Ashok kharat case – रूपाली चाकणकर यांचा अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकणकर यांच्या आरोपांची राळ उठली आहे. यामुळे त्यांना महिला आयोगाचे अध्यक्षपद सोडावे लागले होते आणि आता चाकणकर यांनी आ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. चाकणकर यांनी पक्षाध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे. सोशल मीडियात पोस्ट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे.

खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवशीच मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. त्याच्या आर्थिक व्यवहारात, त्याच्या गैरकृत्यात दुरान्वये संबंध नाही. आजही तीच स्पष्ट व ठाम भूमिका आहे. तपासादरम्यान या सर्व बाबी निष्पन्न होतीलच. खोटे, असत्य व कुठलाही पुरावा नसताना जे आरोप माध्यमांमधून होत आहेत, ते वेदनादायक आहे. सत्य प्रखरतेने सिद्ध होईलच, असे राजीनामा देताना रुपाली चाकणकर म्हणाल्या.

हा तपास पारदर्शकपणे व निष्पक्षपणे व्हावा, ही माझी मागणी मी यापूर्वीच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलिस महासंचालक यांच्याकडे केली आहे. आज सकाळी फोनद्वारे सुनेत्रा पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार मी माझ्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.