#Ashes2019 दोन्ही डावात शतकं ठोकत स्मिथने विराटचा विक्रम मोडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

चेंडू कुरतडल्याप्रकरणी एक वर्ष बंदीची कारवाई भोगून आल्यानंतर पहिल्यांदाच पांढऱ्या कपड्यामध्ये मैदानात उरलेला ऑस्ट्रेलियाचा खेळाडू स्टीव्ह स्मिथने दमदार पुनरागमन केले आहे. अशेस कसोटीच्या पहिल्या आणि दुसऱ्या डावात शतक झळकावून स्मिथने वर्षभराची कसर भरून काढण्याचे काम केले. दोन्ही डावात शतक झळकावताच स्मिथने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 25 शतक ठोकण्याचा विक्रम मोडीत काढला.

इंग्लंडविरुद्ध बर्मिंघममध्ये सुरू असलेल्या अशेस मालिकेतील दुसऱ्या डावात रविवारी स्मिथने शतक झळकावले. स्मिथने दुसऱ्या डावात 142 धावांची खेळी केली. तर पहिल्या डावात त्याने 144 धावा चोपल्या होत्या. स्मिथचे कसोटीतील हे 25 वे शतक असून त्याने फक्त 119 डावात हा पल्ला गाठला आहे. विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये 127 डावात 25 शतकं ठोकली होती. तर सर्वाधिक वेगवान 25 शतकं झळकावण्याचा विक्रम डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर असून त्यांनी फक्त 68 डावात ही कामगिरीची नोंद केली.