
>>अरुणा सरनाईक
स्तुती, कौतुक किंवा आजच्या काळात प्रचलित शब्द असणाऱया ऍप्रीसिएशनचे रोजच्या आयुष्यात खूप महत्त्व आहे. पाठिंबा, प्रोत्साहन हीसुद्धा कौतुकाची, ऍप्रीसिएशनची लहान मोठी भावंडे आहेत. कौतुक करताना कंजुषी करू नये. चांगलेच शब्द नेहमी तोंडात असावे. दुसऱयांचे केलेले कौतुक स्वतःला, दुसऱयांना समाधान तर देतेच देते, पण त्यामागील आपले आभाळाएवढे मन समोरच्याला दिसून येते. कौतुकाची थाप पुढे जाण्यासाठी, प्रगती करण्यासाठी नवे बळ देते. अर्थात ही गरज वयानुसार कमी जास्त असली तरी आपल्या सर्वांनाच असते. आजच्या काळात भरून राहिलेला ताणतणाव एका ऍप्रीशिएशनने क्षणार्धात कमी होऊ शकतो. करून तर पाहा…
शीर्षक इंग्रजी असले तरी भावना सार्वत्रिक आहे. ज्याच्या जोरावर जगाचा व्यवहार सुरू आहे. मराठीत याला कौतुक किंवा पोचपावती असे म्हणता येईल. त्यामध्ये ऍप्रीसिएशनचे वजन पडणार नाही. कारण आजच्या पिढीला काय किंवा आपल्याला काय, आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी बऱयाचदा इंग्रजी शब्दांचा आधार जास्त खात्रीचा वाटतो. खोटी तारीफ नको, कारण ती लागलीच ओळखू येते. मनापासून ते ओठावर आले पाहिजे. एखाद्याला ही सवय जन्मजात असते, जशी माझ्या वडिलांना होती. छोटय़ा-छोटय़ा गोष्टी आपण काही नवीन केले, नवीन कपडे घातले, एखादा पदार्थ चांगला जमला की, ते लागलीच मनापासून ऍप्रीसिएट करायचे. त्यामागे ठरावीक अशी कोणतीही भावना, दिखावा नसायचा. मनापासून ते कौतुक करायचे, पण त्यामुळे जरा काही वेगळे केले की, ते समोरच्याला आवडले पाहिजे हा अट्टहास आजही माझा असतो. वडिलांची ही सवय आम्हा तीनही भावडांना आपसूक लागलेली आहे किंवा ती रक्तातच आहे. ही सवय कामाच्या ठिकाणी फार उपयोगी पडते. कोणाकडून चांगले काम घडले किंवा न सांगता रोजच्या कामाव्यतिरिक्त एखादे काम केले, तर त्याची पोचपावती माझ्याही नकळत दिली जाते. मुलांच्या वाढीच्या वयात त्यांना त्यांनी केलेल्या कोणत्याही चांगल्या कामाची प्रशंसा किंवा वाहवा हवी असते. पाठीवर आईची किंवा बाबांची कौतुकाची थाप हवी असते. आपल्या प्रत्येक कामाची काळजीपूर्वक दखल आपले आईवडील घेतात, ही जाणीवच मुलांच्या निकोप वाढीसाठी पोषक असते.
परवाच्या दिवशी तनय उत्साहाने नाचतच घरात शिरला. “आई, शाळेत मॅडमनी माझे खूप कौतुक केले.’’ “का रे? काही विशेष?’’ प्रियाने म्हणजे त्याच्या आईने विचारले. तनय सांगू लागला, “अगं, शाळेच्या आवारात प्रार्थनेच्या वेळी आम्ही सारे जण उभे होतो. पायाला काही लागले म्हणून मी खाली वाकलो, तर पायाखाली चक्क शंभराची नोट दिसली. ती उचलून मी आमच्या मिसला दिली. तिने ही गोष्ट प्रेअरच्या वेळी माईकवरून सर्वांना सांगितली. ते पैसे एका मुलीचे होते. वर्गात गेल्यावर मॅडमनी माझी पाठ थोपटली, शाबासकी दिली. पुढे आयुष्यातही असा प्रामाणिक राहा नेहमीकरिता! आज आपली कॉलर ताठ झाली माँ!’’ तनय भरभरून बोलत होता. आईने त्याला जवळ घेतले. केसावरून हात फिरविला आणि गालावर एक पप्पी दिली. आवडीचा खाऊ बनविला. आपल्या निकोप वाढीचा पुरावाच जणू प्रियाला मिळाला. “बाबा संध्याकाळी घरी आला ना की त्याला पण सांगूया.’’
अशा कौतुकाची गरज छोटय़ांना जरा जास्त असते. कारण त्यांच्या डोळय़ात कोवळे कुतुहल आणि कोवळे आकाश असते! ही कौतुकाची थाप पुढे जाण्यासाठी, प्रगती करण्यासाठी नवे बळ देते. अर्थात ही गरज वयानुसार कमी जास्त असली तरी आपल्या सर्वांनाच असते. ते एक उत्तम शक्तिवर्धक असते. एखाद्याला ऍप्रीसिएट करताना किंवा कौतुक करताना कंजुषी करू नये. चांगलेच शब्द नेहमी तोंडात असावे. दुसऱयांचे केलेले कौतुक स्वतःला, दुसऱयांना समाधान तर देतेच देते, पण त्यामागील आपले आभाळाएवढे मन समोरच्याला दिसून येते.
टिना चांगल्या प्रकारे टेनिस खेळायची. आंतरमहाविद्यालयाच्या सामन्यात अंतिम स्पर्धेत ती हरली. अतिशय निराश झाली. आईने समजावले, अगं तू चांगली खेळलीस, हरली म्हणून काय झाले! आता पुन्हा प्रॅक्टिसला सुरुवात कर आणि ताज्या दमाने पूर्ण आत्मविश्वासाने पुढील स्पर्धेत सहभागी हो! ही सकारात्मकतासुद्धा कौतुकाचाच भाग होता. पाठिंबा, प्रोत्साहन हीसुद्धा कौतुकाची ऍप्रीसिएशनची लहान मोठी भावंडे आहेत. तू त्यांचे फार लाड करतेस, सारखे कौतुक करतेस, त्यांच्या कामाचा मोबदला आपण देतोच की! त्यांना मग कशाला हवे प्रत्येकदा छान काम केले असे म्हणायला! आमची बॉस मॅडम मला म्हणायची! मी फक्त हसायची नाही उत्तर द्यायची नाही, पण माझेही वागणे मी बदलवित नसे! कारण मला ठाऊक आहे, येणारा कामकरी स्टाफ हा अतिशय वेगळय़ा वातावरणातून येणारा होता. कितीही करा, मॅडम घरी कोणी चांगलं म्हणत नाही हो! नवरा म्हणतो, हे तर तुझेच काम आहे. मुलं म्हणतात मम्मी त्यात काय मोठं केलंस गं तू! थोडेसे चांगले शब्द, एखादी शाबासकीची थाप त्यांना दिलासा देते. आमच्याकडे एक मावशीबाई आहे, साफसफाई करते. ज्या दिवशी ती चांगली साफसफाई करते, त्या दिवशी ती आवर्जून सांगते, मॅडम आज बघा मी किती छान काम केलंय! तिला गुड म्हणावं म्हणत, मनापासून हसत या अगदी म्हटलं तर नगण्य गोष्टी आहेत, पण त्या वेळी त्यांचे महत्त्व निश्चितच अधिक असते. मात्र खोटी तारीफ आणि खरं कौतुक यातला फरक अगदी तरल आहे, पण तो नक्कीच लक्षात येणारा असतो. त्यामुळे निव्वळ आपले काम काढून घेण्यासाठी असा खोटेपणा कधीच करू नये. तो पकडलाच जातो.
कितीही करा, कितीही चांगले दिसा, दोन कौतुकाचे शब्द कधी नवरा बोलत नाही, अशा तक्रारी सर्वदूर ऐकू येतात. नव्याचे नऊ दिवस संपले की, मग सारा कारभार रुटीन या नावाखाली चालू राहतो. क्वचित प्रसंगी एखादी पावती मिळते, नाही असे नाही, पण अगदी विरळ. रोज काय कौतुक करायचे! आपल्याला बुवा जमत नाही, मात्र हेच बुवा चुका बारकाईने बघतात. त्यावर खोचक बोलतात, हे कसं जमते? या प्रश्नांची उत्तरे त्यांच्याजवळ नसतात. असे मजेशीर प्रसंग आपल्या आयुष्यात वारंवार घडत असतात, येत असतात. खिलाडू वृत्तीने त्याला सामोरे जावे! यातच सर्व आले!
एक परिचयाचे गृहस्थ आहेत. मोठय़ा कंपनीचे मालक आहेत. छान कुटुंब आहे. कंपनी चांगली चालते, पण थोडासा तणाव असतो. सर्वत्र सहजच बोलताना ते म्हणाले, मला ना समोरच्याला ऍप्रीशिएट करता येत नाही. कौतुक करता येत नाही. त्यामुळे घरीदारी जरा तणाव असतो. काय करावे समजत नाही. मी फक्त हसले आणि बोलले, अहो, साधी वाटणारी कठीण गोष्टच आहे ती. म्हणजे कौतुक करणे मनापासून तुम्ही जाणून घ्या, समोरच्या व्यक्तीच्या चेहऱयावर त्यांनी केलेल्या चांगल्या कामाचे प्रतिबिंब असते. ते फक्त तुम्ही तुमच्या शब्दातून (चांगल्या) त्यांच्याकडे पोहोचवा तेच तर ऍप्रीसिएशन म्हणजेच कौतुक असते! आपण खुल्या दिलाने चांगल्या शब्दातून त्याच्यापर्यंत पोहोचवा. बस्स ऐवढंच!
देवांचीसुद्धा स्तुतीस्तोत्र असतात ना! तीसुद्धा त्यांना प्रियच असतात. कारण त्यात त्यांचं कौतुक, स्तुती असते. त्यांनी आपल्यासाठी काय काय केले आणि ते किती चांगले आहे, असे आपण त्यांचे स्तुतीगायन करतो. म्हणजेच आपण त्यांना ऍप्रीसिएट करतो की नाही? मग ते प्रसन्न होतात. आपल्यावर कृपा करतात. म्हणून असे वाटतं की, कौतुक, तारीफ, ऍप्रीसिएशन ही सगळी शक्तीवर्धके सगळय़ांनाच प्रिय आहेत. त्यातून देवदेवता सुटले नाही. मग आपण किस झाड की पत्ती. चला ठरले तर मग कोणालाही चांगले म्हणताना हात आखडता, सॉरी शब्द आखडते घेऊ नका. मनभरून कौतुक करा, तारीफ करा आणि मग आभाळभर हसा.






























































