे दारू संस्कृतीचा तेथे वाढत असलेला अंमल तेथील संस्कृतीच्या विद्रूपीकरणास काही प्रमाणात कारणीभूत ठरत आहे. तेथे येणारे बहुतांश पर्यटक हे जर ‘निर्भय व स्वच्छंद’पणे दारू पिता यावी, मनसोक्त धिंगाणा करता यावा या प्राथमिक उद्देशानेच तेथे येण्याचे प्रयोजन करत असतील तर तेथील मूळ संस्कृतीत जलद गतीने आणि मोठय़ा फरकाने बदल घडणे क्रमप्राप्त आहे. अशा पर्यटकांचा निरंतर ओघ हा सातत्याने स्थानिकांना जर त्यांच्या प्राकृतिक पारंपरिकतेला अव्हेरून आधुनिक अनैसर्गिकतेला स्वीकारण्यास प्रेरित करत असेल आणि तेथील अर्थव्यवस्थेस या सगळ्याला नाइलाजास्तव प्रोत्साहन देणे अपरिहार्य ठरत असेल तर मग तेथे आमूलाग्र प्रमाणात सांस्कृतिक परिवर्तन घडून येणे स्वाभाविक आहे. या सर्व स्थित्यंतराचा तेथील भौगोलिक घटकांवरदेखील तेवढाच विपरीत परिणाम होत त्यातील नैसर्गिकता लोप पावू लागली की, मग तो अतिरेक विध्वंसक ठरतो. हा अनैसर्गिक बदल पुढे ते सारं काही हिरावून घेतो, ज्यासाठी हा सगळा अविचारी अट्टाहास केला जात आहे. कृत्रिमता आज ज्या गतीने अतिक्रमण करत नैसर्गिकतेला हद्दपार करीत आहे ते पाहता पुढे ‘हरितगृहांप्रमाणे’ सारं काही एका नियंत्रित वातावरणात उभारलेल्या ‘मॅनमेड पर्यावरणाचा’ भाग असण्याची शक्यता अतिशयोक्ती नसणार. ज्या संस्कृतीने, पारंपरिकतेने, पर्यावरणाने जगाला आपल्या इथे आकर्षित केले, तेच त्या जगातील प्रत्येक घटकाच्या वैविध्यपूर्ण अपेक्षांच्या पूर्ततेसाठी जर बदलले किंवा नष्ट केले जाणार असेल तर मग आपली सांस्कृतिक अस्मिता आणि त्याविषयीच्या आपल्या स्वाभिमानाचे काय ? पैशांसाठी वापर, शोषण करून शेवटी त्यांना तिलांजली देण्यासारखे हे नाही का?

दोन – चार दिवसांच्या मानसिक व शारीरिक विरंगुळ्यासाठी पर्यटन करणारा नक्कीच मज्जा – धम्माल – मस्तीची अपेक्षा ठेवतो. संस्कारांच्या मर्यादेबाहेर न जाऊनदेखील हे तेवढय़ाच उत्साहात करता येणे शक्य असते. स्थानिक सामाजिक जडणघडणीचा, तेथील आदर्शांचा, नीतिमूल्यांचा, परंपरांचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे तिथे आपली वागणूक ठेवणे हा तेथील संस्कृतीचा सन्मान करणे होय. आपला उत्साही दृष्टिकोन न थोपवता वैशिष्टय़पूर्ण नैसर्गिक आकर्षणं सुरक्षित, शाश्वत राहतील अशा प्रकारे त्यांचा आनंद घेणे पर्यटकांकडून अपेक्षित असते. खर्च होणारा प्रत्येक रुपया पूर्ण वसूल करण्याच्या संकुचित विचारसरणीतून तेथील सेवा – संसाधनं लुटणं, ओरबाडणं, वाया घालवणं तसेच अश्लील, बीभत्स वर्तणुकीने आपल्या विकृत मनाचे समाधान करण्याच्या मानसिकतेमुळेच पर्यटन स्थळं बदनाम होत आहेत. हे रोखण्याची मोठी जबाबदारी ही त्या स्थानिक पातळीवर पर्यटन सेवासुविधा पुरविणाऱया व्यावसायिकांवर येते. गिऱहाईक बांधून ठेवण्यासाठी त्यांच्या संस्कारशून्य, उपद्रवी, बेशिस्तीला चालवून घेणे, किंबहुना त्यांना प्रोत्साहनच मिळेल यादृष्टीने स्वतःमध्ये, सेवांमध्ये त्यांच्या अयोग्य मागणीनुसार अनपेक्षित बदल करणे हेच तेथील संस्कार – संस्कृतीला मारक ठरते. शिस्त बिघडविणारे पर्यटकांचे चोचले पुरविणे जेव्हा कटाक्षाने बंद होतील तेव्हा पर्यटकाचा पर्यटनाबद्दलचा दृष्टिकोन अधिक शुद्ध, सात्त्विक होईल. परंपरांचे प्रदर्शन – प्रसरण करणारा सांस्कृतिक स्वाभिमान हा पर्यटनाला अधिक बळ तर देईलच, पण त्याच बरोबर तेथील प्राकृतिक संसाधनांच्या संवर्धनासदेखील प्रेरक ठरेल.

> [email protected]