
सर्वोच्च न्यायालयात बुधवारी शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी घेण्यात आली होती. आता या सुनावणीसाठी 12 नोव्हेंबरला तारीख देण्यात आली आहे. या नव्या सुनावणीच्या तारखेसंदर्भात अॅड. असीम सरोदे यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरं देताना सविस्तर माहिती दिली.
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी घेण्यासंदर्भात न्यायालयाने तातडी दाखवली नाही असे म्हणत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना अॅड. असीम सरोदे म्हणाले, ‘एक तर त्यांच्यासमोर वेगवेगळ्या प्रकारची कामं आहेत आणि अर्धवट सुनावणी पूर्ण करायची आहे हे अत्यंत योग्य कारण आहे. मुद्दाम कारण दिलं असं आपण म्हणू शकत नाही. त्यामुळे योग्य कारण असल्याने त्यांना आज वेळ नाही असं त्यांनी सांगितलं आहे. न्यायाधीशांनी गेल्यावेळीच सांगितलं होतं की यातले छोटे छोटे मुद्दे न घेता आपण अंतिम सुनावणीसाठी तारीख निश्चित करू. त्यानुसार आजची तारीख निश्चित झाली होती. त्यामुळे आज अंतिम सुनावणी आहे असं आम्हाला सगळ्यांना वाटत होतं. न्यायाधीशांना अर्धवट राहिलेल्या खटल्यांवर सुनावणी करायची होती. त्यात समोरील पक्षाच्या वकीलांनी तीन दिवसांचा अवधी लागेल असं म्हटलं होतं. त्यामुळे आज ही सुनावणी लगेच पूर्ण होईल अशी काही चिन्ह नव्हती. हे लक्षात घेत न्यायाधीशांनी ही सुनावणी सुरू करण्यापेक्षा पुढल्या तारखेला सुनावणी घेऊ आणि एक दोन दिवसात संपवू, असं न्यायाधीशांनी सांगितल्याची माहिती अॅड. असीम सरोदे यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना, ‘ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी स्वत: सांगितलं की त्यांना युक्तिवाद करण्यासाठी 45 मिनिटे हवी आहेत, मग समोरच्यांना जो काही युक्तिवाद करायचा आहे तो करू द्या, असं त्यांचं म्हणणं होतं’, असंही अॅड. असीम सरोदे यांनी स्पष्ट केलं.
१२ नोव्हेंबर तारीख दिल्यासंदर्भात पत्रकरांनी अॅड. असीम सरोदे यांना प्रश्न विचारले. त्यावर अॅड. सरोदे यांनी स्पष्ट केलं की, लवकर सुनावणी घेण्यासंदर्भात बोलणं झालं होतं, मात्र निवडणुका जानेवारी महिन्यात आहेत तेव्हा १२ नोव्हेंबर तारखेची अडचण नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी निकाल लावणार असल्याचं न्यायालयाकडून सांगण्यात आल्याची माहिती अॅड. असीम सरोदे यांनी पत्रकारांना दिली.
१२ नोव्हेंबर पासून युक्तिवाद सुरू होणार!
१२ नोव्हेंबर पासून युक्तिवाद सुरू करण्यात येणार असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल हे युक्तिवाद करतील, त्यानंतर इतर लोक युक्तिवाद करतील. आतापर्यंत न्यायालयाने जे म्हटले आहे त्याकडे लक्ष दिले असता असे दिसते की सुनावणी सलग होऊ शकते, असं अॅड. असीम सरोदे यांनी सांगितलं.
ज्यांची बाजू कमजोर असते…
या प्रकरणातील प्रतिवादींनी डिसेंबरमध्ये सुनावणी घ्यावी अशी मागणी केली होती. यासंदर्भात बोलताना अॅड. असीम सरोदे यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. ते म्हणाले की, ‘ज्यांची बाजू कमजोर असते त्यांना काहीतरी न्यायिक क्लुप्त्या करायच्या असतात. मी जसं म्हटलं की शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांची संविधान आणि कायद्याच्या दृष्टीने मजबूत बाजू आहे त्यामुळे जेवढं हे प्रकरण पुढे ढकलता येईल तितकं पुढे ढकलावं या मानसिकतेत त्यांना सूचना देत असतील. त्यामुळेच त्यांच्या वकिलांनी न्यायालयाकडे तशी मागणी केली असेल’, असं अॅड. असीम सरोदे म्हणाले.