>> दिलीप ठाकूर
चित्रपट क्षेत्र सतत कार्यरत राहण्यात प्रामुख्याने मध्यम व छोटय़ा निर्मात्यांचा जास्त मोठा वाटा आहे ही दुर्लक्षित राहिलेली वस्तुस्थिती. मोठय़ा चित्रपट संस्था एकेका मोठय़ा चित्रपट निर्मितीत तीन-चार वर्षांचा कालावधी घेत असतानाच मध्यम व छोटे निर्माते त्याच अवधीत किमान तीन चित्रपट पडद्यावर आणतातदेखील. त्यामुळे मधल्या फळीतील कलाकार, तंत्रज्ञांना सातत्याने काम मिळत राहते. त्यांचा रोजगार हुकमी राहतो. चित्रपट व्यवसाय अशा अनेक लहानमोठय़ा गोष्टींसह वाटचाल करीत आहे. असाच एक चित्रपट निर्माता राजेश मित्तल. त्यांनी ऐंशी व नव्वदच्या दशकात थोडय़ाथोडक्या नव्हे, तर तब्बल पंचेचाळीस हिंदी चित्रपटांची निर्मिती केली. अशा राजेश मित्तलचे 2 ऑगस्ट 2024 रोजी वयाच्या 69 व्या वर्षी मुंबईत निधन झाले.
चित्रपट निर्मितीसह काही चित्रपटांचे दिग्दर्शन तसेच अगदी वितरणही राजेश मित्तल करीत. चित्रपट माध्यम व व्यवसायात एकाच वेळेस या तीनही गोष्टी सातत्याने करणारे तसे मोजकेच, पण चित्रपट वितरण व्यवसायात असल्याने चित्रपट प्रदर्शकांशी (चित्रपटगृह चालक) सततचा असलेला संवाद व व्यवहार आपल्याच चित्रपट निर्मितीतील विषय ठरवण्यात राजेश मित्तल यांना उपयुक्त ठरत असे असा एक सकारात्मक निष्कर्ष कायमच काढला गेला. राजेश मित्तल यांनी तर चित्रपट निर्मिती व दिग्दर्शनात केवढी तरी विविधता ठेवल्याचे दिसेल. त्यांच्या चित्रपटांची नावेच बघा ‘झांशी की रानी लक्ष्मीबाई’, शहीद ‘चंद्रशेखर आझाद’ या चरित्रपटांप्रमाणेच राजेश मित्तल यांनी ‘भयानक पंजा’, ‘हसिना डपैत’, ‘चांदनी बनी चुडैल’, ‘खुनी काला जादू’, ‘डाक बंगला’ असे भयपट, ‘गीता मेरा नाम’, ‘फिर आया सत्ते पे सत्ता’, ‘आतंक राज’, ‘टॉवर हाऊस’, ‘एक नारी दो रूप’, ‘बस एक बार’ तसेच ‘बिरसा द ब्लॅक आयर्न मॅन’ इत्यादी अनेक चित्रपट निर्माण केले. दादर पूर्वेकडील रणजीत स्टुडिओत त्यांचे कार्यालय होते. गप्पिष्ट आणि कायमच आशावादी असलेले व्यक्तिमत्त्व हे त्यांचे वैशिष्टय़. कमी खर्चातील (लो बजेट) चित्रपट निर्मिती हीदेखील या व्यवसायाची गरज आहेच. याचं कारण त्यामुळे मोठय़ाच प्रमाणावर चित्रपट व्यवसायातील कामगारांना रोजगारही उपलब्ध होत असतो. निर्मात्याचे कार्यालय कार्यरत राहते. राजेश मित्तल चित्रपटसृष्टीतील अनेक संस्थांशीही संबंधित होते. त्यांचा चित्रपट निर्मितीचा काळ हा एकपडदा अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्स आणि त्यात रिळांच्या माध्यमातून चित्रपट दाखवणे हा होता. त्या वेळी एकेक चित्रपट देशातील शहरी भागातून ग्रामीण भागात रिळांच्या नेण्यात येण्याने दूरवर पोहोचायला साधारण दीड-दोन वर्षे लागत आणि त्याचा या मध्यम व छोटय़ा चित्रपटांना खूप फायदा होत असे. साधारण स्वरूपाची आणि रस्त्यावरील पोस्टर पूर्वप्रसिद्धी करीत हे ‘फिर आया सत्ते पे सत्ता’, ‘चांदनी बनी चुडैल’ असे अनेक चित्रपट प्रदर्शित होतात. आपल्या देशातील मनोरंजन क्षेत्रात अशा अनेक चित्रपटांनाही जागा आहे आणि राजेश मित्तल हे अशा चित्रपट निर्मितीतील एक अग्रेसर नाव. म्हटलं तर असे चित्रपट निर्माते प्रसारमाध्यमांकडून कायमच दुर्लक्षित राहतात, पण अशाच अनेकांकडून या चित्रपटसृष्टीचे खोलवरचे अंतरंग ज्ञात होत असते. बरीच उपयुक्त आणि दुर्मिळ माहिती मिळत असते. पुस्तकाबाहेरचे आणि गुगलपलीकडे असे बरेच मोठे जग या चित्रपटसृष्टीत कायमच कार्यरत असते आणि राजेश मित्तलसारखी मेहनती माणसे त्यात रममाण असतात.