
यादव तरटे पाटील
जंगलांचे भौगोलिक स्थान अनेक अंगांनी महत्त्वपूर्ण ठरते. म्हणूनच महाराष्ट्रातील अनेक अभयारण्ये आपल्या आगळय़ावेगळय़ा स्थानांमुळे प्रसिद्ध आहेत. सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेले यावल अभयारण्य म्हणजे मेळघाट ते थेट गुजरातमधील डांगच्या जंगलापर्यंत वाघांचा संचारमार्ग होता. मात्र अपामणाच्या विळख्यात असलेल्या यावल अभयारण्याला मोकळा श्वास कधी घेता येईल, हा प्रश्न अधिक क्लेशदायक वाटतो.
जंगलांचे भौगोलिक स्थान अनेक अंगांनी महत्त्वपूर्ण ठरते. म्हणूनच महाराष्ट्रातील अनेक अभयारण्ये आपल्या आगळय़ावेगळय़ा स्थानांमुळे प्रसिद्ध आहेत. सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेले यावल अभयारण्य… अनादी काळापासून मेळघाट ते थेट गुजरातमधील डांगच्या जंगलापर्यंत वाघांचा संचारमार्ग होता. मेळघाट, अंबाबरवा ते थेट यावल अभयारण्य, अनेरडॅम अभयारण्य, तोरणमाळ ते गुजरातमधील सूरपाणेश्वर अभयारण्य असा वाघांचा नैसर्गिक संचार मार्ग (corridor) मानला जातो. म्हणूनच यावल अभयारण्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. 21 फेब्रुवारी 1969 रोजी यावल अभयारण्याची घोषणा करण्यात आली. सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत 175 चौ. कि.मी. जंगलपट्टय़ात यावल अभयारण्य पसरलेले आहे. या अभयारण्यामध्ये बघण्यासारखे भरपूर काही आहे. वन्य जीव दर्शनाची लालसा असेल त्यांनी अनेर व सुकी ही धरणे गाठावी. दोन्ही धरणांच्या जलाशयाच्या आसऱयाने अनेक वन्य जिवांचा येथे मुक्त संचार आहे. वैशिष्टय़पूर्ण पक्षी असलेला रानपिंगळा, धनेश, चंडोल, हळद्या, भटतितर, सोनपाठी सुतार, तारवाली भिंगरी, कोतवाल, टिटवी, शेकाटय़ा, पाणकावळा, धोबी, पाणकोंबडी आदी पक्ष्यांसह सुमारे 200 हून अधिक प्रजातींचे पक्षी येथे पाहायला मिळतात. इतकेच काय तर येथे अनेक पाहुणे पक्षीही भेट देतात. येथील सरिसृपांची विविधताही संपन्न असून नाग, मण्यार, फुरसे, घोणस, काळडोक्या, डुरक्या घोणस, मांजऱया, हरणटोळ इ. साप येथे आहेत. तद्वतच येथे नाना प्रकारच्या पाली व सरडे पाहायला मिळू शकतात. या अभयारण्य परिसरात अलीकडेच पट्टेदार वाघाचा वावर आढळलाय. म्हणूनच याचे अधिक प्रमाणात महत्त्व अधोरेखित झाले आहे. बिबटा, तरस, रानकुत्रा, अस्वल, कोल्हा, रानडुक्कर, रानमांजर या प्राण्यांबरोबरच नीलगाय, चिंकारा, चितळ, चौशिंगा, सांबर इ. सस्तन प्राण्यांचा येथे वावर आहे.
संपूर्ण सातपुडा पर्वत म्हणजे जैवविविधतेचा खजिनाच आहे. साग, अर्जुन, अंजन, बेहडा, हिरडा, ऐन, शिसव, तिवस, खैर, तेंदूसह येथील संपूर्ण वृक्षसंपदा समृद्ध आहे. पावसाळय़ात पाल, जामन्या डोंगररांगांतील ढगांची भाऊगर्दी पाहिल्यावर आपण स्वर्गात असल्यासारखा भास होतो. हिवाळय़ाच्या मौसमातही हे डोंगर नयनरम्य असतात. केवळ जंगल परिसरच पाहण्यासारखा नसून येथील प्राचीन मंदिरे पाहण्यासारखी आहेत. सातपुडय़ाच्या गाभाऱयात मनुदेवीचे मंदिर, जवळच उष्ण पाण्याच्या झऱयासाठी प्रसिद्ध उनपदेव, मुक्ताईनगरच्या संत मुक्ताबाई, पुरातन चांगदेव मंदिर पाहून श्रद्धाळू समाधान उराशी घेऊन परत जातात. देवदर्शनासाठी मध्य प्रदेशमधील खरगोन जिह्यातील शिरवेलचे महादेव व गोरक्षनाथ मंदिर प्रसिद्ध आहे. सातपुडय़ातील सर्वाधिक उंच शिखरे पंचपांडव व बुरडीबोरी बरडी ही 3 हजार 200 फुटांहून अधिक उंचीची आहेत. गिर्यारोहणाची आवड असणाऱयांनी येथे एकदा तरी नक्कीच भेट द्यावी. पालजवळ असलेल्या चिचाटीच्या बनातून सातपुडा पर्वत न्याहाळताना मन प्रफुल्लित होते. मात्र 15 ते 20 वर्षांपूर्वीपासूनच येथे जंगलतोड सुरू झाली आहे. पाल यावल अभयारण्य बकाल होते की काय, असे चित्र निर्माण झाले होते. मात्र वन विभाग व स्थानिक वन्य जीवप्रेमींच्या पुढे हे सगळे थांबविण्याचे आव्हान आहे. राजकारण आणि अपामण याला आडवे येत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
पर्यटकांसाठी या अभयारण्य परिसरात पाहण्यासारखे भरपूर काही आहे. पाल, देवझरी, उनपदेव, चारठाणा येथे निवासाची सोय आहे. सुकी, मांजल व अनेर या तीन मुख्य नद्यांमुळे यावल अभयारण्याचे क्षेत्र हिरवेगार व जैवसंपन्न झाले आहे. या अभयारण्यात अनेक वृक्ष प्रजातींबरोबर असंख्य वनौषधीही आढळतात. पाल यावल अभयारण्य परिसरात सुकी धरण सन 1977 मध्ये पूर्ण करण्यात आले. हे धरण येथील वन्य जिवांची तहान भागवते. अभयारण्यात जामन्या, गाडय़ा, गारबर्डी व उस्मळी इ. गावे आहेत. ही सर्व गावे प्रामुख्याने तडवी, पावरा व कोळीबहुल आदिवासी गावे आहेत. सन 2013 मध्ये वन विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार यावलमध्ये तब्बल 1 हजार 959 हेक्टर क्षेत्रावर अपामण तर 609 झोपडय़ांनी बस्तान बसविल्याचे दिसून आले होते. वन हक्क कायदा अन् त्याला अनुसरून असलेली जमीनपट्टय़ाची खिरापत याला कारणीभूत असल्याचे स्थानिक सांगतात. चोपडा तालुक्यातील देवझिरी वनक्षेत्रात राज्य राखीव पोलीस दल तैनात आहे. त्यांच्या कॅम्पचा कार्यकाळ वाढविणे आवश्यक आहे. तसेच त्या धर्तीवर लंगडा आंबा वन क्षेत्रातील वाकी परिसरात अजून एक अतिरिक्त राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी किमान पुढील 10 वर्षांसाठी कार्यरत करणे आवश्यक आहे. या अभयारण्याचे विस्तृत वनक्षेत्र असून एका बाजूला यावल प्रादेशिक विभागाची सीमा असून दुसऱया बाजूला मध्य प्रदेश राज्याची सीमा आहे. त्या भागातून होणारे अपामण, शिकारीसाठीचे प्रयत्न, वन कर्मचाऱयांवरील सशस्त्र हल्ले, अवैध वृक्षतोड तसेच वणवे लावण्याच्या घटना सतत घडत असतात. हे सर्व प्रकार रोखण्यासाठी कार्यरत असलेला निशस्त्र व तोकडा वन कर्मचारी वर्ग पाहता यामध्ये मोठी उणीव दिसून येते. मनुष्यबळ कमी असल्याने अभयारण्याच्या संरक्षणावर मर्यादा येत आहेत. यासाठी अभयारण्यात किमान 60 लोकांचा प्रशिक्षित आणि तरुण व कार्यक्षम कर्मचारी वर्ग असणे अपेक्षित असताना आज केवळ 16 वन कर्मचारी कार्यरत आहेत. या अभयारण्यासाठी दोन वनपरिक्षेत्र कार्यालये असणे आवश्यक आहे. यावल अभयारण्य वन क्षेत्रात लंगडा आंबा हे महत्त्वपूर्ण परिक्षेत्र आहे. पाल, जामन्या, आणि लंगडा आंबा असे एकूण 173 चौरस किलोमीटर परिक्षेत्र असून यात जामन्या परिक्षेत्र हे 94 चौरस किलोमीटर आहे. पूर्वीपासून या भागात एकच परिक्षेत्र असून सद्यस्थिती पाहता संरक्षणाच्या दृष्टीने या वनक्षेत्रात किमान दोन वन्य जीव परिक्षेत्र (रेंज) असणे अत्यावश्यक आहे. अभयारण्याच्या जामन्या व पाल वन परिक्षेत्रामध्ये वणवा, शिकार, अपामण, जंगलतोड इत्यादी आपत्तीदरम्यान गस्ती पथक वेळेत पोहोचू शकते. मात्र अभयारण्यातील दुसऱया करंजपाणी भागात गस्ती पथक तत्काळ पोहोचू शकत नाही. तसेच या भागात स्थानिक लोकसहभाग शून्य आहे. तांत्रिक बाबींचा विचार केल्यास या भागात दोन वन परिक्षेत्र (रेंज ऑफिस) तसेच अभयारण्याच्या सुरक्षा, वणवा नियंत्रण इत्यादीसाठी सुसज्ज अशा वनकुटय़ा, निरीक्षण मनोरे व आनुषंगिक सर्व उपाययोजना राबविण्यासाठी अतिरिक्त विशेष निधीची अत्यंत आवश्यकता आहे.
यावल अभयारण्य क्षेत्रात आजमितीस 3 ते 4 वाघ वास्तव्यास असून बिबटे, लांडगे, कोल्हे, तरस, रानकुत्रे, सायाळ, अस्वल, खवले मांजर, पिसोरी, चिंकारा, लंगूर, चौशिंगा, काळवीट, उडती खार, हिंदुस्थानी अंडीखाऊ सर्प आणि इतर दुर्मीळ प्राण्यांचा अधिवास आहे. सोबतच अनेक दुर्मीळ औषधी वनस्पती, ऑर्किड, वृक्ष, इतर जैविक विविधतेने संपन्न असून त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तत्काळ उपाययोजना होणे गरजेचे आहे. वन विभागाने प्रयत्न जरी केले असले तरी अपामणाच्या विळख्यात अडकलेले अभयारण्य म्हणूनच आजही यावल अभयारण्याकडे पाहिले जाते. अपामणाच्या विळख्यात असलेल्या यावल अभयारण्याला मोकळा श्वास कधी घेता येईल?
> www.yadavtartepatil.com
(लेखक वन्य जीव अभ्यासक आहेत)




























































