वेबसीरिज – बातमीचा मागोवा

>> तरंग वैद्य

पत्रकार, पोलीस आणि नेतेमंडळींचा खेळ बघण्यासाठी सोमनाथ बताब्याल यांच्या `द प्राईस यू पे’ या कादंबरीवर आधारित `क्राइम बीट’ या मालिकेत मसाला आहे तसंच मनोरंजनही आहे.

पोलीस तपास कथा वेब सीरिजचा आवडता विषय. असाच एक विषय घेऊन झी 5 या ओ.टी.टी. प्लॅटफॉर्मवर  21 फेब्रुवारी, 2025 रोजी `क्राइम बीट’ नावाची वेब सीरिज आली आहे. 30 ते 35 मिनिटांचे आठ भाग असलेली ही मालिका आपल्याला पकडून ठेवते हे नक्की.

बिन्नी चौधरी हा कुख्यात अपराधी आहे. अपहरण करून खंडणी उकळायची हा त्याचा व्यवसाय. दिल्लीतील इंद्रनगर या गरीब वस्तीत त्याचे घर असून तो तेथील गरजूंना, गरीबांना भरपूर मदत करतो, त्यामुळे वस्ती त्याला देव मानते. काही वर्षांपूर्वी त्याने एका दहा वर्षांच्या मुलाचे अपहरण केले होते. मुलाच्या वडिलांनी खंडणी देणे कबूल केले, पण पोलिसांनाही कळवले, त्यामुळे चकमकीत त्या मुलाचा मृत्यू होतो आणि बिन्नी हत्येचा मुख्य आरोपी ठरतो. या प्रकरणानंतर तो पोलिसांना हुलकावणी देऊन देश सोडून पळून जातो. त्याचे वास्तव्य अफगाणिस्तान येथे असल्याचे पोलिसांना कळते आणि ते तेथील पोलिसांची मदत घेतात, पण तो तेथूनही निसटतो. आता तो दिल्लीत परत येतोय याची सत्ताधारी नेत्यांना खात्रीशीर माहिती मिळते आणि त्यांचे धाबे दणाणतात कारण बिन्नी राष्ट्रमंडळ खेळात झालेल्या पैशांचा घोटाळा उघडकीस आणणार असल्याचे बोलून दाखवतो. ही बडी नेतेमंडळी पोलिसांवर दबाव आणते. पोलीस यंत्रणा कामाला लागते आणि बिन्नी दिल्लीत दाखल होतो. मूळ कथा हीच असली तरी एका वृत्तपत्र संस्था आणि एका पत्रकाराच्या माध्यमातून कथा उलगडत जाते व प्रसारमाध्यमातील राजकारण, टी.आर.पी. वाढवण्याचे खेळ दाखवत पुढे जाते.

बिन्नी दिल्लीत आला आहे का, तो कुठे राहतोय याचा थांगपत्ता लावण्यासाठी पोलीस आपल्या खबरींकडून माहिती काढतात. एक्सप्रेस वृत्तपत्राचे संपादक आमीर पण बिन्नीच्या शोधात असतात. कारण काही वर्षांपूर्वी झालेल्या मुलाच्या मृत्यूच्या वेळेस खंडणी घेऊन तेच गेले असतात आणि त्यांनीच मुलाच्या वडिलांना न सांगता पोलिसांना कळवले असते.

अभिषेक सिन्हा या पत्रकाराला एक्सप्रेसमध्ये नोकरी मिळते, पण चांगली व खरमरीत बातमी जी वृत्तपत्राचा खप वाढवेल अशी तो आणू शकत नसतो. त्यामुळे आमीर त्याच्यावर नाखूश असतो. आपली नोकरी टिकवण्यासाठी अभिषेक खूप धडपड करत असतो आणि त्याच्या हाती बिन्नी प्रकरण लागतं. तो खूप मेहनत घेतो. आमीरला ही बातमी आवडते आणि पहिल्यांदाच त्याची बातमी `फ्रंट पेज’वर येणार असल्यामुळे अभिषेक उत्साहित व आनंदित असतो. त्याचा हा उत्साह आणि आनंद काही तासांपुरताच असतो. कारण सकाळी बातमी छापून येते, पण आमीरच्या नावाखाली. आमीरसोबत हुज्जत घातल्यावर त्याला नोकरीतून काढून टाकले जाते.

इकडे बिन्नीला अभिषेक आपल्याबद्दल माहिती काढत असल्याचे कळते आणि तो त्यालाच उचलून आणतो. बिन्नीला एक गोष्ट लक्षात येते की या पत्रकाराचा वापर करून तो सत्य लोकांसमोर आणू शकतो. तो अभिषेक सिन्हाला `एक्सक्लुसिव्ह इंटरह्यू’ देणार याची घोषणा करतो. त्याच्या चाहत्यांची एकच गर्दी त्याच्या बंगल्यासमोर जमा होते आणि पोलिसांचा ताफाही त्याला अटक करण्यासाठी सज्ज होतो. नेतेमंडळी आणि राष्ट्रमंडळ खेळातील भ्रष्ट कंत्राटदार बिन्नी काय सांगणार या भीतीने तणावाखाली असतात.

मालिकेत मुख्य भूमिका अभिषेक सिन्हा या पत्रकाराची असून साकिब सलीमने ती योग्यरीत्या निभावली आहे. बिन्नी चौधरी राहुल भट झाला आहे. त्याला संवाद बोलण्यापलीकडे करण्यासारखे काही दिलेले नाहीये. त्याच्या `पार्टनर इन क्राइम’च्या भूमिकेत सई ताम्हणकर आहे, जिचा अभिनय सहज आहे. दानिश हुसेन आमीरच्या मोठय़ा लांबीच्या भूमिकेत असून योग्य वाटतो. त्यामानाने कमी लांबीची भूमिका असलेले आदिनाथ कोठारे आणि किशोर कदम भाव खाऊन जातात. राजेश तेलंग आता वेब माध्यमातील मोठे नाव झाले आहे. त्यांनी आपल्या भूमिकेशी न्याय केला आहे. विपीन शर्मा यांची निवड पण योग्य आहे.

देशात अनेक घोटाळे होत असतात, पण बिन्नी याच घोटाळ्याचा उलगडा करण्यासाठी का मागे लागतो याचे उत्तर कदाचित लेखकाकडेही नाहीये. तसेच तो ज्या पद्धतीने पोलिसांना गुंगारा देतो ते बालिश वाटते तरीही पत्रकार, पोलीस आणि नेतेमंडळींचा खेळ बघण्यासाठी सोमनाथ बताब्याल यांच्या `द प्राईस यू पे’ या कादंबरीवर आधारित `क्राइम बीट’ ही मालिका आपण बघू शकता इतका मसाला यात नक्कीच आहे.

tarangvaidya001@gmail.com

 (लेखक सिनेदिग्दर्शक व पटकथाकार आहेत.)