
आशियाई क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानी नेमबाजांनी आपली सोन्याची आणि पदकांची लूट कायम ठेवताना हिंदुस्थानला दिवसातील एकमेव सुवर्ण जिंकून दिले. तसेच बॅडमिंटनच्या पुरुष संघाने इतिहास रचताना नेपाळचा 3-0 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला आणि आपले तब्बल 37 वर्षांनी आशियाई स्पर्धेत आपले पदक निश्चित केले आहे. तसेच मैदानी स्पर्धांमध्ये किरण बालियानने पदकाचे खाते उघडले असून, गोळाफेक प्रकारात तिने 17.36 मीटर लांब गोळा फेकत कांस्यपदक नावावर केले आहे.
आता बॅडमिंटनच्या उपांत्य फेरी सामन्यात हिंदुस्थान इंडोनेशिया आणि कोरिया यांच्यातील विजेत्याबरोबर भिडेल. हिंदुस्थानने टेनिसपाठोपाठ बॅडमिंटनमध्ये पदक निश्चित केले आहे. हिंदुस्थानच्या लक्ष्य सेनने प्रिन्स दहलचा 21-5, 21-8 असा पराभव केला, तर किदांबी श्रीकांतने सुनील जोशीवर 21-4, 21-13 अशी मात केली. मिथुन मंजुनाथने बिष्णू कटुवाल याचा 21-2, 21-7 असा सहज पराभव करत उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला.
हिंदुस्थानची 32 पदके
आशियाई क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत 32 पदके जिंकली असून यापैकी 18 पदके एकटय़ा नेमबाजांनी जिंकून दिली आहेत. त्यांनी 8 पैकी 6, 12 रौप्यांपैकी 7 आणि 12 कांस्यापैकी 5 पदके जिंकत आपण नेमबाज नव्हे, तर ‘पदकबाज’ असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. त्याचप्रमाणे क्रिकेटमध्ये 1, अश्वारोहणात 1 सुवर्ण आणि 1 कांस्य, रोइंगमध्ये 2 रौप्य आणि 3 कांस्य, सेलिंगमध्ये 1 रौप्य आणि 2 कांस्य, वुशूमध्ये 1 रौप्य, टेनिसमध्ये 1 रौप्य, स्क्वॅशमध्ये 1 कांस्य अशी पदके जिंकली आहेत.
वुशूत रौप्य पदकाची कमाई
मणिपूरच्या वुशू खेळाडू रोशिबिना देवी नाओरेमने 60 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावले आहे. मणिपूरच्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर रोशिबिना हिने हे पदक मणिपूरला समर्पित केले आहे. ‘रौप्य पदक पटकावल्याबद्दल आनंद असला तरी सुवर्ण पदक मिळवू शकले नाही याचेही दुःख आहे. मी हे पदक मणिपूरच्या लोकांना समर्पित करते. या सामन्यात माझ्याकडून ज्या चुका झाल्या त्या पुढील सामन्यात टाळण्याचा माझा प्रयत्न असेल,’ असे मत रोशिबिनाने व्यक्त केले.
टेनिसमध्ये मिश्र दुहेरी जोडी अंतिम फेरीत
हिंदुस्थानने टेनिसमध्ये रौप्य पदक निश्चित केले आहे. रोहन बोपन्ना आणि ऋतुजा भोसले यांनी टेनिस मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यांनी तैवानच्या चान हाऊ चिंग आणि यू हसू या जोडीचा उपांत्य फेरीच्या सामन्यात पराभव केला. रोहन आणि ऋतुजा या जोडीने तैवानच्या जोडीचा 6-1, 3-6 असा पराभव केला. पहिला सेट हिंदुस्थानच्या जोडीने सहज जिंकल्यानंतर दुसऱया सेटमध्ये तैवानच्या जोडीने कडवी झुंज दिली, मात्र टायब्रेकमध्ये त्यांनी आपले स्थान निश्चित केले.
नेमबाजांचा पदकांवर निशाणा
आशियाई स्पर्धेमध्ये हिंदुस्थानच्या नेमबाजांनी पुन्हा एकदा पदकांचा धमाका केला आहे. महिलांच्या संघाने सांघिक क्रीडा प्रकारात सोनेरी यश संपादले. 10 मीटर एअर पिस्टल क्रीडा प्रकारात 17 वर्षांच्या पलक गुलियाने सुवर्ण पदकाला गवसणी घातली, तर 18 वर्षांच्या इशा सिंगने रौप्य पदकावर आपले नाव कोरले. पलकने आज कमी वयात सोने जिंकण्याची किमया साधताना आपले पहिले आंतरराष्ट्रीय पदक जिंकले. तिने अंतिम फेरीत 242.1 गुण करत नवा आशियाई विक्रम प्रस्थापित केला. पुरूषांचा 50 मीटर रायफल थ्री पोझिशन्स प्रकारात विश्वविक्रमासह सुवर्ण जिंकले. ऐश्वर्य प्रताप सिंग, स्वप्नील कुसळे आणि अखिल श्योरण यांनी 1769 गुणांसह विश्वविक्रम आणि सुवर्ण या दोघांना गवसणी घातली.
निकहत उपांत्य फेरीसह ऑलिम्पिकसाठीही पात्र
निकहत झरीनने 50 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीच्या गटात प्रवेश केला आहे. तिने महिलांच्या 50 किलो गटात जॉर्डनच्या हानान नासारचा पराभव करून आशियाई स्पर्धेतील हिंदुस्थानचे आणखी एक पदक निश्चित केले आहे. तिने उपांत्यपूर्व फेरीचा सामना अवघ्या 127 सेकंदांत जिंकला. या विजयासह निखतने केवळ आशियाई स्पर्धेतील पदक निश्चित केले नाही तर पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेतील हिंदुस्थानला बॉक्सिंगसाठी पहिला कोटा मिळवून दिला आहे.
आशियाई पदक तालिका
देश सुवर्ण रौप्य कास्य एकूण
चीन 105 63 32 200
जपान 27 35 37 99
द. कोरिया 26 28 48 102
हिंदुस्थान 8 12 13 33
थायलंड 8 3 9 20
उझबेकिस्तान 7 10 15 32
हाँगकाँग 5 13 18 36
तैपैई 5 6 9 20
इराण 3 10 10 23
उ. कोरिया 3 6 4 13




























































