
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज वाखरी येथील पालखीतळ, विसावा मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा नदीपात्र, घाट तसेच मंदिराची पाहणी केली. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, प्रांताधिकारी सचिन ढोले, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी आदी उपस्थित होते.
वाखरी पालखीतळाला बॅरेकेटिंग करणे, पालखीतळाची स्वच्छता राखणे, अखंडित विद्युतपुरवठा, पाणीपुरवठय़ाची व्यवस्था करावी, पालखीतळावर मंडप टाकावा, स्वच्छतागृहे उभारावीत, पोलीस प्रशासनाने पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाने पालखीतळावर पाणी साठणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले. चंद्रभागा नदीपात्र स्वच्छ राहील, याची दक्षता घ्यावी. प्रदक्षिणा मार्गावरील रस्त्याची डागडुजी करावी. शासनाने दिलेल्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सुरक्षेच्या दृष्टीने करण्यात येणाऱया नियोजनाची माहिती दिली. प्रांताधिकारी ढोले यांनी तयारीची माहिती दिली. मंदिर समितीच्या वतीने पालख्यांचे स्वागत व शासकीय महापूजेबाबत करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, तहसीलदार सुशील बेल्हेकर, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, मुख्याधिकारी अरविंद माळी, सरपंच कविता पोरे, उपअभियंता गुंड उपस्थित होते.
सर्व विभागांनी समन्वय ठेवून काम करावे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करतानाच परंपरा कायम राहील, या अनुषंगाने सर्व विभागांनी समन्वय ठेवून काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या. आषाढी वारीच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकाऱयांनी सर्व संबंधित विभागप्रमुखांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी सूचना दिल्या. बैठकीच्या सुरुवातीला ढोले यांनी शासनाने दिलेल्या निर्देशानुसार पालखी सोहळे यांचे आगमन, शासकीय महापूजा, नगर प्रदक्षिणा आदींबाबतचे नियोजन सांगितले. शासनाने आषाढी वारीसाठी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्यासाठी प्रत्येक विभागप्रमुखांनी नेमून दिलेल्या जबाबदारीची अंमलबजावणी करावी. आरोग्य विभाग, पंढरपूर नगर परिषद, महावितरण, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा विभागाच्या विभागप्रमुखांनी एकमेकांच्या संपर्कात राहावे. आषाढीवारी सोहळा नेटकेपणाने आणि कोरोना विषयक नियमांचे पालन होईल, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना दिल्या.
कोरोना चाचणीसाठी पाच ठिकाणी उभारली केंद्रे
आषाढीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात येणाऱया भाविकांसाठी आणि पॉझिटिव्हिटीचा रेट कमी करण्यासाठी पंढरपूर नगरपालिकेने शहरात गर्दी असलेल्या 5 ठिकाणी कोरोना चाचणी सेंटर्स सुरू केली आहेत. येथे दररोज 600 टेस्ट केल्या जात असल्याने संचारबंदी लागू होण्यापूर्वी किमान 7 ते 8 हजार टेस्ट पूर्ण होणार आहेत. शहरातील नामदेव पायरी, चंद्रभागा वाळवंट, बसस्थानक, विसावा, वाखरी या 5 ठिकाणी कोरोना चाचणी केंद्रे सुरू केली आहेत. गेल्या तीन दिवसांमध्ये सुमारे 1800 भाविकांची चाचणी करण्यात आली असून, यात 25 रुग्ण कोरोनाबाधित आढळले. 20 जुलै रोजी आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा साजरा होत आहे. यासाठी 17 ते 25 जुलैपर्यंत संचारबंदी लागू केली आहे.





























































