
‘फिरूनी जुळल्या रेशीमगाठी…’ ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या हटके संकल्पनेतून नुकताच या शीर्षकांतर्गत आगळावेगळा मेळावा दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात पार पडला. घटस्फोटापर्यंत पोहोचून तो न घेता पुन्हा एकदा आयुष्य एकमेकांच्या साथीने पुढे नेणाऱया आणि सध्या सुखी संसार करणाऱया दांपत्यांच्या मेळाव्याची ही मुळ्ये यांची ही हटके संकल्पना दाद मिळवून गेली. अशी सुमारे 18 जोडपी यावेळी उपस्थित होती.
मुळ्ये यांनी आयोजित केलेले हे अशा प्रकारचे तिसरे संमेलन आहे. या 18 दांपत्यांसोबतच 12 नवविवाहित जोडपीदेखील या कार्यक्रमाला निमंत्रित केली होती. नवविवाहितांना आयुष्य पुढे नेताना सर्वसमावेशक विचार करून वाटचाल करता यावी, नाते टिकवता यावे यासाठी अशा नव्याने लग्न झालेल्या दांपत्यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरेल सुरुवात केतकी भावे-जोशीने गायलेल्या ‘या सुखांनो या’ या गीताने झाली.
कार्यक्रमाला अभिनेते प्रशांत दामलेंची खास उपस्थिती होती. उपस्थित दांपत्यांना त्यांनी आपल्या खास शैलीत नाते टिकवण्यासाठी मार्गदर्शन केले. तसेच मुळ्ये यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी करत उपस्थितांची दाद मिळवली. मानसोपचारतज्ञ डॉ. अंजली जोशी, न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी, ठाणे फॅमिली कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती श्याम रुकमे आदी मान्यवरांनीदेखील उपस्थित जोडप्यांना मार्गदर्शनही केले. समुपदेशक वंदना शिंदे आणि वांद्रे फॅमिली कोर्टाचे शशांक मराठे यांच्या प्रमुख सहकार्याने अशोक मुळ्ये यांनी हा मेळावा घडवून आणला.





























































