हिंदुस्थानच्या मदतीला आशियाई बँक धावली, कोरोना लस खरेदीसाठी 11,185 कोटींचे कर्ज मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तिजोरीतील खडखडाटाचे कारण देत राज्यांना पुरेशा कोरोना लसींचा पुरवठा करण्यात कमी पडलेल्या केंद्र सरकारला अखेर आशियाई विकास बँकेने आर्थिक मदतीचा हात दिला आहे. या बँकेने कोरोनाच्या लसी खरेदी करण्यासाठी हिंदुस्थानला 1.5 अब्ज डॉलर म्हणजेच 11,185 कोटींचे कर्ज मंजूर केले आहे. या रकमेच्या सहाय्याने केंद्र सरकार पुरेशा लसी खरेदी करू शकेल. त्यामुळे देशभरात कोरोना लसीकरणाला पुन्हा गती मिळणार आहे.

कोरोना लस खरेदीसाठी हिंदुस्थानला कर्ज मंजूर केल्याची माहिती आशियाई विकास बँकेने (एडीबी) गुरुवारी एका निवेदनाद्वारे जाहीर केली. देशभरात कोरोना लसीकरण मोहिमेला गती देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले, मात्र केंद्र सरकार राज्यांना पुरेशा लसींचा पुरवठा करण्यात कमी पडले. त्यावर राज्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर पेंद्राने कर्जासाठी एडीबीकडे हात पसरला. केंद्र सरकारच्या या विनंतीचा स्वीकार करीत एडीबीने सुरक्षित आणि प्रभावी कोरोना प्रतिबंधक लस खरेदी करण्यासाठी 11,185 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे.

आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर बँकही देणार 50 कोटी डॉलर्स

एडीबीबरोबरच एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेकडूनदेखील लस खरेदीसाठी हिंदुस्थानला अर्थसहाय्य केले जाणार आहे. एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक अतिरिक्त 50 कोटी डॉलर्सचे कर्ज देईल, असेही एडीबीने आपल्या निवेदनात म्हटले आहे. एडीबीने बुधवारी 13 राज्यांना आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी 22 अब्ज डॉलर्सचे कर्ज मंजूर केले आहे.