उपवासाचा आनंदसोहळा

2283

मीना आंबेरकर

आषाढी एकादशीचा उपवास… पाऊस पडत असतो. रसवंतीला रुचीपालट हवाच असतो.. विठुरायाच्या उपवासाचे निमित्त या रुचीपालटाला पुरते….

विठुमाऊलीच्या दर्शनासाठी वारकऱयांची वाटचाल पंढरपूरच्या दिशेने सुरू झाली. मुखाने जय हरी विठ्ठलच्या नामघोषात वारकरी वारीला निघाले. शेतीची कामे उरकून निर्वेधपणे पांडुरंगाचे दर्शन घ्यावे ही एकमेव इच्छा मनी धरून उन्हापावसाची तमा न बाळगता वारीचे मार्गक्रमण सुरू झाले. अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेला पांडुरंगही निश्चितच आपल्या भक्तांच्या दर्शनासाठी आतुर झालेला असणार. कधी उजाडतोय हा एकादशीचा दिवस. परमेश्वर आणि भक्त दोघेही उत्सुक. मराठी माणसासाठी हा जणू आनंद सोहळा.

सर्वांनाच काही वारीला जाणे शक्य होतेच असे नाही. परंतु घरातील लहानथोर या आषाढी एकादशीची मनापासून वाट बघत असतात. घरच्या घरी राहूनही ही एकादशी साजरी केली जाते. हा जरी आनंद सोहळा असला तरी हे क्रत आहे. अर्थात क्रत म्हटले की रोजच्या खाण्यापिण्यावरही निर्बंध आलेच. या दिवशी उपवास करून भक्त या क्रताचे पालन करतात. अर्थातच काही वेळा गमतीने ‘एकादशी दुप्पट खाशी’ अशीही या क्रताची संभावना केली जाते. परंतु यातील गमतीचा भाग सोडला तर सामान्य माणूस वेगवेगळे उपवासाचे पदार्थ खाऊन या क्रताचे पालन करतो. काहीजण केवळ काहीतरी वेगळे खायला मिळेल या हेतूनेही उपवास करतात आणि जिभेचे चोचले पुरवतात. परंतु यात गैर काहीच नाही. माणसाला रोजच्या पेक्षा काहीतरी वेगळे हवेच असते.

घरोघरी उपवासाचे काहीतरी चविष्ट पदार्थ केले जातात व रोजच्या जेवणापेक्षा काहीतरी वेगळे खाल्ल्याचा आनंद मिळतो. यानिमित्ताने बघूया काही उपवासाच्या वेगवेगळय़ा खाद्यकृती.

vari-pulav

वऱयाच्या तांदळाचा पुलाव

साहित्य…वऱयाचे तांदूळ, लवंगा, वेलदोडे, काजू, बेदाणे, दही, साखर, बटाटे, तूप.

कृती…पुलाव करण्यापूर्वी एक वाटी वऱयाचे तांदूळ धुऊन निथळत ठेवावे. प्रत्येकी दोन लवंगा, वेलदोडे तुपात तळून काढावे. तसेच एका बटाटय़ाचे लांबट तुकडे गुलाबी रंगावर तळून काढावे. अर्धी मूठ काजूचे तुकडे, एक टे. स्पून बेदाणेसुद्धा तळून ताटात काढावे. पातेल्यात साजूक तुपात तांदूळ चांगले परतावे आणि दोन वाटय़ा पाणी घालावे. त्यात तळलेल्या लवंगा, वेलदोडे घालावे. चिमूटभर मीठ, एक टीस्पून साखर, एक टे. स्पून सायीचे दही घालून पळीच्या टोकाने ढवळून त्यावर ताट झाकावे आणि मंद शिजवावे. शिजलेले तांदूळ ताटात पसरून मोकळे करावे. त्याना केशरी रंग चोळावा. त्यात तळलेले काजू, बेदाणे, बटाटय़ाचे काप घालावे, थोडे साजूक तूप घालून पुलाव पसरट पातेल्यात भरावा आणि उबेवर झाकून ठेवावा.

sabudan-ghavan

उपवासाच्या आंबोळय़ा

साहित्य…तीन वाटय़ा वऱयाच्या तांदळाचे पीठ, अर्धी वाटी साबुदाणा, चार मिरच्यांचा ठेचा, मीठ, तूप, जिऱयाची पूड, कोथिंबीर.

कृती…सकाळी साबुदाणा शिजवून ठेवावा. दुपारी पुरणयंत्रातून काढावा. त्यात पीठ मिसळावे. एक टीस्पून ताक घालावे व भज्यांच्या पातळ पिठाप्रमाणे पाणी घालून कालवावे. पीठ झाकून ठेवावे. दुसऱया दिवशी त्यात मीठ, मिरच्यांचा ठेचा, एक टीस्पून जिऱयाची पूड, पाव वाटी चिरलेली कोथिंबीर, डावभर गरम तूप घालून पीठ चांगले फेसावे आणि प्रखर गॅसवर बिडाचा तवा तापवून नेहमीप्रमाणे तुपावर पातळ घावणे करावे. जोडीला ओल्या खोबऱयाची- आले, कोथिंबीर, मिरची घालून चटणी करावी व दहय़ात कालवावी.

sabudana

उपवासाची दही मिसळ

साहित्य…एक वाटी साबुदाणा, अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे, पाऊण वाटी नायलॉन साबुदाणा, एक मोठी वाटी चोचवलेली काकडी, एक वाटी उकडलेल्या बटाटय़ाच्या फोडी, एक वाटी शेंगदाण्याचे कूट, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर, एक लिटर दुधाचं गोड दही, पाच-सहा मिरच्यांचा ठेचा, मीठ, खिचडीसाठी तूप.

कृती…साबुदाणा भिजवून त्यात दाण्याचे कूट व उकडलेला बटाटा घालून खिचडी करावी. नंतर बटाटय़ाचा कीस व नायलॉन साबुदाणा तळून काढावा. भाजून सोललेले दाणे पण झटपट तळून काढावे. थोडय़ाशा तुपावर मीठ-मिरच्यांचा ठेचा घालून तळलेले जिन्नस घालून परतून ठेवावे. खोलगट डिशमध्ये प्रथम अर्धी डिश खिचडी घालावी. त्यावर तळलेले एकत्र केलेले मिश्रण, चोचवलेली काकडी पसरावी. नंतर घट्ट दहा घालावे व चिमूटभर लाल तिखट पेरावे. खायला देण्याच्या वेळीच डिश तयार करावी.

khajur-2

खजूर गोळय़ांची खीर

साहित्य…१ लिटर दूध, खजुराच्या दहा बिया, १ टे. स्पून काजूची पूड, अर्धी वाटी साखर, जायफळ पूड व वेलची पूड आवडीनुसार.

कृती…खजूर धुऊन त्यातल्या बिया काढून वाटाव्या. त्यातच काजूची पूड घालून परत वाटून त्याचे छोटे गोळे करावेत. ताजे दूध आटवून त्यात साखर घालून खाली उतरवावे. नंतर त्यात जायफळ व वेलची पूड घालावी. साखर विरघळली पाहिजे. नंतर त्यात खजुराचे गोळे घालून खीर झाकावी. वाढताना थोडी गरम करावी. त्याच्या जोडीला राजगिऱयाच्या पुऱया गरमागरम करून वाढाव्या.

 

आपली प्रतिक्रिया द्या