सामना प्रतिनिधी । बीड
केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजप सरकारने शरियतमध्ये बदल करण्याचा प्रयत्न चालवला आहे. मात्र हा त्यांचा प्रयत्न आम्ही कधीही खपवून घेणार नाही. यासाठी वाटेल ते करू पण चंद्र, सुर्य, तारे असेपर्यंत शरियतचा कायदा बदलू देणार नाही, अशा शब्दात एमआयएमचे अध्यक्ष अससोद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टिका केली. नरेंद्र मोदींनी अगोदर त्यांच्या पत्नीला न्याय द्यावा आणि मगच आमच्या महिला भगिनींना न्याय देण्याच्या गोष्टी कराव्यात असेही ते म्हणाले.
रविवारी सायंकाळी बीड येथील मोमीनपुरा, बिंदुसरा नदीजवळील मैदानात तहफुज-ए-शरियत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शिया जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष निसार हुसेन हैदर आगा, आ.इम्तियाज जलील, डॉ.गफ्फार कादरी, मौलाना महेफुजूर रहेमान, आयुब जहागीरदार, नासेर सिद्दीकी, हाजी आयुब पठाण, खय्युम इनामदार, हॅरीसन फ्रान्सीस रेड्डी, जिल्हाध्यक्ष शेख निजाम, शेख अमर, हर्षवर्धन घडसिंग आदी उपस्थित होते.
अससोद्दीन ओवेसी म्हणाले, काँग्रेस-भाजपचे राजकारण देशासाठी चुकीचे ठरत असून आज देशातील गरीब मुस्लिम, दलित यांच्यासह शेतकरी खितपत पडला आहे. केवळ जाहिराती करून कुरघोडीचे राजकारण करत भाजप सरकारने सर्वसामान्य जनतेला जगणे महाग केले आहे. देशातील गरीब लोक एकवेळचे अन्न खावून जगत आहेत, आणि सरकार मात्र अच्छे दिन आल्याचा गवगवा करत आहे. अशावेळी सर्वसामान्यांनी आपला आवाज बुलंद करण्याची गरज असल्याचे आवाहनही एमआयएमचे अध्यक्ष खा.ओवेसी यांनी केले.
हजारो कोटींचे बँकांचे कर्ज बुडवून या देशातील निरव मोदी आणि विजय मल्ल्या सारखे माणसे देश सोडून जातात. मात्र या प्रश्नाचे उत्तर देशाचे पंतप्रधान देत नाहीत. नको त्या गोष्टीला अधिकचे महत्व देवून सर्वसामान्यांना अच्छे दिनचे स्वप्न हे सरकार दाखवत असल्याचा आरोप ही ओवेसींनी केला. देशातील कितीतरी दलित, मुस्लिम आणि शेतकरी एकवेळचे अन्न खाण्यासाठी तडफडत आहेत आणि मोदी सरकार या देशातील जनतेला योगाचे शिक्षण घेण्याचे सांगत आहे. सरकारने अगोदर गरिबांच्या एकवेळच्या अन्नाची व्यवस्था करावी आणि मगच योगाच्या गोष्टी कराव्यात असेही त्यांनी सुनावले.



























































