
राज्यामध्ये महापालिका निवडणुकांचे वातावरण चांगलेच तापू लागले आहे. याच वातावरणात आता बिनविरोध निवडणुकीच्या मुद्द्यावर उहापोह होऊ लागला आहे. बिनविरोध निवडणुकांवर सध्याच्या घडीला सर्वच स्तरामधून जोरदार टीका केली जात आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी निवडणूक बिनविरोध निवडणुकीच्या मुद्द्यावर निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले आहेत. मोदी, शहा आणि महाराष्ट्रात फडणवीस असेपर्यंत निवडणूक आयोगाला टाळं लावलं पाहिजे, असा संजय राऊत यांनी जोरदार टोला लगावला आहे.
माध्यमांशी मंगळवार (६ जानेवारी) बोलताना संजय राऊत म्हणाले, निवडणूक आयोगाला स्पष्ट दिसतंय की, सध्याच्या घडीला जी काही बिनविरोध निवडणूक झालेली आहे ती सरळ मार्गाने झालेली नाही. राहुल नार्वेकर यांना निवडणूक आयोगाकडून क्लीनचीट का देण्यात आली? धमकी, पैसा आणि यंत्रणांचा गैरवापर हा या बिनविरोध निवडणुकांमध्ये केला गेला आहे. त्यावर आधारीतच या बिनविरोध निवडणुका झाल्या आहेत.
पालिकेने ज्या अधिकाऱ्यावर ठपका ठेवला होता त्यालाही निवडणूक आयोगाने क्लीन चिट दिली आहे. लोकांनी पैसे देऊन टोकण घेतले, त्यांना अर्जही भरू दिले नाहीत. यामध्ये आपचे जनता दलाचे उमेदवार आहेत, असे म्हणत राऊतांनी निवडणूक आयोगाच्या कारभार सडकून टीका केली आहे. यासंदर्भात अधिक भाष्य करताना ते म्हणाले, शिवसेना आणि मनसेचे उमेदवार बबन महाडिक हे रांगेत उभे असताना, विधानसभा अध्यक्षांच्या दहशतीमुळे त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करून घेतलेला नाही. हे सर्व निवडणूक आयोगाला दिसत नाही का?
निवडणूक आयोगाच्या डोळ्याच्या खाचा झाल्या आहेत का? डोळे नसून त्यांच्या डोळ्यात गारगोट्या आहेत का असा संतप्त सवाल राऊतांनी उपस्थित केला. आयोगाला हे सर्व दिसत नसेल तर ही स्थिती फार गंभीर आहे. निवडणूक आयोग हा सत्ताधाऱ्यांचा एजंट म्हणून काम करतो आहे.
राज्यामध्ये ७० ठिकाणी बिनविरोध निवडणुका होतात, यापूर्वी कधी अशा निवडणुका झाल्या आहेत का? असा प्रश्न राऊतांनी उपस्थित केला. यावर अधिक बोलताना ते म्हणाले, या महाराष्ट्रात अनेक मोठंमोठे नेते होऊन गेले. परंतु कोणीही कधी बिनविरोध निवडणूक मात्र होऊ दिली नाही. मनोहर जोशी नगरसेवक होते, पण कधी झाली का बिनविरोध निवडणूक? मग हे छपरी टपरी शिंदे आणि भाजपाचे गुंड लोक हे बिनविरोध निवडून कसे येऊ शकतात? निवडणूक आयोग या सर्वांना का क्लीनचीट देतंय?
निवडणूक आयोगाचा क्लीनचीटचा कारखाना आपल्या देशासाठी तसेच राज्यासाठी धोकादायक आहे. निवडणूक आयोगाने प्रत्येक ठिकाणी घोटाळा केला आहे. तसेच नियमाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन काम केलं जात आहे. कायद्याचे उल्लंघन केलं जात असून, सत्ताधारी पक्षाला मदत होईल, असेच काम केलं जातंय. परंतु निवडणूक आयोगाला या प्रत्येक गोष्टीचा हिशोब द्यावा लागेल, कारण प्रत्येक गोष्टीला अंत असतो. निवडणूक आयोग बरखास्त करा. मोदी, शहा आणि महाराष्ट्रात फडणवीस असेपर्यंत निवडणूक आयोगाला टाळं लावलं पाहिजे, असा सणसणीत टोला राऊत यांनी लगावला.
































































