
हिंदी सिनेमाला पार्श्वगायनाची (प्लेबॅक) सोय नव्हती, तेव्हा नायक-नायिका त्यांच्याच आवाजात गाणी म्हणत असत. अगदी दुर्गा खोटे, अशोककुमार, दिलीपकुमार यांनीही सिनेगीतं गायिली आहेत. याउलट हिंदुस्थानच्या गानसम्राज्ञी लतादीदींनी काही अपवादात्मक चित्रपटात काम केलेलं आहे आणि उमादेवी या गायिकेचा आवाजच गेल्यामुळे नंतर ती ‘टुणटुण’ या नावाने विनोदी भूमिका करू लागली. सी. रामचंद्र, वसंत देसाई, एस.डी. बर्मन, आर.डी. बर्मन अशा संगीतकारांनी अपवादात्मकरीत्या सिनेमासाठी गाणी म्हटली आहेत. वसंत देसाई तर अभिनयासाठी आले होते, पण थोडी कामं वगळता त्यांना पडद्याने साथ दिली नाही आणि संगीतकार म्हणून ते अजरामर झाले.
चित्रपटात नायक होण्याची इच्छा असलेला एक मुंबईकर पंजाबी तरुण सिनेसृष्टीकडे नजर लावून बसला होता. त्याचं नाव शैलेन्द्र सिंग, परंतु त्याचा आवाज सिनेनिर्मात्यांना अधिक भावला आणि तो एकाच चित्रपटात रातोरात तत्कालीन तरुणाईंच्या गळ्यातला स्वर बनला.
‘मेरा नाम जोकर’ या भव्य, महत्त्वाकांक्षी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सणसणीत आपटी खाल्यावर राज कपूरने एक रोमॅण्टिक फिल्म बनवायचं ठरवलं. त्याचाच नवतरुण चिकना-चुपडा मुलगा ऋषी कपूर आणि त्याच्यापेक्षा कोवळी, सुंदर नायिका डिम्पल कपाडिया यांच्या गोड प्रेमकहाणीचा ‘बॉबी’ पडद्यावर आला आणि तुफान चालला. ‘बॉबी’चं संगीत होतं लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचं आणि त्यातला ताजा पुरुषी स्वर होता तरुण शैलेन्द्र सिंगचा. ‘बॉबी’मधली गाणी आजच्या तरुणाईलाही भुरळ घालणारी आहेत. ‘मै शायर तो नहीं’, ‘हम तुम एक कमरे में बंद हो’, ‘मुझे कुछ कहना है’, ‘ना मांगू सोना चांदी’, ‘झूठ बोले कौवा काटे’ अशा अनेक गाण्यांमधून त्याचा स्वर दुमदुमला. लतादीदींसारख्या ज्येष्ठ-श्रेष्ठ गायिकेसह गाण्याची संधी शैलेन्द्र सिंगला लाभली. तेव्हा त्याचं वय असेल वीस-बावीस वर्षांचं.
मुंबईत पेडर रोडवरच्या शाळेत शिकलेला आणि नंतर सेंट झेविअर्स कॉलेजचा विद्यार्थी असलेला शैलेन्द्र कॉलेज शिक्षणानंतर पुण्याच्या फिल्म ऍण्ड ड्रामा (एफडीए) इन्स्टिटय़ूटमध्ये दाखल झाला तो अभिनेता होण्याच्या उद्देशाने, पण त्यात त्याला फारसं यश मिळालं नाही हे आधीच म्हटलंय. वास्तविक हिरो म्हणून चालण्यासारखं रूप त्याच्याकडे होतं. ‘दो जासूस’ मल्टिकास्ट चित्रपटातला होडीमधला एक सीन आठवत असेल तर ‘पुरवय्या लेके चली मेरी नय्या कहां’ या लतादीदींसह गायिलेल्या गीतात शैलेन्द्र सिंग, भावना भटबरोबर पडद्यावरही होता. तसं त्याने रेखाबरोबर ‘ऍग्रीमेण्ट’ चित्रपटातही काम केलं. अपर्णा सेनसह एका बंगाली सिनेमातही तो आला, पण चमकला गायक म्हणून आणि यश त्याला ‘बॉबी’ने भरभरून दिलं. टीव्ही मालिका ‘रिश्ते’मध्येही त्याचा रोल होता, परंतु शैलेन्द्र सिंग म्हटले की, ‘बॉबी’तली गाणीच आपसूक आठवतात. त्याचप्रमाणे ‘खेल खेल में’मधलं त्याचं ‘हमने तुमको देखा’ हे डय़ुएट खूप गाजलं. ‘अमर-अकबर-ऍन्थनी’चं टायटल साँगही लोकप्रिय झालं.
अशा या सुरेल गायकाने मराठीतही काही गाणी गायिली. ‘बन्या-बापू’ या चित्रपटासाठी उषा मंगेशकर यांच्यासह ‘प्रीतीचं झुळझुळ पाणी’ हे द्वंद्वगीत गायिलंय. गाण्याचे शब्द आहेत मुरलीधर गोडे यांचे तर संगीत ऋषीराज यांचं. ‘नाव मोठं लक्षण खोटं’ या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं, अनिल-अरुण यांनी संगीत दिलेलं ‘मी जलवंती, मी फुलवंती’ हे गीत शैलेन्द्र सिंग आणि अनुराधा पौडवाल यांचं आहे.
‘दीड शहाणे’ हा चित्रपट निळू फुले, अशोक सराफ, राजा गोसावी, आत्माराम भेंडे, कमलाकर सारंग, मनोरमा वागळे, माया जाधव अशा मातब्बर अभिनेत्यांसह पडद्यावर आला. त्याचं संगीत होतं राम-लक्ष्मण यांचं. गाणी लिहिली होती जगदीश खेबुडकर आणि अनंत जाधव यांनी. त्यातलं ‘अगं ये ना शालू, माझ्या मनात काय ते कानात सांगतो’ हे गीत शैलेन्द्र सिंग आणि आशा भोसले यांचं आहे. ‘लागेबांधे’ या चित्रपटातलं शैलेन्द्रचं उषा मंगेशकर यांच्याबरोबरचं गाणं आहे ‘नाच गं पोरी तू नाच गं नाच.’
1974 मध्ये ‘बॉबी’मधल्या शैलेन्द्र सिंग यांच्या ‘मैं शायर तो नहीं’ या गाण्यासाठी ‘फिल्म फेअर’मध्ये नामांकन मिळालं. 1970 च्या दशकानंतर ऋषी कपूर आणि डिम्पल कपाडिया पुन्हा 1985 मध्ये ‘सागर’ चित्रपटात एकत्र आले. त्यातलं ‘जा।़ने दो ना’ हे द्वंद्वगीत शैलेन्द्र आणि आशा भोसले यांनी गायिलं. शैलेन्द्र सिंग यांच्या काही वर्षांच्या गान-कारकीर्दीतील गाणी आज नेटच्या माध्यमातून ऐकता येतात. नायक व्हायला निघालेला हा तरुण हीरो तो नहीं, पण उत्कृष्ट गायक म्हणून नावाजला. त्याच्या स्वरात काही मराठी गाणी त्या ठरावीक कालखंडातच ध्वनिमुद्रित झालेली दिसतात. 1973 ते 95 हा शैलेन्द्र सिंग यांच्या यशाचा काळ होता.
>> अरुण जोशी



























































