
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपला मोठा फटका बसला आहे. आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वीच बुधवारी अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपचे दोन मंत्री आणि 12 आमदारांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. सर्व आमदारांनी मुख्यमंत्री कोनराड संगमा यांच्या नॅशनल पीपल्स पक्षात प्रवेश घेतला आहे.
नॅशनल पीपल्स पक्षाच्या एका कार्यक्रमात अरुणाचलचे गृहमंत्री कुमार वाई म्हणाले की, “जर भाजप हा पक्ष योग्य असता तर आम्ही त्यांच्यासाठी काम केले असते. भाजप म्हणते की त्यांचे प्राधान्यक्रम देश, पक्ष आणि सदस्य असा आहे. परंतु राज्यात भाजपने घराणेशाही सुरू केली आहे.” अरुणाचल प्रदेश हे एक धर्मनिरपेक्ष राज्य आहे परंतु भाजप हा धर्मविरोधी पक्ष असल्याची त्यांनी टीका केली.
नॅशनल पिपल्स पक्षाचे महासचिव थोमस संगमा यांनी आमदारांचे पक्षात स्वागत केले तसेच, राज्यात कुणाशीही युती करणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले.
मिळालेल्या माहितीनुसार आगामी विधानसभा निवडणुकीत गृहमंत्री कुमार व्हाय, पर्यटन मंत्री जारकार गामलिन आणि इतर आमदारांच्या भाजपने तिकीट कापले. भाजपने खोटी आश्वासने देऊन लोकांमधी आपली प्रतिमा खराब केल्याचे व्हाय कुमार यांनी म्हटले तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत नॅशनल पीपल्स पक्षाचीच सत्ता येणार असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.































































