उमेद – दिव्यांगांचे संगोपन करणारे `संगोपिता’!

>> सुरेश चव्हाण 

मानसिकदृष्टय़ा विकलांग मुलांनाही सर्वसामान्य मुलांसारखं आयुष्य जगता यावं या उद्देशाने बदलापूरपासून सात किलोमीटरवरील `बेंडशीळ’ या गावाजवळील निसर्गरम्य परिसरात रवींद्र व सुजाता सुगवेकर या दांपत्याने 2003 साली `संगोपिता’ संस्थेची स्थापना केली. `सेरेब्रल पाल्सी (मस्तिष्कघात)’ ने ग्रस्त असलेला सुगवेकर दांपत्याचा 28 वर्षीय मुलगा, हेच `संगोपिता’च्या उभारणीमागील मुख्य कारण ठरले.

एखाद्या घरात मानसिकदृष्टय़ा विकलांग मूल जन्माला आलं तर त्या घराची काय अवस्था होते, हे आपण पाहतो. अशा मुलांच्या आई-वडिलांची अवस्था तर फारच दयनीय होते. या मुलाचं संगोपनाचा आयुष्यभराचा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहतो. मुलाच्या आईला तर 24 तास डोळ्यांत तेल घालून त्याची काळजी घ्यावी लागते. तिला कुठेही बाहेर जाता येत नाही. अशा मुलांसाठी आता काही संस्था अगदी मनोभावे काम करताना दिसतात. बदलापूरपासून सात किलोमीटरवरील `बेंडशीळ’ या गावाजवळील निसर्गरम्य परिसरात `संगोपिता’ ही अशीच एक संस्था रवींद्र व सुजाता सुगवेकर हे दांपत्य चालवत आहेत. `संगोपिता’ म्हणजे संगोपन. मतिमंद, गतिमंद, ऑटिस्टिक (स्वमग्न व्यक्ती), स्पास्टिक (मेंदूला पक्षाघात झालेली व्यक्ती) अशा मुलामुलींचे संगोपन ते इथे त्यांच्या सहकाऱयांसह करतात. सध्या त्यांच्याकडे विविध वयोगटांतील 62 मुलं आहेत; ज्यामध्ये 10 मुली आहेत. सरकारी नियमांनुसार अठरा वर्षं पूर्ण झालेल्या मुलांना येथे प्रवेश दिला जातो. त्यामुळे 18 ते 67 वर्षांपर्यंतचे स्त्राr-पुरुष इथे राहतात.

28 वर्षांपूर्वी सुगवेकर दांपत्याच्या पोटी जन्मलेल्या अक्षयला जन्मतच `सेरेब्रल पाल्सी’ (मस्तिष्कघात) हा आजार जडला. यावर त्यांनी अनेक उपचार केले. अक्षयची आई सुजाता या जवळपास सात वर्षे बदलापूरहून रेल्वेतून त्याला उचलून हाजी अली येथील `ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ फिजिकल मेडिसीन अॅण्ड रिहॅबिलिटेशन’ या संस्थेत थेरेपीसाठी घेऊन जात होत्या. थेरेपीमुळे अक्षयच्या बौद्धिक विकासामध्ये काही प्रमाणात सुधारणा झाली, मात्र शारीरिकदृष्टय़ा आजही तो परावलंबी आहे. आपल्याच मुलाची अशी अवस्था पाहत असताना सुगवेकरांना आपणच अशा विशेष मुलांसाठी प्रशिक्षण, उपचार आणि निवासाची सोय करावी असा विचार मनात आला. तो त्यांनी बदलापुरातील इतर पालक व बदलापुरातील काही डॉक्टरांना बोलून दाखवला. त्यांचे काही मित्र, इतर सहकारी तसेच रोटरी क्लब व लायन्स क्लब यांच्या मदतीतून 2003 साली `संगोपिता’ ही संस्था स्थापन झाली.

सुरुवातीला सुगवेकर यांनी बदलापूरमध्येच सर्वेक्षण केले तेव्हा त्यांना असं आढळून आले की, केवळ बदलापूरमध्येच 189 अशी विशेष मुले आहेत. त्यानंतर त्यांनी या मुलांच्या पालकांना विश्वासात घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली व आपल्या प्रकल्पाची माहिती त्यांना दिली. यातूनच या प्रकल्पाची अनेकांना माहिती झाली व कामाला सुरुवात झाली. या कामात त्यांना डोंबिवलीतील व्यावसायिक विनायक उल्लेंगल आणि सिंगापूरमधील रहिवासी रमेश शामदासानी यांनी संस्थेची वास्तू उभारण्यासाठी मोलाची आर्थिक मदत केली. तसेच त्यांचे बँकेतील सहकारी, इतर पालक व अनेक देणगीदार यांच्या मदतीमुळे आज येथे अनेक उपाम सुरू आहेत. मुलांना राहण्याची उत्तम सोय झाली आहे. त्यामुळे मुलांचे पालक निश्चितपणे आपल्या मुलांना येथे ठेवतात. त्यांच्यात झालेली सुधारणा, प्रगती बघून त्यांना हायसे वाटते.

मतिमंद मुलांना विशेष वागणूक द्यावी लागते. अशी विशेष वागणूक घरी देणे प्रत्येक पालकाला शक्य होत नाही. कुटुंबातील इतर सदस्य, मित्रपरिवार, नातेवाईक यांच्याकडूनही त्यांना उपेक्षा सहन करावी लागते. तेव्हा अशा संस्थांमधून या मुलांना विशेष वागणूक, उपचार व प्रशिक्षण दिले तर या मुलांच्या कुटुंबांवरील ताणतणाव कमी होतो. त्यासाठी प्रशिक्षित शिक्षक व इतर कर्मचारी वर्ग अशा मुलांवर कटाक्षाने लक्ष ठेवून असतो. कारण ही मुलं कधीही आाढमक होऊ शकतात. त्यामुळेच तरुण वयातील अशा मुलांना घरी सांभाळणं, त्यांच्या आई-वडिलांना खूप कठीण जातं असतं तसंच ते धोकादायकही वाटतं. अशा परिस्थितीत अशा निवासी केंद्रांचा त्यांना मोठा आधार वाटतो.

`संगोपिता’मध्ये प्रवेशासाठी पालकांकडून अगदी सर्वसाधारण शुल्क स्वीकारले जाते व ज्यांची जशी परिस्थिती असेल त्यानुसार मुलांच्या संगोपनासाठी निधी स्वीकारला जातो. या शाळेत वयोगटांनुसार व प्रत्येक मुलाच्या क्षमतेनुसार त्यांना कलाकुसर शिकवली जाते. संपूर्ण परावलंबी असणाऱ्या मुलांचे दात घासणे, अंघोळ घालणे, नैसर्गिक विधी आटपणे अशा सर्व जबाबदाऱ्या येथील कर्मचारी मनोभावे पार पाडताना दिसतात. यामध्ये फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, मालिश, अॅक्युप्रेशर, मानसोपचार इत्यादी वैद्यकीय उपचार दिले जातात. या मुलांच्या मनात असणारी भीती, असुरक्षिततेची भावना, न्यूनगंड मुळापासून नाहीसा व्हावा यासाठी `संगोपिता’ विविध स्तरांवर प्रयत्न करीत आहे. तसेच अशा विशेष मुलांच्या जबाबदारीचं भान समाजातही जागृत व्हावं यासाठीदेखील संस्था प्रयत्नशील आहे.

[email protected].