‘तुम्हाला मुस्लीम बनवू, दाढी वाढवण्यास भाग पाडू’; ओवैसींचे हिरवे फुत्कार

सामना ऑनलाईन । चंदिगड

एका मुस्लीम व्यक्तीची दाढी जबरदस्ती कापल्याची घटना काही गुरुग्राममध्ये घडल्यानंतर आता ऑल-इंडिया-मजलिस-ए-इत्‍तेहादुल-मुस‍लमीनचे (एमआयएम) प्रमुख, खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी हिरवे फुत्कार टाकण्यास सुरुवात केली आहे. याप्रकरणातील आरोपींना आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्यांनी धमकावले आहे. त्यामुळे परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

ज्या लोकांनी मुस्लीम व्यक्तीची दाढी जबरदस्ती कापली त्यांना आणि त्यांच्या बापांना मी सांगू इच्छितो की, (दाढीच काय) तुम्ही आमचा गळा कापला तरी आम्ही मुस्लीमच राहू. आम्ही तुम्हाला इस्लाम स्वीकारायला लावू आणि दाढी देखील ठेवायला भाग पाडू, अशी शब्दात त्यांनी या आरोपींना धमकावले आहे. ओवैसींच्या या वक्तव्यामुळे हरयाणातील राजकीय आणि धार्मिक वातावरण आणखी बिघडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, २ ऑगस्ट रोजी गुरुग्रामच्या सेक्टर २९ मध्ये जफरुद्दीन युनुस याला पाकिस्तानी म्हणत अज्ञातांनी त्याच्यावर हल्ला केला आणि जबरदस्ती दाढी कापली. या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर राज्य सरकारने पोलीस यंत्रणांना सतर्क केले आहे. तसेच याप्रकरणी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.