
हिंदुस्थानी नेमबाजांनी आशियाई क्रीडा स्पर्धेतील आपली पदकांची लयलूट सुरूच ठेवली. रविवारी हिंदुस्थानला नेमबाजीत एक सुवर्ण, एक रौप्य व एक कांस्य अशी तिन्ही रंगांची पदके मिळाली. पुरुषांच्या सांघिक ट्रप प्रकारात सुवर्ण, महिला ट्रप प्रकारात रौप्य, तर वैयक्तिक पुरुष ट्रपमध्ये कांस्यपदक मिळाले.
पृथ्वीराज तोंडाईमन, किनान चेनाई व जोरावर सिंग या त्रिकुटाने पुरुषांच्या सांघिक ट्रप प्रकारात 361 गुणांची कमाई करीत हिंदुस्थानला सुवर्णपदक जिंकून दिले. कुवैतने 359 गुणांसह रौप्य, तर यजमान चीनने 354 गुणांसह कांस्यपदक जिंकले.
मनिषा कीर, प्रीती रजक व राजेश्वरी कुमारी यांनी महिलांच्या ट्रप प्रकारात 337 गुणांची कमाई करीत हिंदुस्थानला रौप्यपदक जिंकून दिले. यजमान चिनी संघाने 357 गुणांसह सुवर्णपदकाचा वेध घेतला, तर कझाकिस्तानच्या संघाला 336 गुणांसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
याचबरोबर किनान चेनाई याने पुरुषांच्या वैयक्तिक ट्रपमध्ये 40 पैकी 32 गुणांची कमाई करीत हिंदुस्थानसाठी कांस्यपदकाची कमाई केली. याच प्रकारात हिंदुस्थानचा जुरावर सिंह पाचव्या स्थानी राहिला.




























































