आष्टीत रसवंतीचे घुंगरू वाजू लागले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। आष्टी

मार्च महिना सुरू झाला असून उन्हाची तीव्रता जाणवू लागल्याने आष्टी शहर व परिसरातील रसवंतीगृहांत घुंगरू वाजू लागले आहेत. जसजसे उन्हाचे चटके बसत आहेत तस तसे नागरिक हैराण होत असून घुंगराच्या आवाजात थंड पेयाचा आस्वाद घेण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहे.

आष्टी शहरासह तालुक्यात गेल्या चार दिवसापासून उन्हाची तीव्रता वाढत आहे शहरातील जुने तहसील कार्यालय, बाजार तळ, स्टेट बँक रोड, नवीन तहसील कार्यालय, नगर-बीड राज्यमार्ग परिसरात ठिकठिकाणी रस्त्यालगत रसवंती गृहाचे दुकाने मोठया प्रमाणवर थाटले असून दुकानात रसवंतीचे घुंगरू वाजू लागले आहे. रसवंतीच्या घुंगराचा आवाज नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. रसवंतीगृहाच्या दुकानात थंडगार रस पिण्यासाठी लहानापासून आबाल वृध्दांपर्यंत नागरिक गर्दी करत आहेत, ऊसाचा रस पिण्याचा लोकं आनंद लुटतानाचे दृश्य सध्या पहावयास मिळत आहे. काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीने बैल चरख्याचा उपयोग केला जात आहे, तर बहुतांश ठिकाणी इंजिनावर चालणारे रसवंतिगृहे सुरू आहेत. उन्हाच्या झळांपासून दिलासा मिळण्यासाठी रसवंतीगृहांकडे नागरिकांची पाऊले वळत आहेत.

बैल चरख्याच्या रसास नागरिकांची पसंती

बैलाच्या साह्याने पारंपारिक रसवंतीगृहे सुरू आहेत. बैलाच्या मदतीने सुरू असलेल्या या रसवंतीगृहांना ग्राहकांची अधिक पसंती मिळत आहे. बैल चरख्याचा रस पिण्याची मजा काही औरच असते. असेही रसवंतीगृहात बसलेल्या नागरिक सांगत आहेत.