
सामना ऑनलाईन । मुंबई
सध्या कोकणात मुसळधार पाऊस पडतोय, परंतु विदर्भ आणि मराठवाडा कोरडाच आहे. येथे लवकरात लवकर पाऊस पडला नाही तर शेतकऱ्यांची अवस्था आणखी बिकट होणार असून दुबार पेरणी करावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर आता येत्या 25 जुलै रोजी संभाजीनगर, सोलापूर आणि शेगावमध्ये कृत्रिम पाऊस पाडण्यात येणार आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
याबाबतची निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. कृत्रिम पावसासाठी संभाजीनगर येथे तात्पुरते रडार बसवण्यात आले आहे. विदर्भ-मराठवाडय़ात पावसाचा पत्ता नसून शेतकऱ्यांची अवस्था बिकट असल्याबाबत पत्रकारांनी पाटील यांना प्रश्न विचारला होता. त्यावर पाटील यांनी येत्या 25 जुलै रोजी कृत्रिम पाऊस पाडण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. दुष्काळावर उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सोलापूरमधील सिंहगड इन्स्टिटय़ूटमध्ये केंद्र सरकारच्या वतीने ढगांचा अभ्यास करण्यात येत असून कोल्हापूर केंद्रातही एक रडार लावण्यात आले आहे. या रडारचाही कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी वापर करण्यात येणार आहे.
सिंहगड इन्स्टिटय़ूटमध्ये ढगांचा अभ्यास
केंद्र सरकारच्या वतीने सिंहगड इन्स्टिटय़ूटमध्ये ढगांचा अभ्यास करण्यात येत आहे. नगर, धाराशीव, पुणे, लातूर, सोलापूर येथे गेली 2 वर्षे हा अभ्यास सुरू आहे. या ठिकाणचे 83 नमुने गोळा करण्यात आले. त्यानुसार येथे पावसासाठी अनुकूल ढग असून येथे 10 टक्के पाऊस पडू शकतो, असे उघड झाले आहे.
संभाजीनगर विमानतळावर दोन विमाने दाखल
कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी संभाजीनगर विमानतळावर दोन विमाने दाखल झाली आहेत. मात्र कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी विमान उड्डाण मंत्रालयासह विविध विभागांच्या परवानग्या आवश्यक आहेत. त्या मिळवण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने संबंधित विभागांकडे अर्ज करण्यात आले आहेत. त्या परवानग्या 30 जुलैपूर्वी मिळवण्यात येतील, अशी माहिती राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.
- या प्रयोगासाठी अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पात 31 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
- संभाजीनगर विमानतळावर दाखल झालेल्या दोन विमानांच्या माध्यमातून 200 किलोमीटरच्या रेडीयसमध्ये हा प्रयोग केला जाणार आहे.




























































