जयंत तांदूळकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

> महेश उपदेव

जयंत तांदूळकर या हौशी कलाकाराच्या एका कलाकृतीची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये झाली आहे. तांदूळकर यांनी एक छोटा चरखा बनवला आहे. त्याचीच नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये ‘सर्वात लहान आकाराचा चरखा’ म्हणून झाली आहे. ही कामगिरी करणारे जयंत तांदूळकर नागपूरचे रहिवाशी आहेत. मुख्य म्हणजे तेथील महालेखाकार कार्यालयात वरिष्ठ लेखापाल म्हणून ते कार्यरत आहेत. मात्र हा कार्यभार सांभाळत असताना वेगवेगळय़ा कलाकृती बनविण्याचा आपला छंददेखील त्यांनी जपला आहे.

तांदूळकर यांना लहानपणापासून नवनवीन कलाकृती बनविण्याचा छंद होता. जेव्हा जेव्हा मोकळा वेळ मिळतो तेव्हा ते काही सर्जनशील कामात गुंतलेले असतात. प्रचंड इच्छाशक्तीच्या आधारावर नवीन सर्जनशील कामे करण्यात ते व्यस्त राहतात. त्यांनी काचेच्या बाटलीच्या आत अनेक प्रकारच्या कलाकृती बनवल्या आहेत. जसे की, खाट, पेन स्टँड, मॅच बॉक्स. एवढेच नाही तर लहान बैलबंडी, बैलगाडा, चरखा, टांगा, सोफासेट, टेबल-खुर्ची आदी वस्तूंच्या लहान मिनिएचर प्रतिकृती लाकडाद्वारे बनवल्या आहेत. शिवाय वेगवेगळय़ा प्रकारच्या डिझाईनच्या विणलेल्या छोटय़ा खाटाही बनवल्या आहेत. त्यांनी एक लहान आकाराची भगवद्गीतादेखील बनवली आहे. भगवद्गीतेचा आकार केवळ एक इंच बाय अर्धा इंच एवढाच आहे. एवढेच नव्हे तर 6 मिमी बाय 11 मिमी आकाराची एक छोटी खाटदेखील बनवली आहे. त्याचे विणकाम त्यांनी स्वतः केले आहे. या खाटेची नोंददेखील ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् 2020’मध्ये झाली आहे.

महात्मा गांधीजींचा स्वदेशीचा नारा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वावलंबी हिंदुस्थानच्या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी तांदूळकर यांनी काहीतरी विशेष करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्याअंतर्गत सूतकताईच्या विविध लहान आकाराच्या चरख्यांच्या प्रतिकृती त्यांनी बनविल्या आहेत. त्यापैकीच एक चरखा, ज्याची लांबी 3.20 मिमी, रुंदी 2.68 मिमी आणि उंची 3.06 मिमी आहे व वजन आहे 40 मिलिगॅम (0.04 ग्रॅम). हा चरखा करण्यासाठी त्यांनी लहान लाकडी काडय़ा, स्टील तार आणि कापूस धागा इत्यादी वस्तूंचा वापर केला आहे. या चरख्याचे वैशिष्टय़ म्हणजे एवढय़ा लहान आकाराचा चरखा असूनही त्यावर सूतकताईचे कार्य करता येते. तो एक पूर्णपणे कार्यरत चरखा आहे. हा जगातील सर्वात लहान आकाराचा चरखा आहे, असा तांदूळकर यांचा दावा आहे. याच चरख्याची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् 2021’, ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्डस् 2022’ ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस् 2023’मध्ये नोंद झालेली होती. आता ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस् 2023’चेदेखील प्रमाणपत्र त्यांना घरपोच आले आहे. चरख्याची ओळख राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या मुळे विशेष आहे. ते हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक प्रमुख शस्त्र होते. राष्ट्रपिता महात्मा गांधींनी हिंदुस्थानीयांना स्वदेशी वस्तू वापरण्याचा संदेश देऊन स्वावलंबी हिंदुस्थानचा पाया घातला होता. यामुळे आपण या लहान आकाराच्या चरख्याच्या प्रतिकृतीच्या माध्यमातून राष्ट्रपिता महात्मा गांधीजी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वावलंबी हिंदुस्थानच्या संकल्पनेला बळकटी देण्याचा एक छोटासा प्रयत्न त्यांनी केला, असे तांदूळकर सांगतात. त्यांच्या या कलाकृती नक्कीच इतरांसाठी प्रेरणादायी आहेत.